राजा शिरगुप्पे

Raja Shirguppe

ग्रामीण आणि दुर्गम भागांतली सहसा माध्यमांपर्यंत न पोहचणारी स्पंदनं टिपण्याचं काम करणारा फिरस्ता लेखक म्हणून राजा शिरगुप्पे यांचा उल्लेख करावा लागेल. रिपोर्ताज हा फॉर्म राजाभाऊंनी समर्थपणे हाताळला आहे. शोधयात्रा - महाराष्ट्राच्या ग्रामीण दुर्गम भागाची, शोधयात्रा-ईशान्य भारताची आणि न पेटलेले दिवे अशी तीन पुस्तकं राजाभाऊंच्या नावावर आहेत. पण त्याखेरीजही साप्ताहिक साधना आणि सत्याग्रही विचारधारा या नियतकालिकांमधून राजाभाऊंनी भरपूर लिखाण केलं आहे. कोणत्याही प्रदेशातला ग्रामीण-कष्टकरी माणूस हा राजाभाऊंच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय आहे. स्वतः ग्रामीण भागातले आणि भाषाही साधीसोपी, त्यामुळे राजाभाऊंच्या लिखाणाला ग्रामीण वाचकही मिळाला आहे, हे विशेष.
२०१० साली महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचा ढोल सर्वत्र बडवला जात होता. महाराष्ट्र हे देशातलं सर्वात पुरोगामी आणि विकसित राज्य आहे, असे दावे करण्यात सरकार आणि मध्यम-उच्चमध्यम वर्गही समाधान मानत होता. त्याचवेळी खरा महाराष्ट्र कसा आहे, याचा शोध घेत फिरावं असं राजाभाऊंना वाटलं. कोल्हापूर जवळचं आजरा ते नंदूरबारमधल्या श्रीपूरपर्यंतचा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला. सरकारी पातळीवरून केले गेलेले विकासाचे दावे खरे असतात का, शहरांजवळची गावं विकासाच्या प्रभावाखाली येतात; पण त्यापलीकडच्या गावांचं काय होतं, किती गावांमध्ये शाळा आहेत, त्या कशा प्रकारे चालवल्या जाताहेत, किती गावांपर्यंत एसटी जाते, जिथे जात नाही त्या गावांचं काय होतं, शहरांपासून लांब असलेल्या गावांत लोकांना रोजगार मिळतो का, मिळत नसेल तर हे लोक कुठे जातात असे नाना प्रश्न डोक्यात घेऊन राजाभाऊंनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात प्रवास केला. गावांमध्ये मुक्काम ठोकून लोकांशी संवाद साधला. या प्रवासातून आपल्या तथाकथित पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्राचं दुसरं भेसूर रूप समोर आलं. त्या प्रवासाची गोष्ट त्यांनी 'शोध-ग्रामीण महाराष्ट्रातील दुर्गम भागाचा' हे पुस्तक त्यांनी लिहिलं. हे पुस्तक आपल्याला ख-या महाराष्ट्राचा दौरा घडवतं आणि खेड्यापाड्यातलं आजचं जगणं आपल्या डोळ्यासमोर उभं करतं. महाराष्ट्राला अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे याची जाणीव करून देणा-या या पुस्तकाने मराठी साहित्य विश्वात महत्त्वाची भर घातली आहे.
राजाभाऊंचं दुसरं पुस्तक ईशान्य भारतातल्या समाजजीवनाचा वेध घेतं. हे पुस्तकही त्यांनी ईशान्येतील सर्व राज्यांच्या भटकंती करून, तिथल्या लोकांशी संवाद साधून लिहिलं आहे. ईशान्येकडच्या राज्यांमधलं जनजीवन, लोकांचे प्रश्न, राजकारणी मंडळींची उदासीनता, उर्वरित भारताकडून मिळणारी उपेक्षा आणि तुच्छता, त्यामुळे तयार झालेला न्यूनगंड, प्रादेशिक अस्मिता की रोजीरोटी या द्वंद्वात अडकलेलं तिथलं समाजमन समजून घेण्याचा प्रयत्न राजाभाऊंनी या भटकंतीतून केला. या शोधयात्रेत आलेले भलेबुरे अनुभवही त्यांनी या पुस्तकात खेळकरपणे मांडले आहेत. ईशान्य भारतातल्या दुर्गम भागांची सामाजिक भटकंती घडवून आणणारं मराठीतलं हे एकमेव पुस्तक असावं.
न पेटलेले दिवे हे त्यांचं पुस्तक विविध थरांतल्या कष्टकरी मुलांबद्दल बोलतं. राजाभाऊंनी या मुलांशी दोस्ती केली आणि त्यांच्या साध्यासोप्या लेखणीने कष्टकरी मुलांच्या व्यथा-वेदना, त्यांचं जगणं सक्षमपणे आपल्यासमोर उभं केलं. यातली काही मुलं निपाणीतल्या तंबाखू कामगारांची, काही हॉटेलमधली पो-या मंडळी, तर काही अमरनाथच्या यात्रेत टुरिस्टांचं सामान उचलणारी. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, पण सा-यांचं वर्तमान झाकोळलेलं. तरीही उद्याची आशा ठेवत जगणा-या या मुलांचं जग आपल्याला बालपणाचं एक वेगळं रूप दाखवतं.
हे झालं पुस्तकांबद्दल. याशिवाय राजाभाऊंनी विविध नियतकालिकांमध्ये भरपूर लिखाण केलं आहे. त्यापैकी साप्ताहिक साधनेमध्ये राजाभाऊंनी बिहारमधील भटकंतीवर लिहिलेला दीर्घलेख बराच गाजला होता.
राष्ट्र सेवा दलाची पार्श्वभूमी असणारे राजाभाऊ इंग्रजीचे प्राध्यापक होते. पण समाज समजून घेऊन त्यातलं वास्तव लोकांसमोर आणण्याची आस त्यांना शांत बसू देत नव्हती. त्यामुळे लवकरच त्यांनी प्राध्यापकी सोडली आणि ते कार्यकर्ता-पत्रकाराच्या भूमिकेत शिरले. पत्रकारी लिखाणासोबतच देवदासी चळवळ, तंबाखू आंदोलन, विडी कामगारांचं आंदोलन, शेतकरी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक संस्था संघटनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content