आनंद हर्डीकर

मी ग्रंथसंपादनात येण्याआधी पत्रकारितेत होतो. त्यामुळे या दोन टोकाच्या गोष्टी संपादित करण्याचा अनुभव मला मिळालेला आहे. दोघातला फरक थोडक्यात सांगायचा म्हणजे, वृत्तपत्राचा संपादक हा एखाद्या मोठ्या वाद्यवृंदाचं मंचीय सूत्रसंचालन करणारा समन्वयक असतो तर ग्रंथाचा संपादक हा मैफलीत गायन करणा-या कलावंताला संवादिनीवर साथ करणा-या साथीदारासारखा असतो. ग्रंथसंपादनात सुधारणेला बराच वाव असतो. लेखकांचं सहकार्य घेऊन पुस्तकाचा आशय अधिक खुलवण्याची, पुस्तक परिपूर्ण करण्याची संधी असते. आता यात लेखक आणि संपादक या दोन व्यक्तींच्या सुसंवादावर ग्रंथसंपादनाची क्रिया अवलंबून असल्याने त्यात व्यक्तिपरत्वे घटक बदलत जाऊ शकतात. त्यात सर्वांना समान लागू होणारी किमान सूत्रं ठरवण्यापलीकडे कशाचाही आग्रह धरणं अशक्य असतं. त्याचं अमूक एका साच्याचं पाठ्यपुस्तक तयार होऊ शकत नाही.

एखादी संहिता जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे येते तेव्हा मी ती अथपासून इतिपर्यंत वाचून बघतो. विषयाला लेखकाने किती न्याय दिला आहे, त्यातले पैलू नीट मांडले आहेत का, आवश्यक संदर्भ दिले आहेत का या निकषांवर ते लेखन तपासतो. कमतरता असेल तर लेखकाशी चर्चा करतो. त्याची तयारी असेल पुनर्रचनेसाठी त्याला पुरेसा वेळ देतो. मला शक्य असतील ते संदर्भ लेखकाला पुरवतो. संपादक या नात्याने मूळ संहितेचं मूल्य संवर्धन करण्याचा माझा तो प्रयत्न असतो. बहुतेक वेळा तो यशस्वी होतो पण कधी होतही नाही. कारण लेखकाची तयारी नसते. मग जर ती संहिता ६०-६५ टक्के गुणवत्तेची असेल तर तशीच स्विकारली जाते. तो विषय हातचा जाऊ नये हा त्यामागचा विचार असतो.

अनेकदा संहितेत सुधारणा सुचवताना लेखकाशी मतभेद होऊ शकतात. आपल्या निर्मितीविषयीचा त्याचा ईगो त्यात आड येऊ शकतो. शेवटी त्याने मेहनत घेऊन एक निर्मिती केलेली असते. त्याचे वाचन, चिंतन, मनन केलेले असते किंवा अंतःस्फूर्तीने प्रतिभेचा आविष्कार केलेला असतो. ते गृहित धरून मी कुठल्याही सूचना करण्यापूर्वी त्या लेखनाच्या गुणवैशिष्ट्यांना दाद देत असतो. पण प्रामाणिकपणे. स्ट्रॅटेजी म्हणून नाही. पण त्यामुळेच पुस्तक चांगलं व्हावं हाच माझा एकमेव हेतू आहे हे मला वेगळं सागावं लागत नाही. पुस्तकाच्या पुढच्या प्रक्रियेत मी सहप्रवासी व्हायला तयार आहे ही खात्री पटल्यामुळे अनेक लेखक संहितेतल्या सुधारणांना तयार होतात. दिलीप माजगावकर यांचं पाठबळ असल्याने मी हे करू शकतो हे इथे नक्की नमूद करावं लागेल. याशिवाय गेली कित्येक वर्षे विविध विषयांचा गृहपाठ करण्याची माझी सवयसुद्धा लेखकांबरोबरचं माझं नातं मैत्रीचं बनवते.

वैचारिक ग्रंथांचं संपादन करताना संपादकाचा खरा कस लागतो. कारण लेखकाच्या मताशी संपादकाची मतं जुळतीलच असं नसतं. पण मला वाटतं, लेखन प्रक्रिया परिपूर्णतेकडे नेणारे संपादन हे स्वभावतःच सहिष्णू असायला हवं. त्यात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती असू नये. माझ्यापुरतं सांगायचं तर माझ्यापुढे जी संहिता असते ती माझ्या मतांशी पूर्णतः किंवा अंशतः फारकत घेणारी असली तरी मला आवडते. माझी तिथे फक्त एवढीच अपेक्षा असते की ते लेखन दुटप्पी नसावं. त्याला काहीतरी आधार असावा. त्या दृष्टिने मी त्या लेखकाला सूचना करतो. त्या त्यांनी स्विकाराव्यात, नाहीतर सोडून द्याव्यात अशी मी लवचिक भूमिका मी ठेवतो. अरूण साधूंचं ड्रॅगन जागा झाल्यावर या पुस्तकावेळी काहीशी अशी परिस्थिती आली होती. मला हवी असलेली भर पुस्तकात घालण्यासाठी साधूंकडे पुरेसा वेळ नव्हता. पण एका भेटीनंतर त्यांनी माझ्या काही सूचना मान्य केल्या आणि त्याबद्दल मनोगतात माझे आभारही मानले. आता या पुस्तकातल्या त्यांच्या काही मतांशी माझी काही मते जुळणारी नव्हती. पण मी माझी भूमिका त्यांना पटवण्याच्या भरीला पडलो नाही. त्यातल्या वस्तुनिष्ठ माहितीपुरतीच माझी संपादकीय भूमिका मी मर्यादित ठेवली.

......................................

घुसळण कट्टा

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा