अभिषेक जाखडे (पद्मगंधा प्रकाशन)

Abhishek Jakhade-1_0_0_0_0_0.jpg

आपल्या घरीच प्रकाशन व्यवसाय आहे, याची सजग जाणीव तुला नेमकी कधी झाली? कशाप्रकारे झाली आणि कोणत्या स्वरूपात झाली? त्यावर तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती? म्हणजे अभिमान, विशेष काही वाटलं नाही वगैरे...

- अगदी लहानपनापासूनच हा व्यवसाय मी जवळून पहात होतो, म्हणजे संध्याकाळ झाली की बाबांबरोबर कोणा लेखकाकडे, चित्रकाराकडे जाणे व्हायचं. तेव्हा बाबा नोकरी करत होते व उरलेला वेळ व्यवसायाला देत. गोडावूनही नव्हते त्यामुळे पुस्तकांचा स्टॉक घरातच असे. शिवाय ऑफिसही वेगळे नव्हते. त्यामुळे प्रकाशनाची कामे करतात म्हणजे घरासाठीच्या कामांपेक्षा वेगळं काहीतरी करतात हे कळतच नव्हते. शिवाय या व्यवसायानिमित्त निर्माण झालेली नाती ही अतिशय घट्ट होती. कितीतरी लोक तर मला नातेवाईकच वाटत होते. पुढे वयानुसार काही गोष्टी कळू लागल्या. काम करू लागलो. ते एन्जॉय करत होतो. आणि या कामाचे कौतुकही होत होते. प्रकाशन व्यवसायात मी लहानपनापासून काम करतो याचं लोकांना नवल वाटत होतं. बाबांकडूनही कुठलेच बंधन नव्हते, अजूनही नाही. यातूनच माझी स्वतःसाठी स्पेस निर्माण झाली. या स्पेसमधून माझा आत्मविश्वास वाढत गेला. ह्याचाच आनंद घ्यायला मला आवडतो. त्याला मी कुठलीच भावना जोडू शकत नाही.

घरचाच प्रकाशन व्यवसाय असल्यामुळे पुस्तकं आणि लेखक यांच्याशी आपोआपच ओळख झाली का? त्यामुळे एकूण मराठी साहित्याविषयी तुझी काय मतं तयार झाली?

- हो. लहानपणापासूनच लेखकांशी भेटी होत होत्या. पण त्यामुळे मला विशेष वेगळे वाटले नाही. मघाशी म्हटल्याप्रमाणे बरेच लोक मला नातेवाईकच वाटत. उदारहणार्थ गंगाधर महांबरे हे लेखक, कवी, गीतकार या अगोदर मला आजोबाच वाटायचे. कधी भेटलो की आवर्जून विचारपूस करत. एकदा तर परदेशात ट्रीपला गेलेले असताना, मला काड्यापेट्यांची कव्हर्स गोळा करण्याचा छंद होता म्हणून कितीतरी काड्यापेट्या त्यांनी आणल्या होत्या. तसंच ढेरे आजोबांचं. यातून साहित्याविषयी मनात मते वगैरे काही निर्माण झाली नाही. माझं वाचनदेखिल इंग्रजी पुस्तकांचं जास्त आहे. अजूनही मराठी साहित्याविषयी माझं वेगळं मत व्हावं इतकं काही प्रगल्भ वाचन माझं नाही.

स्वतःचा घरचा प्रकाशन व्यवसाय असल्यामुळे वाचनाची विशेष आवड निर्माण झाली का? की उलटे झाले? कोणत्या प्रकारचे वाचन जास्त झाले? मराठी-इंग्रजी? तुझ्यावर विशेष प्रभाव टाकलेली १० पुस्तके कोणती, असं विचारलं तर तू कोणती नावं सांगशील? आणि का?

- नाही. मी वाचायला लागलो यात माझ्या शाळेचा वाटा अधिक आहे. आम्हाला पुस्तक वाचून त्यावर एक परिच्छेद लिहायला लागायचा. यातून मी वाचू लागलो. मग वाचनाची सवय लागली. सुरूवातीला मला एडव्हेंचर्स किंवा डीटेक्टीव्ह कथा व कादंब-या आवडत. यातून एनिड ब्लायटन, अगाथा ख्रिस्ती, शेरलॉक होम्स, हॅरी पॉटर यांचे वाचन झाले. अभिजात साहित्याबद्दलही मला आकर्षण होते. टॉलस्टॉय, चेखव्ह, ओ. हेन्रीही वाचले. हल्ली मात्र मला लेख जास्त आवडतात. इंटरनेटवरील मासिकांद्वारे अनेक लेख मी वाचतो. मला आवडलेले काही लेख मी यावर्षीच्या ‘उत्तम अनुवाद’मध्ये घेतले होते. भारतीय लेखकांच्या अनेक कथा अलिकडेच वाचनात आल्या. त्या मनाला अधिक भावल्या. पण मी कुठल्याच साहित्यप्रकारात अडकलो नाही किंवा कथा आहे म्हणून, कादंबरी आहे म्हणून मी काही वाचायला घेत नाही. समोर येते त्यातील पहिला परिच्छेद वाचतो, पुढची पाने चाळतो. तो भावला तर पूर्ण वाचलं जातं नाहीतर कंटाळा येतो.

दहा पुस्तकं काढणं अवघड आहे. पण इतक्यात वाचलेली व विशेष आवडलेली म्हणजे ‘’पॅलेस ऑफ इल्युजन्स.’ हे महाभारतच आहे. पण ते द्रौपदी सांगते. भारतातील एम्बीशियस स्त्रिचा आवाज यातून जाणवतो. दुसरे आहे ‘काईट रनर.’ यात दोन मित्रांची कहाणी आहे आणि परिस्थितीचा घाव घातल्याने या नात्याची झालेली फरफट व यामुळे लेखकाच्या मनातील भावनाकल्लोळ मला भावला होता. ‘द अलकेमिस्ट’बद्दल मी वेगळं काही सांगायची गरज नाही. मारिओ पुझोचं ‘गॉडफादर’, मुकूंद देवचं ‘लष्कर’, डोरिस लेसिंगचं ‘फिफ्थ चाईल्ड’, ओरहान पामुकचं ‘माय नेम इज रेड’, आयन रँडचं ‘फाउंटेनहेड’ ही मनाच्या जवळची पुस्तकं.

प्रकाशन व्यवसायात येण्यापूर्वी या व्यवसायाच्या स्वरूपाविषयी काय माहिती होती? हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या कसा असतो, असं तुझं मत होतं? म्हणजे यात भरपूर पैसा आहे? हा व्यवसाय बहुतेक वेळा बुडीतच जातो? भलताच कटकटींचा आहे?

- मला असं वाटतं की प्रत्येक व्यवसायाचा वेगळा गुणधर्म असतो. तसा प्रकाशनाचा असा आहे की, कष्टाच्या मानानं यात पैसा कमी आहे. हे मान्य करून यात प्रवेश केला तर समाधान लाभेल. मध्यंतरी बडोद्याला गेलो होतो तेव्हा मोनिका झुल्झर या जर्मन लेखिका भेटल्या. त्या प्रकाशन व्यवसायाबद्दल एक वाक्य बोलल्या. ते अतीशय सार्थ आहे. त्या म्हणाल्या होत्या- Publishing is a difficult business, you either lose a lot of money or make some.

या व्यवसायात स्वतः प्रवेश करावा, असं नेमकं कधी वाटलं? त्यावेळची विचारप्रक्रिया काय होती? हा निर्णय घेताना कोणते सकारात्मक मुद्दे लक्षात ठेवले होतेस?

- मी या व्यवसायात काम करू लागलो बारावीनंतर. पण मी अजूनही पूर्णपणे व्यावसायिकपणे या व्यवसायात कार्यरत नाही.

एक करिअर म्हणून या व्यवसायाकडे पाहतोस की साहित्य संस्कृतीची आवड म्हणून?

- मला संस्कृतीची आवड आहे. भाषा व सिविलायझेशनचा इतिहास याविषयी थोडी आवड आहे. म्हणून यात उत्कृष्ट करियर होऊ शकते.

मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसाय ज्या पद्धतीने चालतो, त्याविषयी तुला काय वाटते? तो पुरेसा प्रोफेशनल आहे का? नसेल, तर त्यासाठी काय करायला हवे?

- अर्थातच मराठी प्रकाशन व्यवसाय तितका प्रोफेशनल नाही. काही लोक हल्ली वेगळ्या पद्धतीनं काम करतात. त्याला ते प्रोफेशनल म्हणतात. प्रथम प्रोफेशनालिझम काय हे समजून घेतलं पाहिजे. प्रोफेशनलिझम म्हणजे लोकांशी संबंध तोडणे नाही. कुठलाही व्यवसाय रिलेशनशिपवर चालतो. मुळात ही कन्सेप्ट काय याचा अगोदर विचार केला पाहिजे. आज चार लोकांना डावलून उद्या ह्याच चार लोकांशी नातं ठेवण्यासाठी पीआरओ नेमणं मूर्खपणा आहे. आपल्याकडे व्यावसायिकता नाही असं नाही पण व्यावसायिकतेची चौरस व्याख्या नाही. त्यामुळे हे प्रथम केले पाहिजे.

आहे त्या पर्यावरणात हा व्यवसाय व्यावसायिक तत्त्वांवर चालवता येऊ शकतो असं तुला वाटतं का? त्यादृष्टीने पर्यावरणात काही बदल सुचवावेसे वाटतात का? कोणते?

- बाहेरच्या व्यक्ति व विचार यांना आपण फार महत्वाचे स्थान देतो. पाश्चिमात्य गोष्टींचे आकर्षण आपल्याला आहे. यातून आपण अनुकरण करतो व बरेचदा फसतो. मराठी साहित्यव्यवहाराची वेगळी ओळख आहे. तो जागतिक पातळीवर नेण्यासाठी केवळ अनुकरण करून कसे चालेल? आपण विश्व संमेलन भारताबाहेर भरवतो. त्यापेक्षा पुण्यासारख्या शहरात एक आठवड्याभराचा किंवा तीन-चार दिवसांचा लिटररी फेस्टिव्हल भरवला तर? भारतातील व भारताबाहेरील साहित्यिक, वाचक, पुस्तकप्रेमी अशा कार्यक्रमाला उपस्थित राहतील व पुण्याचे नाव जागतिक साहित्याच्या नकाशावर अधिक ठळक होईल. जयपूर लिटररी फेस्टिव्हल किती लोकप्रिय होतो हे आपण पहातो आहोत. मराठीला जागतिक दर्जावर न्यायचं असेल तर जगाला आपल्याकडे आणलं पाहिजे. आपण जगभर फिरून काय होणार?

इतर भाषांमधील साहित्याच्या प्रवाहाकडे कसं पाहता? (इंग्रजी, तसंच इतर प्रादेशिक भाषा) त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्याकडे आणाव्यात, असं वाटतं का?

- मुळातच मी अनुवादाचं काम अधिक करतो. त्यामुळे विविध भाषांत काय चाललय याचा वृत्तांत असतो. प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. त्यामुळे त्या भाषेतील साहित्यीक ट्रेन्ड आपल्याकडे चालतीलच असे नाही. इतर भाषा व मराठी यांचे नाते समजून अनुवादाबद्ल धोरण तयार केले पाहिजे.

एखादं पुस्तक तुम्हाला तुमच्या प्रकाशन संस्थेच्यावतीने छापायचं आहे, याचा निर्णय कसा करता? लेखक/विषय/मजकुराचा दर्जा अशा कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य देता?

- माझ्यासाठी पुस्तक तयार करायचे असेल तर दोन निकष अतिशय महत्वाचे आहेत. एक विक्री व दुसरा सॅटीसफॅक्शन.

पुस्तक जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्ह व्हावं, यासाठी काय प्रयत्न करता? किंवा काय काय प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं वाटतं?

- आपल्याला साहित्यीक वातावरण निर्माण केलं पाहिजे. यासाठी डीजिटल मिडीयाचा मोठा वापर केला पाहिजे. सध्या आपण काही गोष्टी करत आहोत, ज्यामुळे हे नष्ट होत आहे. अनुवादासाठी एक धोरण पक्के केले पाहिजे. मसाप व मराठी प्रकाशक परिषदेसारख्या संस्था अधिक कार्यक्षम व कार्यतत्पर पाहिजेत. इंग्रजी पुस्तक व इंग्रजी पुस्तक व्यवहार अधिक सकस आहे. याचं महत्वाचं कारण तो व्यवहार सकस करण्यासाठीच ते काम करतात. आपल्याकडे अशी काम करणारी माणसं कमी आहेत.

या व्यवसायातील स्पर्धेविषयी आणि इतर प्रकाशकांविषयी काय वाटतं?

- म्हटलं तर या व्यवसायात खूप स्पर्धा आहे, म्हटलं तर नाही. प्रत्येक पुस्तक ही नवनिर्मिती आहे. त्यामुळे त्याचं अनुकरण करणं अवघड आहे. प्रकाशकांनी आता विभक्त होऊन काम करण्यापूरते मर्यादित राहू नये. आपल्याकडे कल्पक प्रकाशक आहेत. यांनी एकत्र येऊन काम केलं तर खूप मोठा पल्ला गाठू शकू. आपण जे आज म्हणतो की आपल्याकडे साहित्यीक वातावरण नाही, क्वॉलिटी नाही, नवे लेखक नाही वगैरे वगैरे. आता व्यवसाय टिकवायचा असेल तर या समस्यांवर उत्तर शोधणं गरजेचं आहे व ते एकट्या-दुकट्याचे काम नाही. यासाठी सर्व प्रकाशक एकत्र यायला पाहिजे. मग मोठे कार्य होऊ शकते. ह्या उदंड साहित्यव्यवहारात प्रकाशक इतका कल्पक व मॅनेजेरियल क्वोशंट असणारा दुसरा कोणच नाही.

मराठी प्रकाशन व्यवसायात सध्या नाही, पण ते आणणं गरजेचं आहे, अशी कोणती गोष्ट तुला जाणवते?

- सध्या असे होत आहे की काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं आपण शोधत नाही. त्यावर पांघरूण घालून वेगळे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. हे थांबले पाहिजे. प्रकाशन व्यवसायात अनेक आहानं आहेत व यातील बरीच, कमी करता येतील. त्याला शक्तिही मोठी लागेल. पण ही आव्हानं उराशी बाळगूनच आपण काम करतो. या मानसिकतेत बदल मला गरजेचा वाटतो.

मराठी वाचनसंस्कृतीबद्दलचं तुझं मत काय? वाचनसंस्कृती समृद्ध व्हावी, यासाठी काय करायला हवं, असं तुला वाटतं? एक प्रकाशक म्हणून तुझी जबाबदारी काय?

- मराठी वाचक खूप पॅसिव्ह आहे. तो अधिक सक्रिय झाला पाहिजे. यासाठी डीजिटल मिडीयाचा वापर केला पाहिजे.

मराठी प्रकाशन व्यवसायापुढची आव्हाने कोणती आहेत? ती पेलायला तुमची पिढी समर्थ आहे का?

- To solve any problem, the first step is to identify it. आव्हान पेलण्यासाठी आमची पिढी प्रॉब्लेम आयडेंटीफाय करत नाहीये तर त्याकडे कानाडोळा करते आहे. असे चालले तर प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य धोक्यात आहे.

अनेक लेखकांच्या बहुतेक प्रकाशकांबद्दल रॉयल्टी वेळेत न मिळणे, आजिबात न मिळणे, व्यवसायात पारदर्शकतेचा अभाव अशा अनेक तक्रारी आहेत. त्याबद्दल काय करावं, असं तुम्हाला वाटतं?

- लेखक, प्रकाशक हे एक नातं आहे. या नात्याबद्दल दोन्ही बाजूंनी प्रयत्नशील असलं पाहिजे. हे नातं कसं सांभाळायचं हे त्या-त्या व्यक्तिच्या हातात आहे. पण यातील काही तांत्रिक मुद्दे जसे रॉयल्टी इत्यांदीबद्दल ज्यानं त्यानं सजग व सावध असलं पाहिजे.

पुस्तकांच्या किमती आणि वितरण हे दोन्ही मोठे अवघड प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी काही नवीन योजना सुचवाल का?

- A book in stock is scrap. त्यामुळे प्रत्येक पुस्तक वाचकाकडे जाणं महत्वाचं आहे. त्यासाठी ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, वर्तमानपत्रातील परिक्षणे इत्यादी करणे, इंटरनेटचा वापर करणे गरजेचे आहे.

सध्या ई-बुकचा ट्रेंड येतोय. त्यामुळे छापील पुस्तकांचं भवितव्य धोक्यात आहे, अशी चर्चा केली जाते. त्याबद्दल तुला काय वाटतं?

- बदल हे होत असतात. आणि पुढे काय होणार आहे हे आज कोणी नक्की सांगू शकत नाही. जर खरंच पारंपरिक पुस्तक संपणार असतील तर इ-बुक्स स्विकारल्याच पाहिजेत. पण याबाबतील पक्के धोरण आखले पाहिजे. इ-बुक्स बनविणे व त्याचं वितरण यासाठी एक नवा घटक या व्यवसायात येत आहे. या घटकाच्या मर्यादा सुरूवातीलाच मर्यादित ठेवल्या नाहित तर तो बाकीचे सर्व घटक व पर्यायाने व्यवसाय यांचा नाश करेल.

अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने चाललेल्या प्रकाशन व्यवसायात नव्या माध्यमांचा वापर करून काही बदल करणे शक्य आहे, असं वाटतं का?

- या विषयी थोडंबहूत मी आधीच्या प्रश्नांच्या उत्तरांत बोललो आहे.

आज मराठीमध्ये बहुतेक प्रकाशन संस्था एकेका प्रकाशकाच्या नावाशी जोडलेल्या आहेत. थोडक्यात हा फॅमिली बिझनेस आहे. त्यात बदल व्हावा, असं वाटतं का?

- प्रकाशनसंस्था एका प्रकाशकाच्या प्रभावाखाली नसावी. मात्र नजिकच्या काळात तरी ते शक्य नाही.

........................................

घुसळण कट्टा

प्रकाशक : वसा आणि वारसा

मराठीतल्या प्रकाशन व्यवसायात सध्या नवी पिढी नव्या जोमाने उतरली आहे. नव्या कल्पना, नवे विचार घेऊन येणारी पिढी या गोष्टीकडे कसं बघते, प्रकाशन व्यवसायाचा पुढचा काळ त्यांना कसा दिसतो आहे, याबाबत त्यांची मतं आम्ही जाणून घेतली.

ई-संमेलन कशासाठी? - भूमिका

'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.

गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा

आणखी व्हिडिओ