बालांची पुस्तकमैत्री..
मुलं पुस्तकांपर्यंत जात नाहीत ? मग पुस्तकांनाच मुलांकडे न्या !
ही भूमिका आहे, विदर्भात सुरू असलेल्या बालवाचनालयांच्या ‘पुस्तकमैत्री’ या छोट्याशा पण महत्त्वाच्या चळवळीची. कमीत कमी खर्चात, मुलांना फक्त वाचनातच नाही तर वाचनालय चालवण्यातही सहभागी करून घेतलंय या चळवळीने. त्याला आज ब-याच ठिकाणी मुलांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे.
वाचनालयांची रूढ चौकट काहीशी मोडणारी ही संकल्पना आहे. हे वाचनालय म्हणजे काय, तर एक पुस्तकांची पेटी. वाचनालय चालवू इच्छिणा-या कुणाच्या तरी घरात ती ठेवली जाते. त्यासाठी कुठलंही डिपॉझिट नाही की आणखी कुठली फी नाही. सदस्यत्व मोफत. पुस्तक हरवलं किंवा खराब झालंच तर शिक्षा म्हणजे तेवढ्याच किमतीचं पुस्तक वाचनालयात आणून द्यायचं. मुलांनी वाचावं एवढाच उद्देश. म्हणूनच इथली पुस्तकंही त्यांना आवडतील अशा विषयांची आहेत. हा देण्याघेण्याचा व्यवहार बघायचा, त्याची नोंद ठेवायची तीही मुलांनीच. बुलढाणा जिल्ह्यात अशी पन्नास बालवाचनालयं सध्या सुरू आहेत आणि त्यांची सदस्यसंख्या शेकडोमध्ये आहे !
आहे की नाही हवंहवंसं चित्र? ते निर्माण झालंय एका छोट्याशा खेळातून. या भागातले पत्रकार-लेखक असलेले नरेंद्र लांजेवार हे या उपक्रमाचे प्रणेते. त्यांचा लहान मुलगा आपल्याकडची गोष्टीची पुस्तकं आपल्या मित्रमैत्रिणींना आळीपाळीने देऊ लागला आणि मुलंही उत्सुकतेने, रस घेऊन ती पुस्तकं वाचू लागली. हे लांजेवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बालकवी विनोद देशमुख आणि संगीत शिक्षक रविकिरण टाकळकर या आपल्या मित्रांपुढे हे पुढे नेण्याची कल्पना मांडली आणि पैसेही उभे केले. सुरूवातीला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाने त्यांना प्रोत्साहन मिळालं. नंतर महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पन्नास बालवाचनालयं सुरू करण्याचा त्यांनी केला आणि तो अनेकांच्या मदतीने पूर्णही केला. विशेष म्हणजे शासनाचं कुठलंही अनुदान न घेता हे सगळं सुरू आहे. त्याचा खर्च हा बहुतांशी देणग्यांच्या माध्यमातूनच होतो आहे. एक वाचनालय सुरू करण्यासाठी काही हजारांची देणगी पुरेशी ठरते. रक्कम त्या मानाने कमी असल्याने देणारे अनेक हात पुढे आले आणि येत आहेत आणि ही चळवळ तोलून धरताहेत.
एका छोट्याशा उपक्रमाचं चळवळीत रुपांतर झालं, कारण त्यातला सोपेपणा आणि सहजता. दीड-दोनशे पुस्तकं मावतील एवढ्या पेटीसाठी घरात थोडीशी जागा एवढीच गरज. रोज ५ ते ६ या एक तासात पुस्तकांचा व्यवहार या केंद्रांमध्ये होतो. रजिस्टरमध्ये फक्त नोंद करायची आणि पुस्तक घेऊन जायचं. मुलांच्या या व्यवहारात कुठेही मोठ्यांची लुडबुड नसते. आपलेच मित्रमैत्रिण पुस्तकं देणार असल्याने मुलं वाचनालयाशी लवकर जोडली जातात हेसुद्धा त्याला मिळणा-या चांगल्या प्रतिसादाचं एक मह्त्त्वाचं कारण. आज इथल्या काही केंद्रांवर पुस्तकं बदलण्याच्या वेळेत चक्क रांगा लागलेल्या असतात. मुलं पुस्तकांबद्दल एकमेकांशी बोलतात. टीव्हीच्या प्रभावातून बाहेर येऊन मित्रांसोबत गोष्टींमध्ये रमतात.
यातली काही केंद्र ही झोपडपट्टीत आणि मुस्लिमबहुल भागातही आहेत. कमी शिकलेल्या गरीब मुलांची वाचनाची भूक खूपच मोठी असते असं नरेंद्र लांजेवार यांचं एक निरीक्षण आहे. कॉम्प्युटर, टीव्ही हे शहरी मुलांचे मनोरंजनाचे पर्याय ग्रामीण भागात फारच कमी असतात. शिवाय नवीन गोष्टींबद्दल माहिती, ज्ञान मिळवण्याच्या संधीही मर्यादित असतात. त्यामुळेच इथे पुस्तकं प्रचंड ओढीने वाचली जातात. या पुस्तकांमधली वीस टक्के पुस्तकं ही हिंदी आणि इंग्रजी भाषेत मुद्दाम ठेवली आहेत. शिवाय त्यांचे विषय निवडताना मुलांना ते आवडतील का हा निकष प्रामुख्याने पाळला जातो. त्यात मुलांवर कुठलीही विचारधारा थोपण्याचा आविर्भाव नाही. आज इथल्या इंग्रजी माध्यमांत शिकणा-या मुलांना त्यांचे पालक मुद्दाम या वाचनालयात पाठवत आहेत. कुठलंही फार मोठं स्ट्रक्चर उभं न करता जास्तीत जास्त सोप्या पण प्रभावी पद्धतीनं ही चळवळ सुरू आहे. मुलं वाचतात. त्यांना त्यांचं भावविश्व समृद्ध करणा-या पुस्तकांशी सहज जोडणं शक्य आहे. फक्त त्यांना आवडणारे विषय, पुस्तकांचं त्यांच्यापर्यंत पोचणं हे झालं पाहिजे, असा विश्वास या चळवळीने मोठ्यांना दिला आहे.
नरेंद्र लांजेवार.
मोबाईलः ९४२२१८०४५१.
बातम्यांच्या पलीकडे
मुखपृष्ठकार
वितरक/विक्रेते
ई-संमेलन कशासाठी? - भूमिका
'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.
गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा

