रिपोर्ताज

जातिभेदाचे नरबळी - अलका धुपकर

जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी पोटच्या पोरांचा जीव घेण्याच्या अर्थात 'ऑनर किलिंग'च्या क्रूर घटना फक्त उत्तरेतल्या राज्यांमध्येच घडतात असं वाटत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रातलं शर्मनाक वास्तव उघड करणारा हा लेख वाचायलाच हवा.
स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन जबाबदारीने आणि सन्मानाने जगू पाहणाऱ्या तरुणाईच्या आड येणारं जातिभेदाचं हे शर्मनाक वास्तव फक्त एक-दोन जातींपुरतं मर्यादित नाही. समाजाच्या सर्व थरांमध्ये हे लोण पसरलेलं आहे. पत्रकार अलका धुपकर सांगताहेत या सद्यस्थितीबद्दल आणि हे वास्तव बदलण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दलही...

प्रेम कसं करायचं, याच्या काव्यकल्पना अनेकदा साहित्यातून वाचायला मिळतात. पण, प्रेम जातपंचायतीला विचारून करावं, असं कुणी सांगत नाही. पण आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचं वास्तव हेच सांगतं. जातिभेदामुळे प्रेमाला विरोध केल्याच्या आणि टोकाला जाऊन त्यासाठी खून पाडल्याच्या घटना रोज आपल्या समोर येताहेत. वाचा न फुटलेल्या घटना किती असतील याची कल्पनाच केलेली बरी.

कथा दावा मांडलेल्या गावांची - संपत मोरे

संख आणि उमदी. महाराष्ट्राच्या एका टोकाला असणारी मागास आणि दुर्लक्षित अशी दोन गावं. जगाने लक्ष द्यावं असं त्यांच्यात काही नाही.
पण हजारभर वर्षांच्या परंपरेला ही गावं अशी काही कवटाळून बसली आहेत की ती एकमेकांचं तोंडही बघायला तयार नाहीत.
कुणीही अचंबित व्हावं अशा या दोन गावांच्या ‘नात्या’विषयी...

गारूड ‘हरिनाम सप्ताहा’चं - संपत मोरे

देवभोळ्या गावकर्‍यांच्या खचाखच गर्दीने भरलेला गावातला मंडप आणि तिथे दिवस-दिवस रंगणारी कीर्तनं हे खेड्यापाड्यांत नेहमी दिसणारं दृश्य. हरिनाम सप्ताह नावाची संस्कृती गेल्या पाच-पन्नास वर्षांमध्ये आपल्याकडे रुजली आहे. कुणाला वाटेल, हा सप्ताह म्हणजे केवळ भजन-कीर्तन; एकूण, फक्त धार्मिक प्रकरण. पण प्रत्यक्षात हा सप्ताह गावातल्या राजकीय-सामाजिक घडामोडींना व्यापून असतो. त्याचा सातारा-सांगली जिल्ह्यात फिरून घेतलेला हा धांडोळा.

(संपत मोरे हे ‘युनिक फीचर्स’चे फिरते वार्ताहर आहेत. तळागाळातले विषय शोधून काढण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत असतात.)

Harinam Saptah Lekh - Sampat More

कुस्त्यांच्या मैदानांतून... - संपत मोरे

शहरांच्या दृष्टीने कुस्ती म्हणजे एक संपलेला खेळ आहे. पण दक्षिण महाराष्ट्राच्या गावागावात कुस्ती आजही जिवंत आहे. तिथल्या लाल मातीवरच्या आखाड्यात अजूनही थरार रंगतो आहे. त्या कुस्तीविश्‍वाचा हा फेरफटका...

(संपत मोरे हे ‘युनिक फीचर्स’चे फिरते वार्ताहर आहेत. तळागाळातले विषय शोधून काढण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत असतात.)

kusti lekh photo.jpg

दुपारचं रणरणतं ऊन. या कडक उन्हातही शेकडो माणसं एकाच दिशेने निघाली आहेत. रस्त्यावर वाहनांचीही गर्दी. गर्दीमुळे जीपा, मोटरसायकली धिम्या गतीत चालल्या आहेत. त्या गर्दीत एखादा सायकलस्वारही धडपडत निघालाय. चालणारा एखादा मध्येच थांबतोय, मागून येणार्‍या वाहनाला हात करतोय. त्याच्याकडे कुणी लक्ष देत नाही. तेवढ्यात एक मोटरसायकल थांबते. त्यावर दोघं असतात, पण तरी ते यालाही घेतात... हे सर्वजण कुठे निघाले आहेत? ही सारी गर्दी निघाली आहे कुस्त्या बघायला.

आली आली कडकलक्ष्मी ! - मुकुंद कुळे

कडकलक्ष्मी, म्हणजेच मरीआईवाला समाज हा महाराष्ट्रातल्या भटक्या-विमुक्त जमातींपैकी सर्वाधिक मागास म्हणून गणला जातो. या समाजाच्या प्रगतीचं चाक कुठे अडकलं आहे?
मरीआईवाल्यांच्या वस्त्यांवर फिरून त्यांचं जगणं समजून घेणारा हा रिपोर्ताज...

kadak lakshmiरस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ असते. गाड्या सुसाट धावत असतात. माणसं आपल्याच तंद्रीत चालत असतात. सगळ्यांना सारं काही सवयीचं झालेलं असतं. अन् अचानक ध्यानीमनी नसताना घुमारा भरल्यासारखा बुगूबुगू आवाज ऐकू येतो, आकाशाच्या पोकळीत वारा भरल्यावर यावा तसा. त्या आवाजात कसली तरी जादू असते. इच्छा असो वा नसो, तो आवाज आपल्या मनाचा कब्जा घेतो. हळूहळू त्याच्या जोडीला घुंगरांचा आवाज ऐकू येऊ लागतो- बुगूबुगूच्या आवाजाशी आणि लयीशी मेळ साधणारा.

चिपाड - प्राजक्ता धुळप

उसतोड कामगारांचं जीवन म्हणजे अहोरात्र कष्ट. पण या कामातून सुटका होणं लांबच; उलट हे काम हातचं जाऊ नये यासाठी बायका गर्भाशय काढून टाकत असल्याच्या घटना वाढताहेत. त्यामुळे बायांच्या शरीराचं चिपाड होतं आहे.
ऊस कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीडमधलं हे विदारक चित्र.

prajakta dhulap cover photo“मी २२ वर्षांची होते तेव्हाच माझं गर्भाशय काढलं... कर्ज काढलं मी त्यासाठी वीस हजारांचं.” बीड जिल्ह्यातल्या खांडवी गावची मीराबाई सांगत होती. मीराबाई वयाच्या अकराव्या वर्षापासून ऊसतोडीसाठी गावोगावी फिरते आहे. सहा महिने पोटापाण्यासाठी स्थलांतर करायचं आणि उरलेले सहा महिने गावात राहायचं, अशी या कामाची पद्धत. ऊसतोडीसाठी बाहेर पडलं की ना साप्ताहिक सुट्टी, ना कामाचे ठराविक तास, ना काही सोयी-सुविधा. कामात खाडा झाला तर त्याचा परिणाम थेट मिळकतीवर होतो.

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय - मुकुंद कुळे

महाराष्ट्रातल्या भटक्या जमातींपैकी अनेक जमाती कलाकार आहेत. कला सादर करायची आणि त्या बदल्यात धान्य-पैसा मागायचं हे त्यांचं उदरनिर्वाहाचं पूर्वापार साधन. पण ‘कला संपली आणि केवळ मागणं उरलं’ असं त्यांचं आजचं वास्तव आहे.
अशा कलावंत फिरस्त्यांचा माग घेत भटकण्याचा प्रयत्न पत्रकार मुकुंद कुळे या अंकापासून करताहेत. त्यापैकी पिंगळा, म्हणजेच कुडमुडे जोशी समाजाच्या पालांवर मुक्काम ठोकून लिहिलेला हा रिपोर्ताज...

पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय

मुक्काम पोस्ट बनगरवाडी - संपत मोरे

शहरी मनाला ग्रामीण मातीशी जोडणारं व्यंकटेश माडगूळकरांचं ‘बनगरवाडी’ हे पुस्तक मराठी वाचकांच्या मनात रुतून बसलेलं. पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटणारं. हुक्की आली की पुस्तक उघडावं आणि त्या अस्सल माणदेशी खेड्यात मिसळून जावं, धनगरांच्या मेंढ्यांमागे निरुद्देश भटकावं!
या बनगरवाडीच्या प्रेमात पडलेल्या एखाद्या वाचकाला ते खरंखुरं गाव बघावंसं वाटतं तेव्हा काय होतं? तात्या माडगूळकरांनी ज्या गावावर ही कादंबरी बेतली त्या गावचं आजचं रूप समजून घेण्यासाठी मारलेला हा फेरफटका.

बनगरवाडीकराड सोडलं की सुर्लीचा घाट येतो. हा घाट चढून आल्यानंतर कडेगाव. नंतर कडेपूर. मग विटा. मग रेवणसिद्धाचा परिसर. उघडाबोडका. पूर्वेला पवनचक्क्यांची गरगर फिरणारी पाती दिसतात. रेवणगावच्या घाटातून वर जाताना ही पाती आपल्याला धडकतात की काय अशी भीती वाटते. त्यानंतर तामखडी हे थंड हवेचं ठिकाण लागतं. भूगोलाच्या पाठ्यपुस्तकांनी या गावाची दखल घेतलेली नसली तरी तिथे बाराही महिने गार हवेच्या झुळका अनुभवायला मिळतात. तामखडीचं आणखी एक वेगळेपण आहे. इथली जमीन लाल मातीची. पैलवान मंडळी आखाड्यासाठी इथली माती नेतात.

टीबी इथला हटत नाही... - शैलजा तिवले

एखादा रोग त्यावर इलाज करणार्‍या डॉक्टरांनाच होऊ लागला की तो धोक्याचा इशारा असतो. तशीच परिस्थिती सध्या टीबीबाबतीत तयार झाली आहे. या रोगाचं मुंबईतलं भयानक वास्तव समजून घेण्याचा हा प्रयत्न.

७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने.

टीबी इथला हटत नाही

समिधा खंडारे, सायन रुग्णालयाची एमबीबीएसची विद्यार्थिनी. इंटर्नशिपला असताना तिला एकदा ताप आला आणि नंतर काही दिवसांतच अशक्तपणाही आला. मेडिकलची विद्यार्थी असल्याने लगेचच हॉस्पिटलमध्ये तिच्या तपासण्या करण्यात आल्या. उपचारही सुरू झाले. तपासात काही विशेष आढळलं नाही. तापही कमी आला. परंतु काही दिवसांनी तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. बसल्याजागी श्वास घेणं त्रासदायक होऊ लागलं.

मजूर एक्स्प्रेस - संपत मोरे

रेल्वेने आपण प्रवास करतो तो आरक्षित किंवा वातानुकूलित डब्यांतून. सुरक्षित आणि सुखद.
पण आपल्याच प्लॅटफॉर्मवर लागणार्‍या आपल्याच रेल्वेत बसण्यासाठी ही एवढी मोठी झुंबड कशाची उडलीय? कोण आहेत हे लोक?
त्यांच्यात मिसळून, त्यांच्याशी बोलून लिहिलेला हा रिपोर्ताज...

Majur Express

पुणे रेल्वे स्टेशनचा गजबजलेला परिसर. नेहमीची धावपळ, आरडाओरडा. गर्दीतून वाट काढत पुढे जायला बघणारे प्रवासी. जितके आत जाणारे तितकेच बाहेर पडणारे. स्टेशनच्या आवारात महात्मा गांधींचा पुतळा. पुतळ्यासमोर तीन साधू बसलेत. काही अंतरावर एकजण विचित्र हातवारे करत बसलाय एकटाच हसत. शिट्ट्यांचे आवाज, रस्त्यावरून जाणार्‍या वाहनांचे आवाज. आत स्पीकरवरून गाड्यांच्या वेळापत्रकाच्या एकसुरी घोषणा कानावर आदळतायत.

Syndicate content