निळू दामले

NILU-DAMLE.jpg

निळू दामले हे जगभर भ्रमंती करून मराठी पत्रकारिता आणि साहित्यविश्वाला समृद्ध करणारे एकमेव मराठी पत्रकार म्हणून ओळखले जातात. मराठीमध्ये आजवर कधीही न हाताळले गेलेले विषय निळू दामले यांनी आपल्या साहित्यातून वाचकांसमोर आणले. सतत नव्याचा शोध घेत राहणारा पत्रकार असं दामले यांचं वर्णन करावं लागेल.
समाजवादी विचारात जडणघडण झालेल्या निळू दामले यांच्या पत्रकारितेची सुरुवात अनंतराव भालेराव यांच्या मराठवाडा दैनिकातून झाली. तिथे ते भालेरावांचे विश्वासू सहकारी होते. मराठवाडानंतर ते मुंबईला गेले. त्यांनी काही काळ कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांचे सचिव म्हणून काम पाहिलं. या काळात कामगार चळवळींशी आणि समाजवादी राजकारणाशी त्यांचा जवळून संबंध आला. याचदरम्यान मुंबईतल्या धडपड्या तरुणांनी दिनांक नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. त्यात दामलेंचाही समावेश होता. अशोक शहाणे यांच्या सोबतीने दामले यांनी या साप्ताहिकाचं संपादन केलं. निर्भिडपणे आणि कप्लकतेने आसपासच्या घडामोडी हाताळणारं दिनांक हे त्या प्रकारचं मराठीतलं पहिलंच साप्ताहिक म्हणावं लागेल.
दिनांकबरोबरच दामले यांनी माणूस, मनोहर या साप्ताहिकांतूनही लिखाण करण्यास सुरुवात केली. विषय महत्त्वाचा वाटला की खिशात पैसे असोत किंवा नसोत, जिथे जायचं तिथे कोणी ओळखीचं असो-नसो, विषयाचा माग काढत जायचं, कुठेही रहायचं आणि तो विषय पूर्ण उकलून दाखवायचा ही त्यांच्या कामाची पद्धत. संपूर्ण अज्ञात विषयांना हात घालण्याचं धाडस आणि वाचकांना त्या त्या विषयाची रपेट घडवत लिहिण्याची हातोटी यामुळे दामले यांचं लिखाण लवकरच वाचकप्रिय बनलं. मराठी नियतकालिकांमधून लिहीत असतानाच त्यांनी दिनमान सारख्या हिंदी नियतकालिकातही लिखाण केलं.
निळू दामले यांचं वेगळेपण समजून घ्यायचं तर त्यांनी हाताळलेल्या विषयांमध्ये डोकावून बघायला हवं. टेलिव्हीजनसारखं माध्यम खेडोपाड्यात पोहोचलं तेव्हा त्याचा लोकांवर काय परिणाम झाला आहे हे समजून घेण्यासाठी दामले महाराष्ट्रभर फिरले. त्यातून त्यांनी टेलीवर्तन हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर त्यांनी आजवर वेगवेगळ्या विषयांवर २०हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत.
`बॉम्बस्फोटानंतरचं मालेगाव हे निळू दामले यांचं आणखी एक महत्त्वाचं पुस्तक. बॉम्बस्फोट झाल्यानंतर मालेगावमधल्या मुस्लिम समाजावर त्याचा काय परिणाम झाला, याचा शोध घेण्याचं काम दामले यांनी बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांच्या घरी जाऊन, मालेगावमधले ताणेबाणे समजून घेऊन केलं आहे.
त्यांची पुस्तकं बदलत्या समाजजीवनाचा, आर्थिक घडामोडी आणि नवं तंत्रज्ञान याचा समाजावर होणा-या परिणामांचा माग घेतात. महाराष्ट्रातला दुष्काळ समजून घेण्यासाठी जसे ते जतमध्ये फिरले, तसेच इथिओपिया आणि साउथ कोरियातही त्यांनी भटकंती केली. अमेरिकेतल्या राजकारणावर देशात बसून बोलणारी मंडळी आपल्याकडे कमी नाहीत, पण हे राजकारण प्रत्यक्ष अमेरिकेत जाऊन समजून घेण्याचं काम करणारे दामले हे मराठीतले एकमेव पत्रकार.
धर्म आणि त्याभोवतीचं राजकारण-समाजकारण हा निळू दामले यांच्या जिव्हाळ्याचा विषय. विशेषतः इस्लाम आणि दहशतवाद यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी दामले यांनी जगभर भटकंती केली. इस्लाम राजवटींमधल्या विविध देशांतलं जनमानस समजून घेऊन त्यांनी लिहिलेलं धर्मवादळ हे पुस्तक समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. हे पुस्तक म्हणजे आधुनिक काळात धर्माचा पत्रकारितेच्या अंगाने अभ्यास कसा करता येऊ शकतो हे सांगणारा दस्तावेज आहे. दामले यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं लिखाण प्रत्यक्ष लोकांशी बोलून, मुलाखती घेऊन, निरीक्षणं नोंदवून, वातावरणातले अंडरकरंट्स समजून घेऊन केलेलं असतंच, पण त्याचबरोबर त्या विषयातल्या विविध पुस्तकांचा संदर्भही त्या लिखाणाला सहजपणे जोडलेला असतो.
लंडन बॉम्बिंग, इस्तंबूल ते कैरो, अवघड अफगाणिस्तान, पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान, जेरुसलेम, ओसामा - त्याचा इस्लाम, त्यांचा कायदा अशा अनेक पुस्तकांमधून निळू दामले यांनी परदेशातलं, विशेषतः मुस्लिम देशांमधलं समाजजीवन मराठी लोकांसमोर आणलं.
महाराष्ट्रातले विषयही जागतिक संदर्भाशी जोडून बघण्याचं कामही दामले यांनी केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर दुष्काळ-सुकाळ या पुस्तकाचं द्यावं लागेल. जत हा दक्षिण महाराष्ट्रातला वर्षानुवर्षं दुष्काळी राहिलेला तालुका. जत तालुक्यातली परिस्थिती बदलत का नाही, हे समजून घेतलं तर कदाचित आपला भारत बदलत का नाही या प्रश्‍नाचं उत्तर मिळू शकेल, असं त्यांना वाटलं. या तालुक्याचं नशीब बदलत का नाही, हा प्रश्‍न विचारत निळू दामलेंनी हा परिसर पालथा घातला. तिथल सर्वसामान्य लोकांना बोलतं केलं, पत्रकारांची मतं घेतली, जाणत्या-विचारी मंडळींशी चर्चा केला. या प्रवासातून तालुक्याला टंचाईग्रस्त बनवणारी दुष्काळापल्याडची जातीभेदापासून अंधश्रद्धांर्पंतची अनेक कारणंही त्यांनी शोधून दाखवली. पण निळू दामले फक्त जतचं वर्णन करून थांबले नाहीत. ज्या देशांनी जतसारख्याच परिस्थितीवर मात केली, तिथे हे कसं घडलं हे सांगण्यासाठी ते आपल्याला चीन, दक्षिण कोरिया आणि इथिओपिया अशा तीन वेगवेगळी पार्श्‍वभूमी असणा-या देशांची सामाजिक-आर्थिक भटकंती घडवून आणतात.
आपला समाज भौतिक प्रगती करण्यात मागे का हे समजून घेणं हा दामले यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे आर्थिक बदल आणि नवं तंत्रज्ञान यांना जग कसं आपलंसं करतं आणि भारतीय समाज त्यांचं काय करतो हे समजून घेण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. त्यामुळेच एक संपूर्ण वेगळा विषय मराठी वाचकांना सामोरा जातो.

निळू दामले यांची पुस्तकं—
माणूस आणि झाड
जेरुसलेम
अवघड अफगाणिस्तान
इस्तंबूल ते कैरो
लंड बॉम्बिंग
बॉम्बस्फोटानंतरचं मालेगाव
उस्मानाबादची साखर आणि जागतिक बाजारपेठ
धर्मवादळ
बदलता अमेरिका
लवासा
पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान
टेक्नियम
ओसामा: त्याचा इस्लाम, त्याचा कायदा
माहितीपर - आयलंड्स ऑफ डेव्हलपमेंट, माध्यम अडव्होकसी, टेलीवर्तन
कादंबरी - पारध, घटपर्णी, दोन हजार एक

निळू दामले यांनी मुंबईतील देढ गल्ली येथे पहाटे चार वाजता भरणाऱ्या चप्पल आणि बुटांच्या बाजारात फिरून बनवलेली देढ गल्ली ही छोटी डॉक्युमेंटरी

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content