रसिक साहित्य : योगेश नांदूरकर

पुस्तकं वाचली जात नाहीत अशी एक ओरड आपल्याकडे नेहमीच होते, पण मला ते मान्य नाही. वाचनाचं प्रमाण थोडं कमी झालं आहे एवढंच. दुसरं म्हणजे निव्वळ साहित्यिक पुस्तकांपेक्षा उपयुक्त पुस्तकं वाचण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. आणि तसं होत आहे म्हणूनच पुस्तकविक्रीची प्रदर्शनं भरत आहेत. विक्री वाढावी म्हणून मार्केटिंगची नवी तंत्रं आत्मसात केली जात आहेत. म्हणजे विक्री होत नाही असं नाही, पण लोकांपर्यंत पोचण्यात आम्ही कुठे तरी कमी पडतोय असं मला वाटतं. आपल्या इथे किमान ७०-८० लाख लोक आहेत जे संभाव्य ग्राहक ठरू शकतात, पण त्यांच्यापर्यंत पोचण्याची गरज आहे. ते होत नाही आहे, हा खरा प्रश्न आहे.

आम्ही स्वतः त्यासाठी काही उपक्रम सुरू केलेत, पण यात आम्ही एक काळजी घेतली, की जे बाकीचे करतील ते ‘रसिक साहित्य’ करणार नाही. याच्यामागे उद्देश असा, की स्पर्धा करायची नाही जमेल तर मदतच करायची इतर व्यवसायबंधूंना. आपण मग दुसरी वाट चोखाळायची. त्यामुळे आता ‘रसिक’ची प्रदर्शनं भरत नाहीत. कारण इतर अनेक लोक, संस्था यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही आता काही तरी नवीन करायचं ठरवलं आहे. यात वाचनालयावर आम्ही भर दिला आहे. यातील वेगळेपण म्हणजे हजार रुपये भरून आजीवन वर्गणीदार बना. सोबत बाराशे रुपयांची आपल्या आवडीची पुस्तकं मोफत घेऊन जा. लोकांना पुस्तकं बदलण्यासाठीही वेळ आजकाल मिळत नाही. म्हणून आम्ही मोबाइल वाचनालय सुरू केलं. ही ग्रंथ-गाडी महिन्यातून एकदा लोकांच्या घरी जाते. वाचक तिथे पुस्तकं बदलून नवी पुस्तकं घेऊ शकतात. यामुळे होतं काय, की लोक वाचन करतात आणि त्यात गुंतून राहतात. काय झालंय, की आपण पुस्तकांचा मूळ उद्देश विसरलोय. पुस्तकाचा मूळ उद्देश वाचन आहे, विक्री नाही. वाचनावर लक्ष दिलं की विक्री आपसूकच वाढतं. ‘रसिक’ ने ते सिद्ध केलंय. काय आहे, लोकांचं वाचन वाढलं तरच त्यांना पुस्तकांची गोडी लागेल, आणि मग ते स्वतःच त्यांच्या आवडीची पुस्तकं विकत घेऊन गोळा करतात.

दुसरं असं आहे, की बाहेरच्या मराठी लोकांना वाचनाची भूक आहे पण पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोचतच नाहीत. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय, पण अजून यात बरंच काही करायची गरज आहे. आमचं ‘साहित्यसूची’ मासिकही माहिती देण्याचं काम करतंय. ऑनलाइन वाचनात बेंगरूळू हे देशात आणि परदेशांत सॅन होजे, न्यूयॉर्क, यूके इथे पुस्तकांचा चांगला खप होतोय. मला असं वाटतं, की हे जे नवीन टेक्निकल नो-हाऊ आहे त्याचा पुस्तक व्यवसायातील लोकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. आजही या व्यवसायात कॉर्पोरेट संस्कृती आलेली नाही याचं मला वाईट वाटतं. त्याची खरी गरज आहे या व्यवसायाला. याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्याचा फार उपयोग होईल. मार्केटिंगच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरण्याची, या व्यवसायाला ग्लॅमर द्यायची गरज आहे. दुसरं म्हणजे पुस्तक विकलं गेलं म्हणजे काम संपत नाही. ते आधी वाचलं जाणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच ते पुस्तक लोकांपर्यंत पोचेल. आणि तसं झालं तरच लोक ते विकत घेतील.

गावागावांतील लोकांपर्यंत पोचण्यासाठी आजही व्यवस्थित नेटवर्क नाही. ते व्हायला हवं. यात व्यावसायिकता यायला हवी. हे झालं तर निश्चितच अनेक सकारात्मक बदल घडतील. बाकीच्या भाषांतील पुस्तकं लाखोंनी खपली जातात आणि आपली शेकडोंनी? हे बदलायचं तर सर्वांनी एकत्र येऊन काम करायची गरज आहे. पुस्तक हे एक माध्यम आहे, ते साहित्य नव्हे. हे समजून इतर मीडियाचा आपण पुस्तकविक्रीसाठी उपयोग केला पाहिजे. आम्ही आता यासाठी राज्यभरात विक्रीकेंद्रांचं स्थायी नेटवर्क उभं करतोय. शिवाय पुस्तकांचं एटीएम आम्ही सुरू करणार आहोत, जेणेकरून वाचकाला कोणत्याही वेळेस त्याच्या आवडीची पुस्तकं विकत घेता येतील. माझ्या मते तंत्रज्ञानाचा. व्यावसायिकतेचा उपयोग केला तर पुस्तक विक्रीला उज्ज्वल भविष्य आहे.

................................

घुसळण कट्टा

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा