वास्तवाचा विस्तव...
जगण्यातल्या दाहकतेपासून पळून जाण्याची सोय काही माणसांकडे नसते.
अशा माणसांचं जगणं आपल्यासारख्या एका चौकटीत ‘मोकळं’ असणा-यांच्या अंगावर येतं, तेव्हा काय होतं?
वाराणसीच्या स्मशानघाटावर काम करणार्या मुलांवरील ‘चिल्ड्रेन ऑफ पायर’ हा लघुपट पाहताना, टीव्हीच्या पडद्यातूनही जाणवलेली वास्तवाची ही धग.
पण सगळे शहाणे, समजुतदार, जागरूक, संवेदनशील, जगणं जाणून घेऊ बघणारे, त्याविषयी कुतूहल-उत्सुकता वगैरे असणारे, विविध विषयांना स्वत:ला ‘एक्स्पोझर’ देणारे असे लोक आहोत. म्हणजे तसे आहोत असं आपल्याला तरी वाटतं.
हे सगळं खोटंय असं मला मुळीच म्हणायचं नाही, पण व्यापकपणाच्याही साचेबद्ध संकल्पनांच्या आहारी गेलेलं हे ‘मोकळेपण’ आहे, असं माझं मत आहे.
आयुष्याच्या एका टप्प्यावर आपली जगण्याची काहीएक भाषा आणि तिचा परीघ निश्चिात होतो. मग ती भाषा जपत, तिच्या आसपास घोटाळत आपण वर्तत राहतो. या भाषेत आणि पर्यायानं तिने निर्माण केलेल्या वास्तवात आपण शाश्वितपणे वसत राहावं, ती कोसळून पडण्याची वेळ शक्यतो येऊ नये, या नेणिवेतल्या गुप्त प्रेरणेतनं जगण्याचं सगळं बांधकाम आपण सोयीस्कररीत्या आकाराला आणत असतो.
मात्र हे सगळं करत असताना आपल्या सामोरा येतो तो जगण्याचा केवढासा, किती लहानसा तुकडा आहे हे आपल्या कधी लक्षात येतं? ज्यांना आपण जगण्यातली मूल्यं वगैरे मानतो ती सगळी कचर्याय-फोलफटासारखी उडून जाण्याचा प्रसंग आपल्यावर कधी गुदरलाय? ‘मी आहे आणि मी असणारच आहे’ ह्या ज्या गृहीतकावर आपलं आयुष्य बेतलं जातं ते गृहीतकच मुळातनं कधी उखडून पडताना आपण कधी साक्षी झालोत? खरं सांगायचं तर हे टाळण्याचाच आपला मन:पूर्वक प्रयत्न असतो.
काही माणसांची जगण्याची भाषा आपल्याला संपूर्णपणे अपरिचित असते. आपल्या आकलनानुसार त्यांना अशी काही भाषा असेल असंही आपल्याला वाटत नाही. त्यांना जगण्याला अपरिहार्यपणे थेटच सामोरं जावं लागतं. जगण्यातल्या दाहकतेला विमुख होण्याची, त्यापासून पळून जाण्याची काहीही सोय नसलेल्या आणि पोकळ संवेदनशीलतेची कोणतीही मध्यस्थी न लाभलेल्या माणसांचे हे दोन अनुभव.
काशी- मनकर्णिका घाट.
या घाटावर मृतदेहाला अग्नी मिळाला तर देहबद्ध आत्म्याला मोक्ष मिळतो- कर्मशृंखलेतून, जन्म-मरणाच्या फेर्यांितून त्याची सुटका होते, अशी हिंदूंची सनातन धारणा आहे.
त्यामुळे ह्या घाटावरच्या चिता सतत धडधडत असतात. देहाला भस्मीभूत करणार्या लसलसत्या ज्वाळांनी तो परिसर उजळून गेलेला असतो. अग्नीची लालसर धग तिथे वावरणार्यांचच्या चेहर्यारवर प्रतिबिंबित होते. चितेतून उडणार्या. चुरचुरत्या ठिणग्यांचा तिथे सतत नाच चालतो.
इथे काही मुलं आहेत. त्यांचं अवघं आयुष्य जगण्याच्या कारणाकरता प्रेतांशी, मृत्यूशी, या घाटाशी बांधलं गेलंय. ही मुलं प्रेतावर पांघरलं गेलेलं अंतिम वस्त्र उचलून नेतात, लांबवतात, अपरिहार्य परिस्थितीत चोरतातही आणि नंतर ते विकतात. हे विकलेलं वस्त्रच नंतर व्यवस्थित करून नवंकोरं म्हणून पुन्हा वापरात येतं. ह्यावर आणि मृतांच्या नातेवाइकांकडनं जे काय थोडेफार पैसे मिळतात त्यावर त्यांचं, त्यांच्या कुटुंबांचं जगणं अवलंबून आहे.
राजेश झाला या माणसाने ‘चिल्ड्रेन ऑफ पायर’ (चितेची मुलं) नावाची डॉक्युमेंटरी केली आहे.
त्यात घाटावरच जगणार्या ह्या मुलांचं आयुष्य विस्ताराने मांडलेलं आहे.
देहापासून ते संवेदनांपर्यंतच्या मृत्यूचं हे थेट पण अप्रत्यक्ष दर्शन.
दहा ते पंधरा वयोगटातली मुलं आणि अग्निहोत्राप्रमाणे जळत असलेली चिता ह्या दोन बिंदूदरम्यान पसरलेल्या वास्तवाच्या विस्तवाचं समक्ष दर्शन आपल्या गुटगुटीत संवेदनशीलतेच्या मुलायम त्वचेला कुणी तरी जागृतावस्थेत सोलून काढावं अशी वेदना देतं.
ह्या संपूर्ण फिल्मभर चिता धडधडते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या माणसांची. ती कधी जवळून दिसते तर कधी अंतरावरून. कधी ती धडाडून पेटलीय, तर कधी तिच्या जळण्यातले शेवटचे काही क्षण राहिले असावेत अशी कोमेजत चालली आहे. चितेचं असणं किंवा सातत्याने पार्श्वअभूमीवर दिसत राहणं ही टीव्ही, कॉम्प्युटर, आपण ज्या पडद्यावर ही फिल्म पाहतो त्याला धग प्राप्त करून देणारी गोष्ट आहे.
ब-याचदा अग्नी दिल्यानंतर त्या जळत्या प्रेताचा हातपायासारखा एखादा अवयव चितेबाहेर येतो, त्यावरचं अग्नीचं आवरण निघून पडतं. मृतदेह अग्नीस्वाधीन केल्यानंतर थेट त्याच्या अस्थी स्वीकारण्याची नातेवाइकांच्या मनाची तयारी असते. देह जळतानाच्या प्रवासातले मधले टप्पे बघण्याची, त्यांना सामोरं जाण्याची, प्रसंगी त्यावर उपाय करण्याची त्यांची ना मानसिक अवस्था असते आणि ना तयारी. ते काम ही मुलं करतात.
चितेसाठी वापरलेल्याच लाकडाची एखादी फांदी वापरून तो अवयव ते पुन्हा चितेत ढकलतात. एखाद्या देहाला जळायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला तर मेकॅनिक ज्या निर्लेपपणे मशिनच्या पार्टविषयी बोलेल तसे ते त्या देहाविषयी, त्याच्या जाडीविषयी, त्यातल्या पाण्याविषयी, जळताना त्याला येणार्या् अडचणींविषयी बोलत राहतात. यज्ञाच्या यजमानाने यज्ञकुंडातल्या अग्नीकडे एकटक पाहत राहावं तसे समोरच्या जळत्या चितेकडे ते बघत राहतात. अधनंमधनं आहुती टाकावी तसे मृतदेहाचे अवयव ते चितेत ढोसत राहतात.
घाटावर पडलेलं एक बेवारस प्रेत. साधूचा वाटावा असा देह आणि वेष.
ह्या मुलांमधलं कुणी तरी त्या देहावर लाल भरजरी वाटणारं वस्त्र आणून पांघरतं. डॉक्टरसाठी औषध जितक्या सहज उपलब्ध तितकंच ह्यांच्यासाठी हे वस्त्र.
ह्या टोळीतली दोन मुलं देहाच्या अंत्यविधीचा खेळ सुरू करतात.
माणसाचं मन मोठं विलक्षण आहे. सगळं असताना ते रमत नाही आणि काही नसताना जे काही उपलब्ध आहे त्यातून स्वत:साठी काही पर्याय सहज निर्माण करतं, त्यात संपूर्णपणे रंगून जातं.
इथे ह्यांना सहज उपलब्ध आहे तो केवळ मृतदेह.
मंत्रसदृश काही ओळी बोलल्या जातात. त्यांना मंत्र येतच नाहीत, ऐकून ऐकून येते ती मंत्राची चाल... त्या चालीत ते काही शब्द खुपसतात. आठवलाच नाही शब्द की काहीच्या काही म्हणत खळखळून हसत राहतात.
मृतदेहाभोवती प्रदक्षिणा घालायची वेळ येते तेव्हा आपल्याकडे माठ नाही हे त्यांच्या लक्षात येतं. मग खांद्यावर घटाऐवजी ते प्लॅस्टिकची पाणी भरलेली बाटली घेतात आणि प्रदक्षिणेला सुरुवात करतात.
प्रदक्षिणा सुलटी कशी आणि उलटी कोणती ह्याविषयी त्यांच्या मनात संभ्रम आहे.
जेव्हा वेळ येते खांद्यावरच्या घटाला भोक पाडायची, तेव्हा आपल्याकडच्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटलीला भोक पडू शकत नसल्याचं त्यांच्या लक्षात येतं. शेवटी बाटलीच्या तोंडातनंच मृतदेहाच्या भोवती पाणी शिंपत, नाचत, खेळत पाण्याचं रिंगण घातलं जातं.
खूप वेळ गांभीर्य टिकवलं. आता मात्र सगळं झाल्यावर मात्र त्यांना हसू आवरत नाही. खदखदून हसत ते त्यांच्यातल्याच एकाच्या हेरॉइनच्या व्यसनाबाबत कॅमेर्या.ला सांगतात.
लहान मूल खेळून झाल्यावर खेळणं जसं विसरून जातं तसे ते आता त्या मृतदेहाला विसरून गेलेत.
मागे पडलेल्या त्या मृतदेहावरचं लाल वस्त्र गंगेवरच्या वार्यायच्या झुळुकेनं फडफडतं आहे. त्या साधूसारख्या दिसणार्याय माणसाचा चेहरा आपल्याला ओळखीचा वाटायला लागलेला आहे.
कुणा वेगळ्यासाठी म्हटलेले मंत्र आता त्या देहासाठीच म्हटलेत असं भासायला लागलंय.
तो मृतदेह बेवारस आणि ह्यांचं जगणंही.
जगताना सारख्या चौकशा करत दबकत जगणारी आपण माणसं. एखाद्याने मायेने आपला खून केला आणि आपुलकीने आपल्या जगण्यावर पूर्णविराम ठेवून दिला तर जी काय घुसमट वाट्याला येईल ती हे वास्तव बघताना अनुभवाला येते.
ह्या मुलांच्या आयुष्याला कोणतीही ठराविक दिशा किंवा रेषा नाही.
प्रत्येक क्षण नवा, जिवंत. अनपेक्षित.
त्यामुळेच आपल्यापेक्षा ही मुलं एका प्रकारे सुखी आहेत असं मला वाटतं. ह्यांच्यावर कोणतंच ओझं नाही. परंपरेचं, संस्कृतीचं, शिक्षणाचं, स्मरणाचं, अपेक्षांचं, भाषेचं.... काळाचंही.
काळाचं लोढणं न झालेला माणूस सहज जगू शकतो हे खरंच आहे.
ही मुलं चितेशेजारीच, घाटावर गुटखा-गांजासारखी व्यसनं करतात. दारू पिऊन बघतात.
‘मालूम है ये अच्छा नहीं, पर काम करना पडता है| इससे काम ज़्यादा होताय और काम किया तो पैसाभी मिलता है’ असं सांगत त्या गांजाच्या धुराचा जगायला टेकू शोधतात. पेटल्या मृतदेहांच्या साक्षीनेच एकमेकांच्या पाठीवर अडकलेले ठिणग्यांचे कण हलक्या हाताने सोडवून देतात, एकमेकांवर मायेचा हात फिरवतात. स्वत:च्या दारुड्या बापाविषयी तक्रार मांडणारा पण ‘पापा मर गये तो किसको मैं पापा करके बुलाऊंगा?’ विचारत त्याच्या मृत्यूच्या कल्पनेने कावराबावरा होणारा ह्यांच्यातलाच मुलगा आपल्याला या फिल्ममधे भेटतो. कुठल्या तरी महंताच्या जागरणाच्या निमित्ताने घाटावरचं पोरींचं नाचणं बघताना आणि ‘बीडी जलायले’ ऐकताना देहाची मर्यादा भिरकावून देत ह्यांच्यातलंच एक पोरगं नाचणार्याी व्यावसायिक पोरीसोबत बेभान होतं. ‘लौंडी अच्छी डान्स करती थी| हमको उतना नहीं आता...’ हेही सहज सांगतं. उत्तररात्री मैत्रिणीची आठवणही इथेच निघते. ‘वो बहोत ब्युटिफुल है’ असं शरमून जायला होतं तेही इथल्याच काळोखाच्या साक्षीने. ‘आप किसीको बोलना मत’ असं म्हणत तिचं ‘प्रीती’ हे नावं चितेच्या, ह्या अग्नीच्या आसपासच घेताना कोवळ्या वयातला तो मुलगा लाजून लाल होतो तेव्हा हे सगळं मृत्यूच्या पांघरुणाखाली घडतं आहे हे पचायला जड जातं. देह कुठे जाऊन पोहोचणार आहे हे ज्याला दिवसरात्र दिसत आहे त्याच्या मनातल्या या भावना करपून जात असणार, ही या मुलांच्या आयुष्याचं भयाणपण अधोरेखित करणारी आपली चौकटबद्धच संकल्पना. म्हणूनच कदाचित मृत्यूचं हे अप्रत्यक्ष दर्शन घेताना मला जेवढा त्रास झाला तेवढा या मुलांना प्रत्यक्ष जगतानाही झालेला नसणार.
‘आम्ही तर लोकांना मदत करतो. करायलाच पाहिजे आम्हाला. आम्ही नाही तर कोण करणार हे काम?’ निर्भेळ वास्तवाला समक्ष सामोरं जात त्याचा विनाशर्त स्वीकार...
ही भीक मागणारी मुलं नाहीत. वाट्याला आलेल्या जगण्याबद्दल त्यांनी कुणाला बोलही लावलेला नाही.
ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने (कदाचित आनंदानेही) जगताहेत.
‘मला वाटतं, जगातले सगळे म्हातारे मरायला हवेत. त्यांची प्रेतं जाळायला इथे यायला हवीत, म्हणजे मग आम्हाला पैसे मिळतील. आम्ही, आमचं कुटुंब जगू शकू.’
ना खेद ना खंत, ना व्यथा ना उपेक्षेचा आक्रोश. निव्वळ थेट विधान.
वास्तवाचा विस्तव आणि तो तुडवत चालत असलेली ही चौदा कोवळी पावलं.
त्यांचं बोलणं ऐकताना हडबडून जायला होतं. अस्थिर वाटत राहतं. भीती वाटते अशातला भाग नाही. प्रश्नह भीतीचा नाहीये. प्रश्नव आहे तो आपल्या तथाकथित सुरक्षित आयुष्याची मुळंच उघडी पडण्याचा, आपल्या चौकटबद्ध विचार संकल्पनांना आणि जी भासमान एकसंध भाषा आपण वापरतो आहोत तिला तडे जाण्याचा.
सध्या सुखाचा सातत्यपूर्ण तवंग असलेल्या एका नितांत सरसपाट आयुष्याची आपल्याला कांक्षा आहे. ते लाभणं हीच आपल्या लेखी इतिकर्तव्यता ठरतेय.
हा असला तवंग हे आपल्यासाठीचं जसं नवं वास्तव आहे.
या तवंगाखाली जगण्याची सवय पाडून घेत आपण आपल्यापुरती अपेक्षांची, सुखाची, त्याच्या परिमाणांची एक भासमानच असलेली पण एकसंध वाटणारी ‘सुखी भाषा’ विकसित केलीय. या ‘सुखी भाषेत’ बोलू शकणार्यांाच्या टोळीतच वावरणं आपल्याला सुरक्षित आणि सोयीचंही वाटतं. ही नवी ‘सुखी भाषा’ आपल्याला इतकी परिपूर्ण आणि शाश्व त वाटतेय, की ह्या भाषेतून आपल्याला कुणीही हलवू शकत नाही, ती मोडू शकत नाही, काहीही झालं तरी तिला तडादेखील जाऊ शकत नाही, ह्या गृहीतकावर आश्व स्त होत आपण आजकाल जगतो.
सामान्यपणे ही अपेक्षा पुरीही होते. भ्रमाचा हा भोपळा सहसा फुटत नाही. कारण ह्या भासमान एकसंध ‘सुखी भाषेला’ आणि त्याआड दडलेल्या समजांना पुष्ट करतील असेच अनुभव आपण वेचण्याची आपण हल्ली सवय करून घेतलेलीय. कुणी वेगळं काही मांडू लागलं, तर ‘बाऽऽस! वेगळा विषय.. काही तरी मऽऽऽस्त बोलू या’ म्हणत या भाषेला संरक्षित करण्याचा पवित्रा घ्यायलाही आपण शिकलोय.
केवळ ‘सुखी भाषा’च नव्हे तर जगण्याची अवघी भाषाच कोसळून पडण्याचा, उद्ध्वस्त होण्याचा प्रसंग या फिल्ममधे येतो.
ही मुलं बोलतात ती भाषा आपल्याला ओळखीची वाटते, त्याचा अर्थ कळतो, त्यांचं म्हणणंही लक्षात येतं. फक्त ही आपली नियमित ‘सुखी भाषा’ नाही हे कापडाला आतून लावलेल्या अस्तरासारखं प्रत्येक वेळी जाणवत राहतं, बोचत राहतं.
ज्या जगाकडे आपण दुर्लक्षच केलेलं आहे, किंवा असं काही नसतं, अशी समजूत करून घेत जे आपण रोजच्या जगण्यापासून झाकून-लपवूनच ठेवलं आहे ते अचानक उघड व्हावं आणि सामोरं यावं असं यात होतं. भल्या-बुर्याखच्या आपण निश्चिउत केलेल्या सगळ्या मखमली व्याख्या टरकावून टाकणारी ही फिल्म, ही मुलं आहेत, ही बघताना माणसाच्या मांसाच्या जळण्याचा वास घरभर पसरून राहतो.
चितेतल्या चटचट वाजणार्याघ ठिणग्या आपल्या केसांत, चेहर्यानवर अडकल्यात असं वाटतं.
कित्येक क्षणांना तर स्क्रीनपासनं तोंड फिरवून आपण बसतो, तरीही मागे पेटलेल्या चितेचा धुमसता आवाज आणि तिच्यातनं वाहणारे खोलवरचे वारे आपल्याला जाणवत राहतात.
राजकीय नेत्याचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळून येतो. मोक्ष तर त्यालाही हवाय. त्याच्या अंगावरचा तिरंगा ध्वज साहजिकच पळवला जातो. त्याचा सौदा होतो. घासाघीस करून तो दोनऐवजी तीन रुपयांना विकला जातो. त्यात ना विकणार्यारला गैर वाटतं ना विकत घेणार्याोला. प्रतीकात्मकरीत्या आज आपण आपला देश इतक्याच सहजपणाने विकायला काढलाच आहे, की तिथे राष्ट्रध्वजाचं एवढं काय दु:ख करता, असं मनात येतं. तितक्यात ज्याने ध्वज विकला तेच पोरगं तोडकं-मोडकं राष्ट्रगीत म्हणत ‘देस तो अपनी मॉं होती है ना’ हे कोणत्याही अभिनिवेशाशिवाय निरलस प्रामाणिकपणे सांगतं. त्या पोराच्या स्वरातला सच्चेपणा ऐकून हादरून जायला होतं. राष्ट्रध्वजात राष्ट्राविषयीचं प्रेम गुंडाळलेलं नसतं, तर ते खूप खोलवर मनात रुजलेलं असावं लागतं, हे या मुलाला कुणी शिकवलं?
‘‘मैं नेता हो गया तो... मैं तो सब गरिबोंको घर देना चाहता हूँ, जिनके घरमें चुल्हा न जले उनके घर चुल्हा जलाना चाहता हूं... सबको खाना-पीना मिले, सब स्वस्थ रहें’, असं एक मुलगा गुटख्याची दिवसातली पस्तिसावी पुडी खात बोलतो. ‘गुटखा खाके मुझको कॅन्सर हो गया तो आप इलाज करवायेंगे ना?’ असं भाबड्या विश्वाटसाने तोच विचारतो. दुसरा कुणी ‘मुझे पायलट होना है’ म्हणतो. घाटावरच्या धडाडणार्याख एखाद्या चितेकडे बघत तटस्थ साधूसारखं ‘सपने सच कहॉं होते हैं, हमें तो यहीं जीना है और यहीं मरना,’ असं तिसरा कुणी मांडतो.
बोलणार्यांनचा वयोगट- दहा ते पंधरा वर्षं.
हा कोणता देश, हे कोणतं माणूसपण, जे जगण्यालाच चूड लावतं? आणि या मुलांकडे ही सभ्यता कुठनं जन्मली, जी लाभलेल्या जगण्याविषयी कोणत्याही तक्रारीशिवाय कृतज्ञता व्यक्त करते?
उत्तरं नसलेले प्रश्नव आणि प्रतिवाद नसलेली विधानं.
फिल्मदरम्यान ही मुलंच बोलतात. त्यांच्या वतीने म्हणणं मांडणारा कुणी नॅरेटर नाही. कधीमधी विचारले गेले तर ओंजळभर प्रश्नं. त्या प्रश्नीकर्त्याचा आवाज पार्श्वनभूमीवर येतो. त्याला ही मुलं उत्तरं देतात. त्या सगळ्यांचा त्यांच्या वयाला साजेसा आवाज आहे. ते सहज, कोणताही आव न आणता बोलतात. फक्त महत्त्वाचं काही सांगताना त्यांचा आवाज, सगळी मांडणी सपाट होऊन जाते. आवाजाचे चढ-उतार लोप पावतात. जळलेल्या भावनेची राख शब्दांना फासलेली असावी इतका कोरडेपणा त्यांच्या स्वरात उमटतो.
आता घाटावर पावसाळा आलाय.
पाण्याचे टपोरे थेंब गंगेवर पडताहेत. सगळ्याला मूक साक्षी असलेली ती जान्हवी गर्भार असल्यासारखी पुष्ट झालीय. सगळा आसमंत भिजून गेलाय.
पण मृत्यूला खळ नाही. त्याला विश्राम नाही, ऋतूंचा अवरोध नाही.
चिता धडधडत राहतात. इतक्या लहान वयात निबर झालेल्या चेहर्याीवरनं पाणी निथळत राहतं. डोळे वस्त्रांवर लक्ष ठेवून असतात. अपमान पचवत, उपेक्षा झेलत कालचंच जगणं आज पुढे सुरू आहे.
मनकर्णिका घाटावरची ही मुलं नव्या मृतदेहावरचं, कदाचित मागे त्यांनीच पळवलेलं, आता पुन्हा नवंकोरं झालेलं अंतिम वस्त्र पुन्हा प्राप्त करताहेत.
मिळालेलं वस्त्र घेऊन ती नदीकाठच्या वाळवंटात पळापळी करू लागतात. ते भिरभिरणारं वस्त्र आणि ती चौदा कोवळी पावलं. कुणाचेच आवाज येत नाहीत. फडफडत्या वस्त्रांच्या आड लपलेले खोलवरचे वारे आतपर्यंत जाणवत जाताहेत.
कबीर नावाच्या महामानवाने समस्त मानवजातीसाठी लिहून ठेवलेली ‘उड़ जायेगा हंस अकेला... जगदर्शन का मेला’ ही मृत्यूची प्रक्रिया कुमार गंधर्वांच्या आवाजात मागे दिसणार्या. दृश्यांना सोबत करते आहे.
माणसाच्या आयुष्यात अग्नीचं स्थान वरचं आहे.
अग्नी म्हणजे विश्वारूपाने व्यक्त झालेला, विश्वारचं तत्त्व जाणणारा, विश्वायला मार्गदर्शक सगुण साकार परमेश्वनर म्हणून मानला गेलेला आहे. अग्नीला ‘जातवेदस’ म्हटलं गेलेलं आहे.
ऋग्वेदातला ऋषी प्रथम मंडलात प्रार्थना करतो. म्हणतो,
‘यज्ञाच्या अग्रभागी अवहनीय रूपाने स्थित असलेल्या, दानादी गुणांनी युक्त, ऋतूनुसार देवांना आवाहन करून अखंड यज्ञ करणार्या , रमणीय विपुल संपत्ती देणार्या अग्नीची मी प्रार्थना करतो.
बाप ज्याप्रमाणे पुत्राला अगदी जवळचा असतो, त्याचप्रमाणे हे अग्नी, तू आम्हाला जवळ अस. आमच्या कल्याणासाठी आमच्या अगदी जवळ अस.’
आयुष्यातील सारी गंभीर कर्मं अग्निसाक्ष करण्याची वैदिकांची रीत आहे.
ही मुलं वैदिकांपुढे दोन पावलं म्हणावीत अशी आहेत. ती अग्निसाक्ष जगताहेत.
एक आर्ष ऋषी आणि दुसरं समकालीन बालपण, ज्यांच्या वाट्याला अग्नीच्या प्रार्थनेतली रमणीयता, संपत्तिदायकता आलेलीच नाही. केवळ पोट जाळण्यासाठी म्हणून त्यांना निखारा गिळावा लागतोय आणि तो गिळताना त्यांच्या समोरच्या अग्नीत माणूस जळतो आहे.
त्यांना कल्पना नाही, पण ते स्वत: आणि त्यांचं बालपणही त्या चितेतच राख होऊन गेलंय.
काळोख... काळोख... काळोख.
-----------------------
ज्येष्ठ कवी दिलीप पुरुषोत्तम चित्रे ‘बर्फाचे दिवस’ या कवितेत म्हणतात,
‘भाषा नाहीशी होताना
खोलवर वारे वहात होते.’
ह्या ओळी खूप काळ माझ्यासोबत घोटाळताहेत.
ही कविता निव्वळ आधिभौतिक आहे असं मला वाटत नाही.
हे कोणत्या भाषेचं नाहीसं होणं आणि त्याखाली असणारा अस्तित्वाचा हा कुठला खोलवरचा थर?
वैखरी मावळून जाताना पश्यंतीच्या, परेच्या पातळीवर उमटणारं हे चैतन्याचं स्पंदन, विश्वाीत्मक आणि विश्वोयत्तीर्ण भान की आणखी काही?
मनुष्य हा भाषावान प्राणी आहे. भाषा नाहीशी होताना प्रकटलेली ही मृत्यूची भयाण काळोखी शांतता? पण मग हा ‘साक्षी’ कोण, जो ‘वारे वहात होते’ ही नोंद घेतोय?
द्रष्टा, दृश्य, दर्शन या त्रिपुटीतला आंतरसंबंध मावळून जातानाची, गेल्यानंतरची ही अवस्था?
आपल्या चित्ताच्या आरशात दिसतील तितकी प्रतिबिंबं.
कोणत्याही अनुषंगाने ह्या दोन ओळींदरम्यान पसरून राहिलेली अस्तित्वहीन पोकळी मृत्यूचं सूचन करते आहे, त्याचं दर्शन घडवू पाहते आहे असं वाटत राहतं.
चित्र्यांशी याबाबत बोलताना ते म्हणाले होते, ‘शक्य आहे. जे काही होतं, थेट-समक्ष होतं. कदाचित प्रकाश किंवा संपूर्ण काळोखही. तू म्हणतोस तसा हा अनुभव ओळींदरम्यानचाही असू शकतो.’
मृत्यूचं अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष दर्शन होताना या ओळी स्मरणातनं उमटल्या हे खरं.
--------------------------
मेडिकल कॉलेजमधे दुसर्या- वर्षी ‘फोरेन्सिक मेडिसिन’ नावाचा विषय आम्हाला अभ्यासक्रमात होता. त्याचं मराठी नाव मोठं समर्पक होतं, ‘न्यायवैद्यक शास्त्र’. त्यात पोस्टमॉर्टेम, म्हणजे मृतदेहाची चिरफाड करून आतल्या सगळ्या अवयवांची तपासणी, त्या अनुषंगाने कराव्या लागणार्या इतर आवश्यक त्या तपासण्या, मृत्यूच्या कारणाची निश्चिअती, विषशास्त्र, इथपासून ते पार न्यायालयात वैद्यकशास्त्राचा, वैद्यकीय व्यावसायिकाचा कसा आणि कोणता सहभाग असतो, या सगळ्याविषयी सांगोपांग शिकवलं जायचं.
काही पोस्टमॉर्टेमच्या वेळी उपस्थित राहून, नोंदी करून एक जर्नल पुरं करावं लागायचं.
मी ज्या वेळी पहिल्यांदा पोस्टमॉर्टेम बघायला गेलो ती पावसाळी संध्याकाळ होती.
अवेळीचा अंधार. कधीही ढग फुटतील आणि सगळं वाहून जाईल असं कोंदून आलेलं.
पोस्टमॉर्टेम केलं जायचं त्या मोठ्या हॉलमधे टेबलवर एक प्रेत ठेवलेलं. साधारण तिशी-पस्तिशीचा तरुण. चांगले कपडे, नीट दाढी केलेली. शर्ट पँटमधे खोचलेला. पायांत मोजे. व्हाइट कॉलर्ड जॉब करत असावा असा. चेहर्यााची एक बाजू मात्र पूर्ण चेमटून गेलेली. पातळ पत्र्याच्या डब्याला यावा असा चेहर्याकला डावीकडे आलेला मोठा पोचा. आसपास सुकून गेलेले रक्ताचे डाग. बाकी अंगावर रक्ताचा एकही डाग नाही.
‘सुसाइड का होमिसाइड का केवळ ऍक्सिडेंट? तुझं काय मत आहे?’ सरांनी मला विचारलं.
मला काहीच येत नव्हतं.
‘बघ... हा शांताराम दाखवेल सगळं.’ ते म्हणाले.
शांताराम वयाने माझ्यापेक्षा साधारण पाच-सातच वर्षं मोठा असणार.
‘ये बाजू आ जाओ डाक्टरसाब.’ त्याने मला त्याच्या बाजूला बोलावलं.
‘डेड बॉडी देखाय पयले?’ सहज सराईतपणाने मृत शरीरावर छेद घेत त्याने विचारलं. मी होकार दिला. ‘घरमें डेथ होताय तो सब खतम होताय| इधर तो डेथके बाद सब चालू!’ त्याने कवटी फोडली. चेहर्याावर कुठे कुठे काय काय झालं होतं, कोणती हाडं मोडली होती, कुठे रक्त साठलं होतं, आत काय झालं होतं- सगळं दाखवलं. त्याची सविस्तर निरीक्षणं सरांना सांगितली.
‘ठीकसे सुना ना तो डेड बॉडी बोलताय|’ कवितेत एखाद्या ठिकाणी उत्स्फूर्त दाद उमटावी तशी हे काही अवयव बघताना शांतारामकडनं उमटत होती.
‘व्हिसेरा रखनेकाय?’ पोटातले अवयव सुटे करून तपासत शांतारामने सरांना विचारलं.
ऍनाटॉमीमधे मृतदेह बघायची सवय होती. घरीही कुणाचे ना कुणाचे मृत्यू बघण्यात आलेले होतेच.
त्यामुळे मृत्यूची अगदीच ओळख नव्हती असं नाही. तरी ताजा मृत्यू आणि त्या देहावरचे हे असे संस्कार मी कधी बघितलेले नव्हते. खरं सांगायचं तर मी अगदी गोठून गेलो होतो.
‘सकाळी नोकरीवर निघाला असणार. लोकलमधनं जाताना हात निसटला... बाहेरच्या खांबावर चेहरा आपटला. मॅक्झिला, ऑरबिट- सगळं गेलंय, पण- कुठे मारामारीच्या, झटापटीच्या खुणा नाहीत....’ सर समजावून सांगत होते.
तोवर सर्जनच्या सफाईने शांतारामने शरीर शिवून टाकलं आणि सगळं स्वच्छ करून पांढर्याा कपड्यात लपेटलंही. सगळं इतकं सफाईदार आणि नेटकं की आत असं काही केलं असावं हे बाहेरनं जाणवूही नये.
‘दूसरा भी कर लेते सर, ये बच्चेका’ असं म्हणत त्याने त्या तरुणाचा देह स्ट्रेचरवर सरकवला आणि पलीकडचं एक मूल टेबलवर घेतलं.
मी आजूबाजूला पाह्यलं.
त्या हॉलमधे मागच्या बाजूला थिएटरमधे असते त्याप्रमाणे बाल्कनीसारखी थोडी उंचावलेली व्यवस्था होती. विविध अवस्थांतली प्रेतं त्यावर ठेवलेली. मृत्यू कोणत्याही कारणानं आलेला असो, आता भेद सरले, आता आपण सारे एकत्र, अशा पद्धतीने एकमेकांसोबत पडून राह्यलेली. कधी आपला नंबर लागणार आणि कधी आपलं पोस्टमॉर्टेम होणार, ह्याची जशी वाट बघत थांबलेली!
तिथल्याच एका पायरीवर मोठ्या घमेल्यात लहान लहान मुलांची किंवा लहानखुर्याक चणीची काही प्रेतं ठेवलेली. परडीत वेण्या मांडून ठेवाव्या अशी. हात- दोन हात लांबीची. कडक झालेली शरीरं आणि चेहर्यापवर थिजून गेलेले भाव.
त्यातलंच एक मूल शांतारामने उचललेलं दिसत होतं.
पहिलं ठीक होतं, पण लहान मूल फाडलं जाताना बघायची माझी हिंमत नव्हती.
परवानगी घेऊन मी बाहेरच्या पारावर आडोशाला जाऊन बसलो. पाऊस सुरू झाला होता.
त्या आवाजाने आणि आसपासच्या जिवंत माणसांच्या थोड्याशा का होईना, वावराने मला जरा हुश्श झालं. आपणही जिवंत आहोत याचा जसा दिलासा मिळाला.
आसपास जी काही गर्दी होती ती आतल्या मृतदेहांच्या नातेवाइकांची असणार.
समाजाच्या वेगवेगळ्या स्तरांतली माणसं पाण्यावर आलेल्या पाखरांसारखी शांत बसून होती. थोडीफार कुजबूज. एखाद्या वेळी दबक्या आवाजातलं रडणं. ऍम्ब्युलन्समधनं नवं प्रेत यायचं तेव्हा किंवा नेलं जायचं तेव्हा होईल तेवढाच गलबला. बाकी शांतताच केवळ. मृतदेहाला काही काळानंतर विशेष वास येतो. तो झाकून टाकण्यासाठी वापरलेलं निलगिरीचं तेल आणि त्याचा वातावरणभर पसरून राह्यलेला उग्र दर्प. पार्श्वयसंगीतासारखा पाऊस.
या सगळ्याच्या खालून अंत:प्रवाहासारखा पसरून राह्यलेला मृत्यूचा अदृश्य थर.... सायीसारखा. तिथल्या सगळ्या वातावरणाला या मृत्यूनं जसं स्वत:त लपेटून घेतलं होतं. बर्फाळ प्रदेशात खुरटं रोपटंही उगवू नये तसं इतर कुठलंही जिवंत अस्तित्व या परिसरात जसं रुजूच शकत नव्हतं.
मृत्यू ही तिथल्या प्रवेशाची जशी पूर्वअट होती.
मी बसलो होतो तिथनं आतल्या हॉलपर्यंत जाणारा कॉरिडॉर दिसत होता. त्याच्या अंताला एक मोठी पाटी होती- सगळ्यांचं स्वागत करत असावी अशी :
“The language of the dead is deciphered here.” (मृतांची भाषा इथे उलगडली जाते.)
आत जाताना हिच्याकडे माझं लक्ष गेलं नव्हतं.
किती तरी वेळ गेला. शेजारी कुणी तरी येऊन बसल्याचं जाणवलं, पण मान वर करून बघायचीसुद्धा इच्छा होत नव्हती. जरा वेळाने त्या माणसानंच कळत-नकळत मला स्पर्श केला.
बघितलं तर शांताराम. आतमधे ज्याने पोस्टमॉर्टेम केलं होतं तो.
‘बुरा लगा?’ माझ्याकडे बघत तोंडभरून निर्मळ हसत त्याने विचारलं.
मी नुसतीच मान हलवली.
‘बुरा तो लगताही है साब पयले| आदत हो जाती है| बादमें मज़ाभी आता है|’ त्याने नुकत्याच पेटवलेल्या बिडीचा मन:पूर्वक झुरका घेतला.
उघड्या त्वचेवर एखाद्या साध्याशा ब्लेडने सहजपणानं छेद देत, ती जखम थेट हाडापर्यंत खणत नेताना व्हावी अशी वेदना मला झाली.
आभाळात भरलेलं काजळ, उतरणीला लागलेला पाऊस, वार्यानचा वाढत चाललेला वेग आणि अधूनमधून शांतारामच्या ओठांतलं तेजाळून निघणारं बिडीचं टोक.....
काळोख... काळोख... काळोख.
--------------------
‘चिल्ड्रेन ऑफ पायर’ पाहिल्यानंतर ती पोस्टमॉर्टेमची आठवण जागली आणि मग त्यासोबत चित्र्यांच्या ‘भाषा नाहीशी होताना खोलवर वारे वहात होते’ या ओळी मनात घुटमळत राहिल्या. सोबत अनादी अनंत भासणार्याव गंगेचा अप्रतिहत प्रवाह.
गंगेच्या टेबलवर ठेवलेलं लहान मुलाचं प्रेत. तिच्या काठावर बहरलेला धर्म. प्राचीन दगडी मंदिरं. त्यांचे उंचावलेले कळस, फडकते ध्वज आणि प्रवाहात उतरत गेलेले घाट. काठालगत एकमेकांना बिलगून असणार्या इमारतींमधून घाटांकडे येणारे बोळ, त्यातच पसरून राहिलेली ती बाल्कनीतल्या परडीतली प्रेतं. तिथल्या इमारतींवर झळकणारी ‘इथे मृतांची भाषा उलगडली जाते’ ही पाटी. शतकानुशतकं तिथेच उभे असावेत असे शांताराम, गगन, योगी माझ्या मिटल्या डोळ्यांत वस्तीला येऊन थांबलेत.
या सगळ्यावर पोस्टमॉर्टेम रूममधला ढणढणता दिवा प्रकाश पाडतोय.
त्या एवढ्याशा बोळातून एखाद्या ढगाला खांद्यावर घेऊन येत असल्यासारखी मृतदेहाला वाहून आणणारी माणसं... स्वत:च्याच पावलांशी मेळ साधलेले त्यांचे ‘रामनाम सत्य है, रामनाम सत्य है...’ हे उद्गार माझ्या कानांत कुणी तरी सतत गुणगुणतंय. म्हणतंय, ‘सर, वो बच्चेका भी पोस्टमॉर्टेम कर लेते..’
मागे जे लाल भरजरी वस्त्र फडफडतंय ते कुणाच्या देहावरचं?
का ते वस्त्र नाहीय? तो रक्ताचाच लाल रंग आहे.
मी त्या देहाच्या रोखाने निघालोय.
आता पोस्टमॉर्टेम करणार्याि शांतारामच्या, त्या देहाच्या आणि या मुलांच्या चेहर्यां त असलेलं विलक्षण साम्य माझ्या लक्षात यायला लागलंय. सगळ्यांचे चेहरे आता स्पष्ट दिसताहेत. ते सारखे आहेत. नव्हे, ते एकच आहेत... तो पोस्टमॉर्टेम होत असलेला तरुण, ती घाटावर जळत असलेली प्रेतं, आता हे जळायला जाणारं प्रेत, त्याच्या आसपासची ही माणसं... मुलं... शांताराम... सर... गंगेवरची सगळीच प्रेतं... जगलेले, जगतील असे, जगून गेलेले... परडीतले लहानखुरे.... आणि आपणही... सगळे जसे एकच आहोत जसे. कदाचित आपला चेहरा शांतारामसारखा दिसतोय, किंवा गंगे किनारी आपण पळतोय... किंवा चितेत जळतो आहे तो मीच....?
जाळणारं कोण? जळतंय कोण? आणि जळणं काय?
माझं असणं कायम आहे. मरण ह्या गोष्टीशी माझा कधी संबंधच नाही आणि तो येणारही नाही, ह्या ठाम धारणेला आतून धक्का बसतोय. माझी शाश्विताची जाणीव वितळून जातेय. माझा काळ माझ्यामुळे जन्माला येतोय हे जाणवतंय. अनित्याला नित्य, अशाश्वाताला शाश्व त, अशुद्धाला शुद्ध मानणं ही अविद्या, आणि अविद्या ही माणसाच्या चित्तातील सर्व क्लेशांची भूमी, असं पंचवीसशे वर्षांपूर्वीचा पतंजली माझ्या कानात स्वच्छपणे पुटपुटतोय.
असणेपणाचं भान आणि नसणेपणाचं ज्ञान ह्यांच्या संधिकालात मी उभाय. मी कधीही नसू शकतो. माझ्या असण्याला कारण नाही आणि माझ्या नसण्यालाही. मग माझी अनन्यत्वाची जाणीव? मी ‘मी’ म्हणून उभारलेत ते सगळे डोलारे? माझा इतिहास?
‘आपुले मरण पाहिले म्यां डोळा, जाहला तो सोहळा अनुपम’ म्हणणार्या तुकोबाच्या अंगाला झोंबणारे खोलवरचे वारे माझ्याही अंगाला झोंबताहेत.
न राहवून मी माझा चेहरा आरशात बघू लागतो.
माझी भाषाच आता नाहीशी होतेय.
-डॉ. समीर कुलकर्णी
‘कृष्णाई’, ११, श्रीनाथ सोसायटी,
मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे - ३८.
मोबाइल : ९८८१४७३२१५.
बातम्यांच्या पलीकडे
निवडक अनुभव
समकालीन प्रकाशन
युनिक फीचर्स
-
व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...


