विजय तेंडुलकर

(१९२८ ते २००८)
काळाच्या पुढचा विचार करणारे कसदार लेखक-पत्रकार-नाटककार.

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर हे काळाच्या पुढचे नाटककार, सिद्धहस्त चित्रपट आणि दूरचित्रवाणी लेखक, राजकीय भाष्य करणारे पत्रकार तसेच कथा, कादंबरी, एकांकिका, ललित निबंध या वेगवेगळ्या साहित्यप्रकारांत विपुल आणि कसदार लेखन करणारे लेखक म्हणून ओळखले जातात.
तेंडुलकरांचा जन्म कोल्हापूरचा. वडिलांचा प्रकाशन व्यवसाय असल्याने घरात साहित्याचे वातावरण होतेच. त्यांच्यावर आपल्या लेखकही असलेल्या वडिलांचा तसेच दि. बा. मोकाशी, अनंत काणेकर यांच्या लेखनाचा प्रभाव होता. शालेय वयातच त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. त्यामुळे मॅट्रिकनंतर शिक्षण थांबले आणि काही काळ ते आपल्या कुटुंबापासूनही दुरावले. पण याच काळात त्यांचा विविध विचारसरणींशी परिचय झाला, ज्याचा त्यांना पुढे आपल्या लेखनासाठी खूप उपयोग झाला. सुरुवातीच्या अस्थिरतेच्या काळानंतर तेंडुलकर १९६६ पासून मुंबईत स्थिरावले आणि तीच त्यांची कर्मभूमी बनली.
चरितार्थासाठी सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय स्वीकारला. ‘नवभारत’, ‘मराठा’, ‘लोकसत्ता’ या दैनिकांतून, ‘नवयुग’ साप्ताहिकातून तसेच ‘वसुधा’ या मासिकातून त्यांनी संपादन आणि सदरलेखन केले. या सदरलेखनावर आधारित त्यांची ‘कोवळी उन्हे’, ‘रातराणी’, ‘फुगे साबणाचे’, ‘हे सर्व कोठून येते’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. याच काळात ‘आमच्यावर कोण प्रेम करणार?’ आणि ‘गृहस्थ’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली, मात्र त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
सुरुवातीच्या काळात जगण्यासाठी करायला लागणाऱ्या संघर्षामुळे कनिष्ठ मध्यमवर्गाचे आयुष्य त्यांनी जवळून बघितले. त्यामुळे त्यांच्या लिखाणात प्रत्यक्ष अनुभवातून आलेला एक सच्चेपणा आढळतो. पुढे प्रायोगिक रंगभूमीशी त्यांचा संबंध आला आणि त्यांचे लेखन बहरले. इतके, की नंतर त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहरामोहराच बदलून टाकला. याची बीजे त्यांच्या सुरुवातीच्या एकांकिका लेखनात आढळतात. ‘रंगायन’ आणि नंतर ‘आविष्कार’ या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. या संस्थांतील विजया मेहता, डॉ. श्रीराम लागू, अरविंद- सुलभा देशपांडे या रंगकर्मींनी त्यांच्या नाटकांना वेगळी उंची प्राप्त करून देण्यात मदत केली.
तेंडुलकर बराच काळ पत्रकार म्हणून वावरले. त्या क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरीही केली. मात्र, रंगभूमी आणि नाट्यलेखनाच्या क्षेत्रातले त्यांचे योगदान वादातीत आहे. त्यांच्या नाटकांतील आशय आणि तंत्र यांनी मराठी रंगभूमीचा दर्जा उंचावर नेला. ‘माणूस नावाचे बेट’, ‘मधल्या भिंती’, ‘सरी गं सरी’, ‘एक हट्टी मुलगी’ ही त्यांची सुरुवातीची नाटके तसेच ‘अजगर आणि गंधर्व’ यासारख्या एकांकिका नावाजल्या गेल्या. मात्र, ते खऱ्या अर्थाने लक्षात राहिले ते ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या १९६८ सालच्या नाटकामुळे. या नाटकावर पुढे पं. सत्यदेव दुबे यांनी चित्रपटही तयार केला. त्याची पटकथाही तेंडुलकरांनी लिहिली होती.
त्यानंतर आलेले ‘अशी पाखरे शेती’ हे नाटक भावुक असले तरी १९७१ ते १९७३ या काळात पाठोपाठ आलेली ‘गिधाडे’, ‘सखाराम बाइंडर’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ ही नाटके रूढ सामाजिक आणि नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि त्यामुळे वादग्रस्त ठरली. ‘गिधाडे’मध्ये माणसाच्या मनातील सुप्त हिंस्र भावनेचे कुरूप पण वास्तववादी चित्र होते. सखाराम हा कसलाच विधिनिशेष नसलेला आणि कुठलेच सामाजिक संकेत न पाळणारा माणूस. समाजाचे नियम त्याच्यासाठी कालबाह्य आहेत. मानवी भावभावनांशी त्याची फारकत झालेली आहे. त्याला फक्त व्यवहार कळतो. तर ‘घाशीराम कोतवाल’ हे नाना फडणवीसांच्या जीवनावर आधारित नाटक आहे. त्याच्या तंत्राची खूप वाहवा झाली असली तरी त्यातला आशय मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरला होता. मात्र, त्यानंतर त्याने खूप लोकप्रियता मिळवली. ते सर्वांत जास्त काळ रंगभूमीवर चाललेले नाटक ठरले असून सुमारे सहा हजार कलाकारांनी त्याच्या विविध प्रयोगांत काम केले आहे. या नाटकांमुळे तेंडुलकर टीकेचे लक्ष्य ठरले तरी त्यांनी कधीच आपली भूमिका बदलली नाही किंवा कुठल्याच तडजोडी केल्या नाहीत हे लक्षात घेण्यासारखे आहे.
नंतरही त्यांनी ‘दंबद्वीपाचा मुकाबला’, ‘बेबी’, ‘भाऊ मुरारराव’, ‘कमला’, ‘मित्राची गोष्ट’, ‘कन्यादान’, ‘विठ्ठला’, ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’ अशी विविध विषयांवरची नाटके लिहिली. आपले समकालीन मोहन राकेश यांचे ‘आधेअधुरे’ आणि गिरीश कर्नाड यांचे ‘तुघलक’ या नाट्यकृती त्यांनी मराठीत आणल्या. हे त्यांचे एक महत्त्वाचे योगदान.
‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘आक्रित’, ‘उंबरठा’, ‘२२ जून १९८७’ आणि ‘निशांत’, ‘मंथन’, ‘आक्रोश’, ‘अर्धसत्य’, ‘कमला’, ‘सरदार’, ‘गहराई’ अशा सुमारे २० हिंदी-मराठी चित्रपटांच्या पटकथांचे लेखनही त्यांनी केले. त्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले.
तेंडुलकरांचे लिखाण सर्वस्पर्शी होते. त्यांनी बालनाट्ये, कथा, कादंबऱ्या लिहिल्या. दूरदर्शन मालिका आणि टॉक शोसाठी लिखाण केले. ‘देशातील वाढते हिंसाचार’ या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. कला आणि सामाजिक क्षेत्रातले त्यांचे योगदान अनन्यसाधारण मानले जाते. त्यासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ किताबही मिळाला होता.
प्रत्येकाच्या मनात एक कुरूप कोपरा असतो आणि संधी मिळाली की तो वर डोके काढतो. अशी भूमिका तेंडुलकरांच्या लिखाणात दिसते. त्यांचे लिखाण नेहमीच वास्तववादी आणि माणसाच्या नातेसंबंधांवर, त्यातल्या ताणांवर भाष्य करणारे होते. माणसाच्या दांभिकतेवर प्रहार करणारेही होते. त्यामुळेच भारताच्या सर्वोत्कृष्ट नाटकाकारांपैकी एक असा त्यांचा उल्लेख होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या लिखाणातील प्रभावी आशयाची नोंद घेतली गेली आहे, ही गोष्ट त्यांचे मोठेपण अधोरेखित करणारीच आहे. पत्रकारितेच्या अनुभवामुळे त्यांच्या लिखाणात एक वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आली होती. त्यामुळेच त्यांचे लिखाण एकांगी झाले नाही किंवा त्याच्यावर कुठला शिक्काही मारता येत नाही. ते स्वयंभूच राहिले.

विजय तेंडुलकर
(६ जानेवारी १९२८-१९ मे २००८)

लेखन - सीमा भानू

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content