अक्षरधारा : रमेश राठिवडेकर
कामासाठी म्हणून मी मुंबईला आल्यावर अनेक ठिकाणी नोक-या केल्या. त्यात चांगले पैसेही मिळत गेले, पण समाधान मात्र मिळत नव्हतं. याच काळात केशव ढवळे प्रकाशनात मला काम मिळालं. तिथे पहिल्यांदा मला पुस्तकांचा सहवास लाभला आणि वाचण्याची गोडीही लागली. इथे काम करतानाच मला जाणवलं की हेच आपलं काम. यापुढे दुसरं काही करायचं नाही हे तेव्हाच ठरवलं. त्या वेळी रघुवीर ढवळ्यांनी महाराष्ट्रात दोन महिन्यांच्या ग्रंथप्रदर्शनाचा घाट घातला होता. ह्यादरम्यान मी जे काही काम केलं त्यामुळे ते फार प्रभावित झाले. मलाही यातून नियोजनाच्या अंगातून ब-याच गोष्टी शिकायला मिळाल्या. फार चॅलेंजिंग काम होतं ते माझ्यासाठी. रोज नवा दिवस, नवी माणसं, नवा विचार भेटायचा. पैशापेक्षा हे काही तरी वेगळं होतं जे मला भावलं. हा माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. इथे मला अनेक लोक भेटले जे माझ्यासाठी एक एसेट होतं. सुरेश भट, द. मा मिरासदार, शांता शेळके आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तात्यासाहेब शिरवाडकर. त्यांचा तर माझ्यावर लोभच जडला. ढवळे ग्रंथयात्रा ८ वर्षांनंतर थांबली. माझंही काम थांबलं. यापुढे काय करायचं हा प्रश्न होता. मार्ग अनेक होते, पण लक्ष माझं सारं पुस्तकांत होतं. त्यामुळे तेच करायचं मी ठरवलं. यात लेखक, प्रकाशक, वाचक या सर्वांचाच पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळाल्याने ‘अक्षरधारा’च्या रूपाने मी हे काम स्वतःच सुरू करून पुढे नेलं आहे.
प्रदर्शनाच्या रूपाने पुस्तकं दुकानांबाहेर पडून वेगवेगळ्या गावांतल्या वाचकांपर्यंत पोहोचू लागली. वाचकांनी अधिकाधिक प्रमाणात प्रदर्शनात यावं, पुस्तकं पाहावीत, खरेदी करावीत यासाठी आम्ही या प्रदर्शनांना अनेक उपक्रमांची जोड दिली. लेखकांना बोलावलं, त्यांच्या मुलाखती ठेवल्या, लोकांशी त्यांची भेट घडवली. लोकांना ते आवडत गेलं. यातून प्रसिद्धी झाली व त्याचा लोकांना आणि आम्हालाही फायदा झाला. आम्ही ज्या गावात जायचो तिथे आधी चौकशी करायचो, तिथे कोण लेखक आहेत, लोकांना काय वाचायला आवडतं, तिथलं कल्चर काय आहे याचा विचार करून आम्ही प्रदर्शन भरवतो. स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन काम करणं हे आमचं वैशिष्ट्य आहे. साधारण गावाच्या आकारमानानुसार ग्रंथ-यात्रेचे दिवस ठरतात. त्याचं नियोजन आधीच केलं जातं. ७-८ लोकांची एक स्थायी टीम यासाठी काम करते. पुढे आम्ही त्या त्या गावाच्या नावाने महोत्सव सुरू केले. ते यशस्वी झाले. तिथल्या लोकप्रिय लेखकांना प्राधान्य दिलं. मग वाचकांसाठी पुस्तक विक्रीच्या योजना सुरू केल्या. ‘अक्षरधारा’चं पंचविसावं प्रदर्शन झालं तेव्हा शांता शेळके यांना आम्ही बोलावलं. वाचकांना लेखकांशी संवाद साधता येणं, लेखकाला ओळख मिळवून देणं, त्यातून त्याच्या पुस्तकांची विक्री वाढणं हे तिहेरी उद्देश या उपक्रमातून साध्य झाले. दर वेळी काही तरी नवीन करत असल्यामुळे आमच्या कामात सतत ताजेपणा राहिला आहे आणि त्यामुळेच ‘अक्षरधारा’ यशस्वी झालं आहे.
गेल्या अठरा वर्षांत महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक अशा तीन राज्यांत चारशेच्या जवळपास प्रदर्शनं आम्ही भरवली आहेत. एका प्रदर्शनात दोनशेच्या जवळपास प्रकाशनांची साधारण सत्तर-ऐंशी हजारांची पुस्तकं असतात. त्यांचा विमाही उतरवण्यात येतो. आता ‘अक्षरधारा’ चं स्थायी दालनही सुरू झालं आहे. त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आता आम्ही ‘नित्य वाचक’ ही योजना सुरू केली आहे. खंद्या वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तकं सवलतीत मिळावी. आमच्या कार्यक्रमांत त्यांना आमंत्रण असणार आहे. लेखकांना भेटायची त्यांना संधी मिळणार आहे. मला व्यक्तिशः प्रदर्शनात काम करायला आवडतं, कारण तिथे लोकांना भेटता येतं, त्यांची मतं जाणून घेता येतात, जे मला मोलाचं वाटतं.
.................................
बातम्यांच्या पलीकडे
मुखपृष्ठकार
वितरक/विक्रेते
ई-संमेलन कशासाठी? - भूमिका
'युनिक फीचर्स' आयोजित ई - साहित्य संमेलनाचं हे दुसरं वर्ष.
गेल्या वर्षी विख्यात नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं ई-साहित्य संमेलन भरवलं होतं. त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागत झालं. महाराष्ट्रात नि भारताशिवाय २५-२६ देशांतून हे संमेलन पाहिलं गेलं, वाचलं गेलं. शिवाय वर्षभर हे संमेलन वेबसाईटवर उपलब्ध असल्याने सर्वकाळ वाचक संमेलनस्थळी येऊन वाचून जात होते. एरवी छापील माध्यमातून एवढ्या वाचकांपर्यंत पोहोचणं अवघडच होतं.
पुढे वाचा

