उज्ज्वला अन्नछत्रे

शाळेत शिकवलेल्या सुन्दर कविता थोड्या व्यापक अर्थानं कळायला लागल्यावर त्या पुन्हा पुन्हा वाचून पाठ होउन जाणं, त्यातल्या नादमधुर शब्दांनी लोभावुन जाणं, आवडत्या गद्याचे उतारेच्या उतारे सहजपणे आठवणं हे व्हायला लागलं. पुढे आवडते साहित्यिक, कवी, यांच्या साहित्याची पारायणं होऊ लागली आणि साहित्य संमेलनाचं अप्रुप वाटायला लागलं! दर वर्षी संमेलनाचे वारे वहायला लागले, की एक वेगळाच उत्साह निर्माण व्हायचा. जेंव्हा साहित्य संमेलनात सहभागी व्हायची संधी मिळाली, तेंव्हाचा आनंद अवर्णनीयच! बार्शीच्या ५४व्या अधिवेशनात कविता वाचल्या, कौतुक झालंच, पण ज्यांच्या कवितांवर,
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे
या शब्दांवर प्रेम केलं, त्या प्रत्यक्ष ना. धो. महानोरांनी स्वत: थांबून गप्पा मारल्या ! तासभर झाला तरी मला त्यांच्याशी कितीतरी अधिक बोलायचंच होतं. त्यानंतर योगिनी जोगळेकर आल्या आणि गप्पांना वेगळं वळण मिळालं. संमेलनासाठी घातलेल्या मांडवातील दालनांत मोठमोठ्या फलकांवर माझ्या आवडत्या- आणि कित्येक न वाचलेल्या कविता होत्या. काहींवर त्या अनुषंगाने चित्रंही काढलेली होती. हे असं सगळं एकत्रितपणे वाचायला मिळाल्याचा केवढा आनंद! जेवायला बसताना लक्षात आलं, आज या थोर साहित्यिकांबरोबर भोजनाचा लाभ आहे! नुकतीच कॉलेजची पायरी चढलेली मी या अनुभवानी हरखुन गेले होते! आवारात येता-जाता दिसणारे काही चेहरे बघून ओठांवर सहजच ओळखीचं हसू येत होतं आणि मग लक्षात यायचं, आपण यांचे फोटो पुस्तकांवर, वर्तमान पत्रांत पाहिलेले आहेत, TV वर यांना पाहिलं ऐकलं आहे! आणि तरीही जेंव्हा गप्पा मारण्याची, काही बोलण्याची संधी मिळाली, तेंव्हा खूप ओळख असल्याप्रमाणे ते आपल्याशी बोलताहेत!
गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर अशासारख्यांची व्याख्यानं, मोठमोठे परिसंवाद, आणि त्यानिमित्तानी झालेलं विचारमंथन, कविंनी स्वत: वाचून दाखवलेल्या, गायलेल्या त्यांच्या कविता! ग्रंथ दिंडी! दोन-अडीच दिवस एखाद्या स्वप्नात असल्याप्रमाणे मी भारावून गेले होते! आणि आजही आठवणीतले ते दिवस स्वप्नाप्रमाणे भासतात!
त्यानंतर शक्य तेंव्हा संमेलनांना समव्यसनेषुंसह हजेरी लावली, उत्सवासारखे दिवस! ते आवडलेल्या कविता पुन:पुन्हा म्हणणं, परिसंवादात ऐकलेली मतं मित्र-मैत्रिणिंबरोबर वाटणं आणि त्यानंतर परिसंवादातिल विषयांवर ग्रुप मधे हिरीरीने घातलेले वाद! पुढचे सहा महिने संमेलनाचा धागा आमच्या बोलण्यात असे!

मला वाटतं, संमेलनांमुळे साहित्याची वेगवेगळ्या अंगांनी झालेली ही ओळख असे, समजणं असे. विचारांना प्रवृत्त करणं, स्वत:ची मतं पक्की होणं,जीवनातील विविध अंगांकडे पाहण्याची दृष्टी जास्त प्रगल्भ होणं आणि सौंदर्याचा वेगवेगळ्या अंगांनी आस्वाद घेणं या साऱ्या गोष्टी आयुष्यात ठळक होत गेल्या.
पुढे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य असे लेखक-वाचकांनी साहित्याचे वेगवेगळे निकष ठरवले, तरी मराठी भाषेत लिहिल्या गेलेल्या साऱ्या साहित्यावर आम्ही तेवढंच प्रेम केलं, आणि या साहित्यानी आमचं जीवन समृद्ध होत गेलं.
पुढे देश सुटला आणि हा उत्सवही लांबच गेला मग!
पण पुण्यात आलं कि ज्योत्स्ना नाईक सारखी सख्खी मैत्रिण आवडलेले लेख माझ्यासाठी जपून ठेवते, आवडलेली पुस्तकं वाचायला देण्यासाठी वेगळी काढून ठेवते- सुनिला आवडलेल्या लेखांच्या लिंक्स पाठवते, प्रद्न्या-मेधा आणि मित्रमैत्रिणी पुस्तकं भेट देतात आणि वाचनीय पुस्तकांबद्दल tips देतात. कधी कधी दूरध्वनीवरून एखाद्या पुस्तकावर-विषयावर चर्चा होतात. मग इथून निघताना जास्तीत जास्त पुस्तकं bag मधे भरली जातात.
आणि तिथे परदेशात वास्तव्यासाठी आलेल्या भारतीय स्नेहयांबरोबर पुस्तकांची देवाणघेवाण- मग ती पुस्तकं हिंदी-इंग्रजी का असेनात- आणि आस्वाद घेणं,त्यांच्याशी त्यावर चर्चा करणं. तिकडे सहज उपलब्ध असलेलं- इंग्रजी आणि इतर भाषांमधलं भाषांतरित (इंग्रजीतून) साहित्य वाचायला मिळतं, ते वाचते. त्या-त्या देशात राहिल्याने काही भाषा थोड्या-फार शिकल्या गेल्या, त्यातुन हाताशी आलेल्या थोड्याफार कविता, लोकगीतं- यांचं भाषांतर केलं - करते- आणि या ना त्या निमित्ताने साहित्याशी संबंध जोडत रहाते. तिथल्या एखाद्या तमारा बरोबर, अमालिया बरोबर त्यांनी वाचलेल्या युरोपियन लेखक कविंच्या साहित्यावरील मतांची देवाणघेवाण होते – त्यातून तिथल्या सामाजिक - राजकीय परिस्थितीची- स्थित्यंतरांची जास्तच जाणीव होते- वेगवेगळ्या प्रदेश- संस्कृतींमधून साहित्य कसं फुलतं, ते पहायला मिळतं.
लेकीला नवं काही वाचलं की सांगते- अगं चैतू, माया अेंजेलोची The Caged Bird कविता सुंदर आहे- तशी ती लगेच म्हणते- तिची Still I Rise वाच अगं, तुला फार आवडेल. ती आणि तिच्या मैत्रिणींशी बोलत असताना सहज पाब्लो नेरुदांचा उल्लेख केला की सिल्व्हिया प्लाथ, एमिली डिकन्सन पासून युजिनो मोंताल ते Dan Brown पर्यंत सगळयांची उजळणी होते तेंव्हा पु. लंच्या नाटकातील लहानपणी ऐकून पाठ झालेले संवाद, प्र. नां चा लंपन यांच्याही आठवणी निघतात आणि या देवाणघेवाणीतून मला त्यांच्याकडून मिळालेली -वाचायलाच हवंय- ची List …
पण पुण्यातले ते दिवस आठवले की वाटतं,त्या हवेलाही साहित्याचा मधुर वास होता आणि साहित्य संमेलनाच्या दिवसांत सारे पुणेकर आपल्यापुरतं लिहित असावेत.. त्या संमेलनांचा गुण प्रत्येकालाच लागत असावा!
3 वर्षांपूर्वी अवधानी सर मला म्हणाले, यावेळच्या आमच्या ई-संमेलनाची तू रोमानियातून साक्षीदार होऊ शकतेस! हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. ई-संमेलनाचं स्वरूप माहित नव्हतं, मग आधी झालेली ई-संमेलनं पाहिली- त्या त्या संमेलनाध्यक्षांची साहित्यिक म्हणून झालेली जडणघडण, व्यक्ती आणि साहित्यिक म्हणून वरिष्ठ साहित्यिकांचे त्यांच्यावर झालेले संस्कार, त्याचबरोबरीने समाज, आसपासचं वातावरण, लोकसाहित्याचा त्यांनी घेतलेला आस्वाद- आणि संस्कार आणि कधी घर-समाजाचा विरोध पत्करूनही साहित्याशी ठेवलेली बांधिलकी हे सगळं ऐकायला मिळणं ही सुंदर संधी उपलब्ध झाली. त्यांच्या कविता प्रत्यक्ष त्यांच्या आवाजात ऐकायला मिळाल्या…
मित्र- मैत्रिणिंशी प्रत्यक्ष गप्पा नसल्या तरी त्यातून सुचवलेल्या वेगवेगळ्या ब्लॉग लिंक्स मधून स्वत:चं साहित्याचं एक सुंदर विश्व निर्माण करणाऱ्यांच्या अंतरंगात डोकावायला मिळालं…
मला वाटतं पुढे जाऊन या ई-संमेलनात ई-परिसंवाद (Webinars) आयोजित होतील, इतरही कवींच्या कविता त्यांच्या आवाजात ऐकायला मिळतिल…
युनिक फीचर्सची ही ई-संमेलनं अधिकाधिक समृद्ध होत जातील.
उज्ज्वला अन्नछत्रे, रोमानिया.

साहित्यिक दस्तावेज

मराठीतल्या निवडक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांविषयीची माहिती दस्तऐवज स्वरूपात नोंदवून ठेवण्याचा उपक्रम आम्ही यंदा सलग तिसऱ्या वर्षीही राबवत आहोत. हा उपक्रम यापुढेही सुरू राहणार आहे.

लिहिण्याची भाषा

देवनागरी / मराठी
Roman / English
F12 बटणाने भाषा कुठूनही बदलता येते...

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

मराठी ई साहित्य संमेलनाचं हे पाचवं वर्ष. साहित्य संमेलन हे केवळ साहित्यिक वर्तुळापुरतं मर्यादित न राहता त्याची नाळ समाजाशी-वाचकांशी जोडलेली असावी, या हेतूने हे ई-संमेलन सुरू झालं. तळागाळातल्या कष्टकऱ्यांचं जीणं मराठी साहित्यात प्रतिबिंबित करणारे ज्येष्ठ लेखक अनिल अवचट यंदा संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
पुढे वाचा

samelan_14_small_banner.jpg
samelan_13_small_banner_0.jpg
युनिक फीचर्स' आणि 'अनुभव मासिक' आयोजित दुसरे मराठी ई-साहित्य संमेलन
e-sammelan-2011.png

पाचव्या ई-संमेलनाचे वेबपार्टनर

आणखी व्हिडिओ

मुलांसाठी ऑडिओ गोष्टी- पासवर्ड गप्पाटप्पा

दोन वर्षांपासून आम्ही युनिक फीचर्सतर्फे टीनएजर मुला-मुलींसाठी पासवर्ड हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षी या टेक्नोसॅव्ही मुलांसाठी
'स्नॉवेल' या कंपनीसोबत एक ऑडिओ अंकही तयार केला. त्या अंकातले काही तुकडे ई-संमेलनाच्या माध्यमातून रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.

Syndicate content