युनिक फीचर्स

पत्रकारितेबद्दल स्वतःची निश्चित भूमिका असलेल्या तरुण मित्रांच्या प्रयत्नांतून१९९० मध्ये युनिक फीचर्स या माध्यमसंस्थेची स्थापना झाली. एकाहून अधिक लोकांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तिस्थानांचा वापर केला तर निर्माण होणा-या सामूहिक ऊर्जेतून अधिक परिणामकारक काम होऊ शकतं, या भूमिकेतून तरुण पत्रकारांचा मोठा संच या माध्यमसंस्थेने उभा केला. त्यातून मराठीतीलच नव्हे तर भारतातील एकमेवाद्वितीय माध्यमसंस्था उभी राहिली आणि सामूहिक उर्जेतून समांतर, पण वर्तमानपत्रांना पूरक ठरणारी पत्रकारिता आकाराला आली.
समाजातल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातली गुंतागुंत संवेदनशीलतेने टिपून परिणामकारक भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न म्हणजेच वर्तमानपत्रांसाठी केली जाणारी ‘युनिक’ पत्रकारिता.
युनिक फीचर्सने गेल्या २५ वर्षांमध्ये विविध सामाजिक विषयांच्या खोलात जाऊन अनेक शोधलेख केले. दैनिकांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये ज्या विषयांबद्दल बोललं-लिहिलं जात नाही ते विषय ऐरणीवर आणण्याचं आणि समाजातलं वास्तव तपासून घेण्याचं काम या शोधलेखांनी केलं. हे लेख महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता सारख्या दैनिकांमधून, तसंच पुढे दिवाळी अंकांमधून छापून आले आणि त्यांनी वाचकांना ढवळून काढलं.
शोधलेखांची काही उदाहरणं पाहिली तर `युनिक` पत्रकारितेचं स्वरूप आणि महत्त्व लक्षात येईल. `युनिक`ने केलेला पहिला लेख होता पुरोगामी महाराष्ट्रातल्या अस्पृश्यतेची शोधाशोध करणारा. गाव एकच, पण पाणवठे अनेक असं या लेखाचं नाव होतं. तो काळ महाराष्ट्रातल्या सामाजिक खळबळीचा होता. जातिभेद हा विषय महत्त्वाचा आहे, पण जणू तो अस्तित्वातच नाही असं समाज भासवत असल्याचं लक्षात येत होतं. एकीकडे फुल्यांच्या नावाचा जयजयकार करायचा आणि दुसरीकडे भेदाभेदही चालू ठेवायचा, हे वास्तव अस्वस्थ करणारं होतं. केवळ जातिभेदच नव्हे तर महाराष्ट्रात अस्पृश्यताही पाळली जातेय, अशी काही उदाहरणं समोर येत होती. म्हणून `युनिक`ने या उदाहरणांचा शोध घ्यायचं ठरवलं आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने महाराष्ट्र पालथा घातला. कोकण, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रात गावोगावी. दलितांवर जिथे-तिथे अन्याय होत आहेत, त्यांना माणुसकीची वागणूक मिळत नाहीये, जमीन-पाणी-देवळं-स्मशानं यावरून रीतसर अस्तृश्यता पाळली जातेय, असं धक्कादायक चित्र या फिरतीत दिसलं.
महाराष्ट्र टाइम्सने विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन ब्रॉडशीटची तब्बल दीडेक पानाची जागा दिली. हा लेख छापून आला आणि त्याद्वारे महाराष्ट्राच्या डोळ्यात अंजन घातलं गेलं. जातिभेदाच्या अनुषंगाने `युनिक`च्या मित्रांमध्ये असलेली अस्वस्थता महाराष्ट्रभर पोहोचवण्यात या शोधलेखामुळे पहिल्याच झटक्यात यश मिळालं.
त्यानंतर `युनिक`ने दलित समाजाच्या अगदी जिव्हाळ्याच्या आणखी एका विषयाला हात घातला. १९९१ साली सरकारी जमिनीवरील दलितांनी केलेली अतिक्रमणं नियमित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता. महाराष्ट्रभर जी गरीब भूमिहीनांची आंदोलनं चालू होती त्याच्या रेट्यातून हा निर्णय घेतला गेला होता, परंतु विविध कारणांनी या निर्णयाची अंमलबजावणी जवळपास होतच नव्हती. हे का होत आहे, कसं होत आहे, कुणामुळे होत आहे याचा शोध आम्ही मराठवाड्यात फिरून घेतला. गरीब भूमिहीनांना जमिनीच्या मालकीपासून वंचित ठेवण्यातच व्यवस्थेचे हितसंबंध कसे गुंतलेले आहेत, हे `युनिक`ने लेखातून पुढे आणलं. कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळीचा आधार घेत लेखाला शीर्षक दिलं होतं : ‘कधी दिसणार भाकरीचा चंद्र?’ सरकारी पातळीवर मंत्रालयात निर्णय घेतला गेला तरी खेड्यापाड्यांतल्या खोपट्यांपर्यंत निर्णय पोचण्यासाठी काही हजार किलोमीटरच्या अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागते आणि त्यातच संबंधितांची कशी दमछाक होते याचं अस्वस्थ करणारं वर्णन या लेखात होतं.
महाराष्ट्र टाइम्समध्येच छापून आलेल्या आणखी एका लेखाबद्दल सांगायला हवं. सालाबादाप्रमाणे देहू आणि आळंदीहून पंढरपूरकडे जाणारी वारकरी दिंडी पुण्यात पोहोचत होती. `युनिक`मधले सहकारी रस्त्याच्या कडेला उभे राहून हा सोहळा पाहत होते. वारकरी ‘ग्यानबा तुकाराम’ म्हणत विसाव्याच्या जागी निघाले होते. त्यांचं चालणं, त्यांचं दिसणं, त्यांच्या तोंडी असलेला पांडुरंगाचा गजर हे सर्व एका प्राचीन आणि पवित्र परंपरेतून आल्याचं जाणवत होतं. देशात जो धार्मिक गदारोळ चालला आहे त्यातील आक्रमकता त्यांना स्पर्शच करू शकणार नाही, असं मनोमन वाटत होतं. अचानक चमकून गेलं, वारीतल्या लोकांशी बोलावं!
कल्पना सुचल्यानंतर सारे आपापसात बोलले. अनपेक्षितपणे वादळी चर्चा झाली. ‘बिचारे वारकरी, अध्यात्माच्या मार्गाने निघालेत. तर यांना कशाला या वादात ओढायचं?’ असं एक म्हणणं होतं. तर वारकरी हे सहिष्णू परंपरेचे पाईक असल्याने धार्मिक तंट्याबद्दल त्यांचं म्हणणं काय हे समजून घ्यायला हवं. त्यातून सहिष्णू भारतीयांना सांप्रदायिक विंचू डसला आहे का हे कळेल, असं दुसरं म्हणणं होतं. निर्णय होईना. अखेर वारकऱ्यांशी बोलून पाहू यात, असं ठरलं.
तिसऱ्या दिवशी युनिकमधले चौघं-पाचजण सकाळी वारकऱ्यांबरोबर निघाले पंढरीच्या वारीला. पुणे-हडपसर असं आठ किलोमीटर चालत त्यांनी शेकडो वारकऱ्यांशी अयोध्येतील राममंदिर वादाबद्दल गप्पा मारल्या. अयोध्येत राम मंदिर बांधावं का आणि बांधायचं असल्यास मशीद पाडून मंदिर बांधावं का, असे प्रश्न विचारले. वारकऱ्यांकडून उलटसुलट उत्तरं आली. ‘मंदिर व्हावं पण मशीद पाडून नको’, किंवा ‘राम-रहीम एकच आहेत, त्यामुळे मंदिर काय नि मशीद काय’ असा एक समजुतदार स्वर अनेकांच्या बोलण्यात होता. पण बऱ्याचजणांची भावना आक्रमक प्रचाराने भारलेली होती. वारकऱ्यांशी केलेल्या गप्पा या काही शास्त्रीय पद्धतीने केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांत बसणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे किती टक्के वारकऱ्यांचं काय म्हणणं आहे, वगैरे गोष्टी त्यातून स्पष्ट होत नव्हत्या. पण शितावरून भाताची परीक्षा या न्यायाने वारकरी संप्रदायाच्या समन्वयवादी आणि उदारमतवादी विचारावर कर्मठपणाचं लेपन होत असल्याचं कळत होतं. संत शिकवणुकीची मूस वितळतेय की काय असं वाटायला लावणाऱ्या या प्रतिक्रिया होत्या.
असे अनेक विषय युनिकने वाचकांसमोर आणले.
दिवाळी अंकांसाठी शोधलेख लिहिले गेले आणि पुढे त्या दणदणीत लेखांचं पुस्तक झालं, असं उदाहरण म्हणजे अर्धी मुंबई. मुंबईची आपल्याला माहिती आहे ती अगदी तोकडी. धारावी, भेंडीबाजार, आग्रीपाडा या ठिकाणांची नुसती नावं ऐकलेली असते, पण या वस्त्यांमधलं वास्तव माहिती नसतं. ते काम `युनिक`ने अंगावर घेतलं.
‘साप्ताहिक’च्या दिवाळी अंकात `युनिक` मित्रांनी लिहिलेला पहिला लेख होता-‘धारावी’. पुढच्या वर्षी लिहिलं भेंडीबाजारवर. मग गिरणगाववर. असं एकेक करत मुंबईतल्या कष्टकरी वस्त्यांचं जगणं शोधलं गेलं आणि त्यावर दिवाळी अंकांमधून लिहीलं गेलं. सहा-आठ-दहा पत्रकारांचा गट चार-चार महिने एकेका विषयावर काम करत असे. त्यांच्या सामूहिक मेहनतीतून एकेक लेख उभा राहत असे. एकीकडे रक्त आटवणारा आणि त्याच वेळेस कमालीचं समाधान मिळवून देणारा हा उपक्रम एक-दोन नव्हे; तब्बल आठ वर्षं `युनिक`ने चालवला. विजय तेंडुलकर यांनाही ही शोधाशोध खूप महत्त्वाची वाटे. त्यामुळेच या शोधलेखांचं संकलन करून २००१ साली ‘अर्धी मुंबई’ हे पुस्तक प्रकाशित झालं, तेव्हा त्यांनी आनंदाने आणि आत्मीयतेने प्रस्तावना लिहून दिली.
अशाच प्रकारचं दुसरं पुस्तक म्हणजे देवाच्या नावानं. पण हे पुस्तक मात्र पूर्वनियोजित आराखड्यानुसार तयार झालं.
आपल्याकडे कोणत्याही अन्य समाजांप्रमाणे देवस्थानांचा प्रभाव अंमळ जास्त आहे. जुन्या, प्राचीन, पारंपरिक देवस्थानांप्रमाणेच गेल्या पन्नास-शंभर वर्षांत निर्माण झालेल्या देवस्थानांकडेही आपला ओढा आहे. एवढंच काय, गेल्या दहा-वीस वर्षांतही काही देवस्थानं उदयाला आली आहेत आणि तिकडेही लोक दर्शनासाठी जात असतात. हा फेनॉमेनॉ समजून घ्यायला हवा, असं `युनिक`ला वाटत होतं. देव, धर्म, श्रद्धा, भक्ती ही सर्वसामान्य माणसाच्या जगण्याची अनिवार्य गरज आहे, ही बरोबर. परंतु लोेकांच्या श्रद्धेतून देवस्थान नावाचं एक केंद्र आकारत जातं आणि हे केंद्र कधी कधी धार्मिक बाबींप्रमाणेच समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहारांमध्येही कार्यरत होतं, असा अनुभव येत होता. देवस्थानं ही राजकीय व्यवहारांत लक्ष घालत आहेत, ही बाब राजकीय अभ्यासकांच्याही लक्षात येत होती. त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाच्या मदतीने एक सविस्तर प्रश्‍नावली तयार केली गेली आणि त्या- आधारे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांचा एकेक करून अभ्यास करायचं ठरलं. ‘महाराष्ट्रातील वाढती धार्मिकता आणि देवस्थानांचा वाढता पसारा’ या विषयाच्या अनुषंगाने शोध घ्यायचा ठरलं. प्रत्यक्षात त्याहीपुढे जाऊन या शोधाला देवस्थानांच्या अर्थ राजकीय अभ्यासाचं स्वरूप प्राप्त झालं.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content