पुस्तकं रुजवणारा माणूस
पुस्तक पेटी योजना आज नाशिक, पुणे आणि ठाणे इथे चांगल्या प्रकारे सुरू आहे. लोक पुस्तकांपर्यंत पोचत नसतील तर लोकांच्यापाशी पुस्तकं न्यायची, अशी ही ‘ग्रंथ तुमच्या दारी योजना’ आहे. त्याची सुरूवात अपघाताने झाली, शब्दशः अपघाताने. २००४ साली मला एक मोठा अपघात झाला. त्यातून मी वाचण्याची शक्यता फार कमी होती. पण मी वाचलो. बरा होण्याच्या त्या काळात मनात अनेक विचार येत होते. आपल्याला मिळालेली ही जगण्याची दुसरी संधी आता इतरांसाठी काही करण्यासाठी वापरायची हे त्यातून ठरलं. त्यातूनच मग ही पुस्तक पेटी योजनेची कल्पना सुचली. माझ्यासाठी हेच समाजसेवेचं एक माध्यम बनलं. मला वाचायची गोडी होती, त्यामुळे इतरांनीही वाचावं अशी इच्छा होती. हा उपक्रम सुरू करताना लोकांना एक रुपयाचाही खर्च येणार नाही अशीच योजना मी बनवली होती. मी लोकांना भेटतो, त्यांचे वाढदिवस टिपून घेतो आणि मग त्यांना सांगतो, की तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किमान एक पुस्तक विकत घेता येईल इतकी रक्कम तुम्ही कुसुमाग्रज प्रतिष्ठान ग्रंथालयाला दान करा. लोकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. आत्तापर्यंत मी यातून ३० लाख रुपयांची मदत मिळवली आहे. पुस्तकं जमा होत गेली तशा मनात वेगवेगळ्या कल्पना येत गेल्या. यातून पहिला उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झाला. एका पेटीत १०० पुस्तकं घालून मी ती पेटी महिनाभरासाठी एका ज्येष्ठ नागरिक संघाकडे दिली. हीच पुस्तक पेटी योजनेची सुरूवात ठरली. महिना भरला की पेटी दुस-या संघाकडे द्यायची. यानंतर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे मनोरंजन व्हावे म्हणून कंपनीतच पेटी ठेवली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. कामगार आणि उद्योजकांच्या सहभागातून अशा ११ पुस्तकपेट्या आज नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रात फिरत आहेत. मग मध्यवर्ती कारागृहात ही संकल्पना मी राबवली. त्यासाठी शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांची मदत मिळाली. मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वास ज्ञान प्रबोधिनी’च्या माध्यमातून ही योजना आम्ही सुरू केली. सध्या २४ शाळांमध्ये एकूण ४७ पेट्या फिरत आहेत. यापुढे हॉस्पिटल्सच्या आवारातही अशी पेटी ठेवण्याची योजना आहे. काळजीत असलेल्या लोकांना विनोदी पुस्तकं वाचायला देऊन त्यांची चिंता कमी करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. पंचवटी एक्स्प्रेसच्या पासधारक बोगीतही ही योजना लवकरच सुरू होणार आहे. आता हा प्रयोग आम्ही नाशिकबाहेर मालेगाव, ठाणे आणि पुणे शहरातही राबवत आहोत. ठाण्यात १५ आणि पुण्यात २५ पेट्या सध्या आम्ही ठेवल्या आहेत. पुस्तक वाचायची आवड बहुतेकांना असतेच पण लहानसहान गोष्टींमुळे ते शक्य होत नाही. या अडचणी दूर करण्याचा माझा हा प्रयत्न आहे आणि त्यात मला सर्वांचाच भरघोस पाठिंबा लाभलाय. आदरणीय राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही माझ्या या उपक्रमाची दखल घेऊन विशेष कौतुक केलं. अशा प्रोत्साहनामुळे यापुढेही हा उपक्रम वाढवत नेण्याचा माझा मानस आहे. त्याला सर्वांचाच पाठिंबा लाभेल याबद्दल मला विश्वास आहे.
विनायक रानडे
............................
बातम्यांच्या पलीकडे
मुखपृष्ठकार
वितरक/विक्रेते
ई-संमेलन कशासाठी? - भूमिका
'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.
गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा

