शि. द. फडणीस

माझं शिक्षण सुरू असतानाच माझी चित्रकारिता सुरू झाली होती. माझं शिक्षण तसं अप्लाइड आर्टमधील म्हणजे जाहिराती बनवणे इत्यादी. त्या काळात व्यंगचित्रं, मग रंगीत मुखपृष्ठं करणे यातून मी मुखपृष्ठाकडे वळलो. ती लोकांना आवडली. मग लेखक, प्रकाशक यांच्याकडून मला त्याविषयी विचारणा झाली. आमच्या पुस्तकांना तुम्ही कव्हर द्याल का अशी विचारणा झाली. तो माझा पहिला सन्मान होता आणि ओळखही. वि. आ. बुवा, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार अशा लेखकांच्या पुस्तकांना मी मुखपृष्ठं बनवून दिलीत. प्रथम भर जरी व्यंगचित्रांवर असला तरी नंतर मी गंभीर विषयांकडेही वळलो. ना. सी. फडक्यांच्या कादंब-यांना मी कव्हर्स दिली. सावरकरांच्या ‘काळे पाणी’चे मुखपृष्ठ मी तयार केले. नंतर साहित्यबाह्य अशा विषयांवर म्हणजे आरोग्य, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, गणित अशा विषयांच्या पुस्तकांना कव्हर्स दिली.

सुरूवातीच्या काळात मुखपृष्ठ काढण्यामागे काही एक विचार प्रक्रिया असते याची प्रकाशकांना किंवा लेखकांनाही कल्पना नसायची. आम्हीच त्यांना मग काही तरी सुचवायचो, त्याला ते होकार द्यायचे आणि कव्हर बनायचं. त्यांच्या कव्हरबाबतच्या अपेक्षा फार कमी होत्या. ते पुस्तकाची सजावट करतं आणि विक्रीसाठी मदत करतं, एवढीच त्यांची धारणा होती. यामागे काही व्हिज्युअल थिंकिंग असतं हे त्यांच्या गावीही नसायचं. नंतरच्या काळात हे बदतल गेलं. आता लेखक, प्रकाशक किंवा संपादक स्वतःहून सूचना करतात, टिप्स देतात किंवा ब्रिफ करतात, की असा असा या पुस्तकाचा आशय आहे, त्यावर असं असं कव्हर तयार करता येईल का? अशी विचारणा ते आता करतात. हे पूर्वी होत नव्हतं. माझ्या मते वाचक पुस्तक वाचण्याआधी त्याचं कव्हर वाचत असतो. ते कव्हर त्याला त्या पुस्तकाच्या आशयाकडे घेऊन जातं. पण काहींचा आक्षेप असतो की साहित्याचा आणि चित्राचा काय संबंध आहे? पण तसं ते नाही. चित्रामुळे ती गोष्ट चटकन समजायला मदत होते. त्यामुळे एखादं कव्हर पाहिलं की लोकांना कळतं की हा हा विषय आहे, हे पुस्तक घ्यायला पाहिजे. नाही तर त्याला तो विषय समजून घ्यायला पूर्ण पुस्तक वाचावं लागेल. त्यामुळे चित्रकार किती समर्पकतेने आपल्या कव्हरमधून तो विषय उभा करतो तेवढं ते कव्हर चांगलं बनतं.

काही लोक असंही म्हणतात की आम्हाला आमचे अनुभव शब्दांतूनच मांडायचे आहेत, त्याचं चित्रात रूपांतर करायचं नाही. पण जे शब्दांत मांडता येत नाही ते चित्रांतून मांडता येतं, ही गोष्ट ते विसरतात. चित्र हे त्या साहित्याचं रूपांतर नाही, तर त्यात जे आलं नाही ते व्यक्त करण्याचं माध्यम आहे, लिखित शब्दांच्या पुढची पायरी आहे. जे काही तरी शब्दांत आलं नाही ते या चित्रात येतं. मी जेव्हा गंभीर विषयांची कव्हर्स करतो तेव्हा लोक विचारतात की यासाठी तुम्ही अभ्यास करता का? तर नाही. ते अशक्य आहे. पण मला एक गोष्ट समजते की कोणताही विषय हा कोठे तरी मानवी जीवनाशी भिडलेला असतो. एकदा हे नातं कळलं की चित्र साकारू लागतं. हे नातं जाणण्याची कुवत किती आहे यावर त्याचं यश असतं. मुलांसाठीची गणिताची पुस्तकं मी केली तेव्हा आधी ती शाळेतल्या मुलांना दाखवण्यात आली. त्यांना ती समजल्यानंतरच मी इयत्ता पहिलीच्या गणित विषयात उत्तीर्ण झालो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही जे चित्रातून सांगू इच्छिता तेच बघणा-याला कळायला हवं. तुम्हीदेखील दुर्बोध विषयाला दुर्बोध चित्र काढली तर ते वाचकांना समजणार कसं? पण सोपं करणं म्हणजे तो विषय पातळ करणं नव्हे.

मला स्वतःला सृजनाच्या पातळीवर व्यंगचित्रं काढणं हे एक आव्हान वाटतं. त्यात अजूनही मला नव्या गोष्टी जाणवतात. त्यामुळे माझा त्याच्याकडे जरा जास्त ओढा आहे. माझ्या चित्रांमधून कंटेन्ट येणं आणि तो लोकांना समजणं हे मला महत्त्वाचं वाटतं. माझी चित्रं लोकांशी बोलायला हवीत. तसं झालं तर ते माझं यश. माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी हेच करायचा प्रयत्न केला आहे.
..............................................

घुसळण कट्टा

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा