जातीच्या जोखडात : एका पत्रकाराच्या डायरीतलं एक वर्ष - दीप्ती राऊत

29 जून 2013
आजचा दिवस वेगळा होता.
उशिरा सुरू झालेल्या पावसानंतर या आठवड्यात बातम्यांचाही पाऊस पडला. फुल वैताग.. पाऊस आणि पावसाळी अधिवेशन. आजचा शनिवार थोडा निवांत असेल असं वाटलं होतं; पण सकाळीच एक बातमी आली आणि शनिवार पाण्यात वाहून गेला. बापाने मुलीचा खून केल्याची बातमी. गंगापूर रोडवरची घटना. खून करणारा बाप स्वत:हून पोलिस स्टेशनला हजर झाल्याची खबर. धक्कादायक म्हणजे मुलगी गरोदर होती आठ महिन्यांची, आणि त्या अवस्थेत बापाने दोरीने गळा आवळून मुलीचा खून केला होता. अपघात आणि खुनांच्या बातम्या आता रोजच्याच झाल्यात; पण आजची ही बातमी साधी वाटत नव्हती. पोलिस फोन उचलेनात, तेव्हा आळस झटकून उठले आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं.
हाच तो! ओळखीच्या एका हवालदाराने मला नजरेनेच खुणावलं. एकनाथ कुंभारकर पोलिस निरीक्षकांसमोरच्या बाकड्यावर बसलेला. गोरटेलासा रंग. मजबूत बांधा. वय असेल चाळिशीच्या आसपास. काळे केस, फिक्का क्रीम शर्ट. तासाभरापूर्वी या माणसाने आपल्या हाताने आपल्या पोटच्या, आठ महिन्यांची पोटुशी असलेल्या मुलीचा गळा आवळून खून केलाय याचा लवलेशही नसलेला शांत चेहरा. भोवताली पोलिसांची धावपळ. पत्रकार, कॅमेरामन, फोटोग्राफर्सची वाढणारी गर्दी. दाराच्या फटीतून त्याच्या चेहऱ्यावर पडणारे कॅमेऱ्यांचे फ्लॅशेस. आणि एकनाथ कुंभारकरच्या चेहऱ्यावरची अभंग शांतता. माझ्याच काळजात गलबलून गेलं.
मुलीची बॉडी सिव्हिलला आणल्याचं कळलं. गाडीला किक मारली आणि सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. स्टेचरवर टाकलेला प्रमिलाचा मृतदेह. चमकीच्या टिकल्यांची लाल-हिरवी साडी. बहुधा लग्नातली असावी. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आली म्हणून हौसेने नेसून आलेली. भांगात सिंदूर. कानांत डूल. एकोणीस वर्षांचं कोवळं वय. पोटात आठ महिन्यांचं बाळ. आदल्या रात्री उशिरापर्यंत आई-आजीसोबत साठलेल्या भरपूर गप्पा मारल्यानंतर थकून झोपल्यागत चेहऱ्यावरचे हसरे भाव. आणि हॉस्पिटलबाहेर प्रमिलाच्या आई-आजीचा हंबरडा...काळजात चर्रर्र झालं.
ऑफिसला बातमी कळवली.
न्यूज फ्लॅश-
नाशिकमधली धक्कादायक घटना
बापाने केला गरोदर मुलीचा खून
गळा आवळून केला खून
आंतरजातीय लग्नामुळे नाराजी
मुलगी : प्रमिला कांबळे
बाप : एकनाथ कुंभारकर
कुंभारकर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन

मग दिवसभर याच बातमीचा मागोवा. प्रमिलाच्या वडिलांसोबत आलेल्या रिक्षावाल्याचा जबाब, पोलिसांची बाइट, प्रत्यक्षदर्शींची शोधाशोध आणि प्रमिलाच्या नवऱ्याचा- दीपकचा सुन्न चेहरा...
आजचा दिवस असा धावपळीत गेला. दमायला झालंय. शरीरापेक्षा मनाने आणि धावपळीपेक्षाही विचारांनी.
अजूनही माझ्या चेहऱ्यासमोरून स्ट्रेचरवरचा प्रमिलाचा इवलासा मृतदेह हलत नाहीए ... हॉस्पिटलच्या पांढऱ्या चादरीतून किंचित वर आलेलं पोट, लाल-हिरव्या टिकल्यांच्या साडीचा पिनअप केलेला पदर, हसरा चेहरा आणि पोलिसांसमोर बसलेल्या तिच्या बापाच्या- एकनाथ कुंभारकरच्या चेहऱ्यावरचे शांत भाव.
30 जून 2013
आज प्रमिलाच्या वडलांना- एकनाथ कुंभारकरला पोलिसांनी कोर्टात आणलं होतं.
कालचाच फिक्का क्रीम कलरचा शर्ट आणि कालचेच ते चेहऱ्यावरचे शांत भाव. हातांत पोलिसांच्या हातकड्या, एवढाच काय तो फरक. कोर्टात नेहमीपेक्षा जास्त गर्दी. सगळ्यांच्या नजरा एकनाथ कुंभारकरकडे खिळलेल्या.
एकनाथ कुंभारकर मात्र निश्चल.
हो, मी माझ्या मुलीचा खून केलाय. काय करायचं असेल ते करा! मी शिक्षा भोगायला तयार आहे... त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सांगत होते. पोलिस म्हणतात, त्याने जबानीही तशीच दिलीए.
आजी आजारी असल्याचं कारण सांगून प्रमिलाला माहेरी बोलावणं, आदल्या रात्री ओळखीची रिक्षा सांगून ठेवणं, सोबत नायलॉनची दोरी घेणं... नियोजनबद्ध पद्धतीने, थंड डोक्याने केलेला खून. सरकारी वकिलांची कोर्टापुढे मांडणी. संशयित आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश.
बातमीचे अपडेट्स ऑफिसला कळवले. एकनाथ कुंभारकरचे कोर्टातले व्हिज्युअल्स पाठवले.
पण माझ्या मनातल प्रश्नांचं काहूर कायम. पोटच्या पोरीचा असा शेवट का केला असेल एका बापाने? जातीबाहेर लग्न केल्याचा एवढा राग का? रागाच्या भरात माणूस एवढ्या थराला कसा जाऊ शकतो? आणि एवढं गंभीर कृत्य करूनही चेहऱ्यावर दु:खाचा किंवा पश्चात्तापाचा लवलेशसुद्धा कसा नाही?
1 जुलै 2013
सकाळीच जितूचा फोन :
प्रमिला कांबळेच्या हत्येचा आम्ही निषेध करणार आहोत. 10 वाजता हुतात्मा स्मारकासमोर या.
जितेंद्र भावे. चळवळा कार्यकर्ता. त्याने ‘अंनिस’सारख्या सामाजिक संस्था-संघटनांचे चार कार्यकर्ते जमवले, फलक लावले, घोषणा दिल्या आणि निषेध करणारं निवेदन दिलं. अजून काय करणार? कारण आरोपी तर स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये हजर झालेला.
प्रमिलाच्या बापाने असं का केलं असावं याचं कोडं मात्र कुणालाच सुटलेलं नाहीए. जितू पण तेच म्हणत होता.
3 जुलै 2013
आजही सकाळीच पहिला फोन- गंगापूर पोलिस स्टेशनला या. प्रमिलाच्या केसमध्ये महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे. गेले. अण्णा हिंगमिरे नावाचे गृहस्थ तिथे आलेले होते. सोबत ‘अंनिस’चे कार्यकर्ते महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे. प्रमिलाच्या हत्येची बातमी वाचून अण्णा हिंगमिऱ्यांनी ‘सकाळ’ दैनिकाच्या ऑफिसमध्ये संपर्क साधला होता. तिथून त्यांना पोलिस स्टेशनला पाठवण्यात आलं. हिंगमिरेही प्रमिलाच्या भटक्या जोशी समाजातले. त्यांनी पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. प्रमिलाच्या लग्नानंतर गेल्या वर्षभरापासून एकनाथ कुंभारकरच्या कुटुंबाला जात पंचायतीने वाळीत टाकलं होतं, प्रमिलाने जातीबाहेर लग्न केलं म्हणून. हत्या जात पंचायतीच्या दबावामुळे झाली असल्याची शक्यता आहे. अण्णा हिंगमिरे यांच्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्यापासून त्यांच्या कुटुंबालाही जात पंचायतीने वाळीत टाकलं होतं. जात पंचायतीच्या दहशतीचे चटके स्वत: हिंगमिरे भोगताहेत. पंचांच्या दबावामुळे ते अद्याप मुलीला भेटू शकलेले नाहीत की मुलगी माहेरी येऊ शकलेली नाही. इतकंच नाही, तर जातीतल्या कोणत्याही लग्नकार्यास, कुणाच्याही अंत्यसंस्कारविधीस त्यांना बोलावलं जात नाही. प्रमिलाची बातमी वाचल्यावर अण्णांना जात पंचायतीविरुद्ध लढण्यासाठी एकदम हुरूप आलाय. यापूर्वी त्यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये जात पंचायतीच्या दहशतीविरोधात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नव्हती. उलट, तक्रार करायला गेले म्हणून त्यांनाच मारहाण करण्यात आली होती.
अण्णांनी आज पोलिसांना महत्त्वाची माहिती दिलीय. अण्णांना वाळीत टाकणाऱ्या जोशी समाजाच्या पंचांनीच प्रमिलाच्या वडलांना- एकनाथ कुंभारकरला वाळीत टाकलं होतं. एकनाथ कुंभारकरवर पंचांचा प्रचंड दबाव होता. पंचांनी त्याला पाच हजार रुपयांचा दंडही केला होता. तो भरूनही वाळीत टाकल्यामुळे होणारा अपमान आणि अवहेलना सहन न झाल्याने त्याने प्रमिलाला संपवण्याचं ठरवलं असावं...

बाप रे! कधी कधी कळत नाही कुठे चाललो आहोत आपण...
आज दोन बापांच्या बातम्या केल्या. एक, जातीच्या दबावाला बळी पडून मुलीची हत्या करणारा एकनाथ कुंभारकर आणि दुसरे, जातीच्या दबावाविरोधात, जात पंचायतीविरोधात निर्भीडपणे उभे राहणारे अण्णा हिंगमिरे. एकाची मुलगी प्रमिला आणि दुसऱ्याची प्रतिभा. एकीला बापानेच संपवलं, तर दुसरीला भेटण्यासाठी बाप धडपडतोय.
4 जुलै 2013
अण्णा हिंगमिऱ्यांनी जोशी समाजातील सहा पंचांविरोधात गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. दर महिन्याच्या 25 तारखेला पंचवटीत कुंभारकरांच्या घरी जात पंचायत भरते. तिथे सर्व न्यायनिवाडा केला जातो. विशेषत: जातीबाहेर लग्न करणाऱ्यांना वाळीत टाकलं जातं. त्यांच्या कुटुंबासोबत जातीतल्या कुणालाही लग्न करण्याची परवानगी दिली जात नाही. त्यांच्याकडील अंत्यविधीला कुणी येत नाही. त्यांना इतरांच्या लग्न किंवा अन्य कार्यक्रमांत सहभागी होऊ दिलं जात नाही. ते कुणाच्या लग्नाला गेले तर त्यांना अपमानित करून बाहेर हाकलून काढलं जातं. जात पंचायतीच्या या दडपशाहीमुळे अनेकांची लग्नं होत नाहीत. कित्येकांची लग्नं मोडतात. पंच मनमानी पद्धतीने शिक्षा करतात. पाच हजारांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावतात. संबंधिताने ते पैसे भरले की त्याच्यावरचा बहिष्कार मागे घेतला जातो... दंड की खंडणी, हाच यातला प्रश्न होता.
प्रमिलाच्या हत्येला आता वेगळंच वळण आलंय. ड्रायव्हर म्हणून निवृत्त झालेले अण्णा प्रमिलाच्या मृत्यूनंतर जात पंचायतीविरोधात पेटून उठलेत. जात पंचायतीने त्यांना केलेला दंड भरणार नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यांच्यामुळेच पंचांच्या दडपशाहीची माहिती समोर आलीय. माध्यमांपुढे आणि पोलिसांपुढेही.
5 जुलै 2013
पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी आज स्टेटमेंट दिलंय-
प्रमिला हत्याप्रकरणात पोलिस जात पंचायत फॅक्टर तपासणार.
6 जुलै 2013
गंगापूर पोलिस स्टेशनच्या आवारात उभं राहायला जागा नव्हती एवढे लोक जमले होते. कुणी अहमदनगरमधून आलेले, कुणी औरंगाबादमधून आलेले. जोशी, वैदू, गोसावी... वेगवेगळ्या समाजांचे. जात पंचायतींच्या दडपशाहीने पिचलेले. नाशिकमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या विषयाचा चांगला पाठपुरावा केला. जात पंचायती करत असलेल्या दडपशाहीबाबत दैनिक ‘सकाळ’चे संपादक उत्तम कांबळे यांनी एक लेख लिहिला आणि लेखासोबत ‘अंनिस’चे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांचा मोबाइल नंबर दिलाय. त्यामुळे राज्यभरातून चांदगुड्यांना फोनवर फोन आले. जात पंचायतीच्या दडपशाहीच्या तक्रारी सगळे ऐकवू लागले. त्या सगळ्यांना चांदगुड्यांनी गंगापूर पोलिस स्टेशनवर बोलावलं. जोशी समाजातल्या त्याच पंचांविरोधात ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारी एकत्र करण्यात आल्या.
7 जुलै 2013
आज सहा पंचांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
संध्याकाळी कशीबशी सातच्या डेडलाइनपर्यंत बातमी झाली खरी, पण दिवसभर खूपच ताण आला.
पंचांच्या छळवादाविरोधात राज्यभरातून आलेले तक्रारदार आणि पंचांविरोधात कारवाई होऊ नये म्हणून पोलिस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसलेले नाशिकमधील काही राजकीय नेते. पंच लक्ष्मण शिंदे हे राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचे सासरे, शिवाजी कुंभारकर हे पंच मनसेचे नगरसेवक रुची कुंभारकरचे वडील, भाजपचे माजी नगरसेवक हिंगमिरे आणि माजी महापौर बाळासाहेब सानप, सगळेच हजर. पंचांविरोधात गुन्हा दाखल करा म्हणून लोकांच्या तक्रारी. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून राजकारण्यांचा दबाव. पोलिस कात्रीत सापडलेले. मीडियाचे कॅमेरे रोखलेले. कॅमेऱ्यासमोर बोलायला कुणी तयार नव्हतं. खासगीत सांगत होते, पंचवटी भागात जोशी समाजाची मतं महत्त्वाची आहेत. या भागातून निवडून यायचं असेल तर त्यांच्यासोबत राहावं लागतं म्हणून आलो.
शेवटी राजकीय मंडळींचा नाद सोडून दिला आणि तक्रारदारांच्या बाइट्स घेतल्या.
..रणजितकुमार कुंभारकर नाशिकच्या एका ऑटोमोबाइल कंपनीमध्ये काम करतात. त्यांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांना वाळीत टाकण्यात आलंय. ते स्वत:च्या आजीच्या अंत्ययात्रेला गेले म्हणून पंचांनी त्यांना पंचवीस हजार रुपये दंड आकारला. तो भरल्यावरही बहिष्कार मागे घेतलेला नाहीय.
..तुकाराम जाधवांचीही अशीच अवस्था. पंचांनी सांगितलेला पन्नास हजार रुपयांचा दंड भरला तेव्हा कुठे त्यांना स्वत:च्या वडलांच्या अंत्यविधीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.
..उत्तम शिंदे हा तर तहसीलदारांचा मुलगा. त्याचा भाऊ प्रसिद्ध कोरिओग्राफर. उत्तमच्या बहिणीने गोंधळी समाजातील मुलाशी लग्न केलं म्हणून पंचांनी त्यांना जातीबाहेर काढलंय.
...65 वर्षे वय असलेल्या मालतीबाई गरड लासलगावहून आलेल्या. त्यांची कथा तर अक्षरश: चक्रावून टाकणारी. मालतीबाईंनी तीस वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला म्हणून त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आला. त्यांच्या पतीच्या निधनानंतर अंत्ययात्रेला कुणाला येऊ दिलं नाही. त्यांच्या मुलाचं लग्नाचं वय वाढत चाललंय, पण ‘त्याला कुणी मुलगी देऊ नका’ असा जातपंचायतीचा फतवा. तीस वर्षांपासून साठलेलं दु:ख मालतीबाईंच्या डोळ्यांमधून घळाघळा वाहू लागलं...
एकापेक्षा एकेक विचित्र कहाण्या समोर आल्या आज... जातिव्यवस्थेचा जळजळीत विखार.
शेवटी रात्री उशिरा सहा पंचांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीय. उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे...
8 जुलै 2013
आज अकरा वाजताच आरोपी पंचांना कोर्टात आणलं जाणार होतं म्हणून धावपळ करतच कोर्ट गाठलं. कोर्टाच्या दारापुढे पक्का ट्रॅफिक जॅम. काल पोलिस स्टेशनमध्ये जमलेल्या सगळ्या नगरसेवकांच्या गाड्या; पंचांच्या कुटुंबीयांच्या-नातलगांच्या गाड्या, मीडियाच्या गाड्या. पेपरमध्ये बातम्या आल्याने बघ्यांच्या गाड्या. काही गाड्या नाशिकबाहेरच्याही दिसत होत्या. नंतर चौकशी केली तर कळलं, की महाराष्ट्रभरातले जोशी समाजाचे लोक जमलेत पंचांना पाठिंबा देण्यासाठी. कोर्टाचं आवार गर्दीने तुडुंब भरलं होतं. वातावरणात तणाव साठलेला. चेंबरमध्ये गच्च गर्दी. श्वास घ्यायलाही जागा नव्हती. कोर्टातले अनेक वकील उत्सुकतेने जमलेले. सरकारी वकिलांनी पोलिसांची बाजू मांडली आणि पुढील तपासासाठी संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. नाशिकमधल्या प्रसिद्ध वकिलांनी पंचांचं वकीलपत्र घेतलेलं. वकीलमहाशय उभे राहिले आणि पंचांची बाजू मांडू लागले. प्रमिलाच्या हत्येशी आरोपींचा संबंधच काय, पोलिसांनी दाखल केलेला खंडणीचा गुन्हा कसा चुकीचा आहे, जात पंचायती कशा समाजाच्या विकासासाठी आहेत, त्या कशा समाजहिताचे विधायक उपक्रम राबवतात, त्यासाठी देणग्या घ्याव्या लागतात.. त्याची पावतीपुस्तकं... पुरावे त्यांनी कोर्टापुढे ठेवले. खंडणी मागितल्याचे पुरावे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोर्टाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि संशयित आरोपींना 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली.
पुण्याहून अॅडव्होकेट असीम सरोदे यांचा फोन आला- पोलिसांनी कोणती कलमं लावलीत याच्या चौकशीसाठी. खरं तर जात पंचायतीचं हे प्रकरण पहिल्यांदाच पोलिसांच्या पुढ्यात आलंय. कोणती कलमं लावावीत, कोणत्या कायद्याखाली कारवाई करावी हा पोलिसांपुढचा पेच आहे. त्यामुळे शेवटी पोलिसांनी प्रमिलाच्या हत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि खंडणी मागितल्याबद्दलची कलमं आरोपींवर लावली आहेत. या केसमध्ये ही कलमं तकलादू ठरणार आहेत हे कळतंय. कारण हत्येस प्रवृत्त केलं आणि खंडणी मागितली याचे पुरावेच नाहीत. प्रमिलाच्या वडलांवर पंचांचा दबाव होता. जात पंचायती वाळीत टाकतात, छळ करतात, दंड आकारतात. याविरोधातली कारवाई कोणत्या कायद्यात बसवणार हा पेचच आहे. बघू या काय होतंय. कोर्टातून बाहेर निघताना ‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडेसुद्धा हेच म्हणत होते. जाता जाता उद्याच्या मोर्चाचं निमंत्रण देऊन गेलेत.
9 जुलै 2013
आजचा दिवस थोडा वेगळा होता. आज नाशिकमधल्या सर्व समविचारी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने त्यात सहभागी झाले होते. अन्याय्य जात पंचायती बंद करण्याची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्च्यात अण्णा हिंगमिऱ्यांची मुलगी प्रतिभा आणि जावई प्रशांत नऊ महिन्यांच्या बाळाला घेऊन सहभागी झाले होते. अण्णा आणि प्रतिभाची तिच्या लग्नानंतर पहिल्यांदाच या मोर्च्यात भेट झाली. प्रतिभाने जातीबाहेर लग्न केल्यापासून जात पंचायतीने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं होतं. ना प्रतिभा माहेरी येऊ शकत होती ना अण्णा मुलीला भेटू शकत होते. आज मोर्च्यात भेटले तेव्हा दोघांच्याही डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.
मला नेहमी हा प्रश्न पडतो, की समाजातील विविध प्रश्नांवर अनेक संस्था-संघटना काम करतात, कार्यकर्ते आवाज उठवतात, माध्यमं बातम्या देतात; पण त्याने काय फरक पडतो? अनेकदा काहीच फरक पडताना दिसत नाही तेव्हा मन उद्विग्नही होतं. पण आजच्यासारखा प्रसंग विरळच. आजचा मोर्चा प्रमिलाला खरी श्रद्धांजली देणारा ठरला.
10 जुलै 2013
जात पंचायतीबाबतच्या बातम्यांमुळे राज्यभरातून अनेक लोक पुढे येताहेत. जात पंचायतींच्या अत्याचाराच्या कहाण्या ते सांगताहेत. विशेष म्हणजे त्यात आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर, राजकीय पक्षाचा शहरप्रमुख, तहसीलदार, वनाधिकारी, लष्करातला मेजर, शिक्षक यांची नावं ऐकून आश्चर्यच वाटलं. त्यांना त्यांच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवण्यास सांगितलं जातंय. कार्यकर्ते सांगत होते, जोशी समाजातल्या याच पंचांविरोधात औरंगाबाद पोलिस स्टेशनमध्ये बऱ्याच तक्रारी आल्यात. मी ऑफिसला आणि औरंगाबादच्या आमच्या प्रतिनिधीला कळवलं. म्हणालाय, करतोय कव्हर.
11 जुलै 2013
आज अहमदनगर जिल्ह्यातल्या आमच्या प्रतिनिधीचा फोन आला. अकोला पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार आलीय जात पंचायतीच्या विरोधात. त्याला कव्हर करण्यासाठी पाठवलं. अकोलेतल्या रमेश जाजूंची ती तक्रार होती. माहेश्वरी समाजातल्या पंचांनी त्यांना वाळीत टाकलं होतं. कारण काय, तर समाज मंदिराचा वाद.
12 जुलै 2013
जात पंचायतीविरोधात तक्रारी वाढताहेत आणि बातम्याही. आज पुण्यातली बातमी होती. पुण्याचे ‘काँग्रेस’चे सरचिटणीस काका धर्मावत यांनाच जात पंचायतीने बहिष्कृत केलंय, आंतरजातीय लग्न केलं म्हणून. श्रीगौड ब्राह्मण समाजाच्या पंचांविरोधात त्यांनी बिबवेवाडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. पंचांविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झालीय.
सारंच अचंबित करणारं घडतंय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जात पंचायती कार्यरत आहेत आणि लोकांना एवढा त्रास देताहेत, तरीही जातीच्या दबावापोटी लोक हे सारं सहन करताहेत. कमाल आहे! आणि कसल्या गप्पा मारतोय आपण जातिअंताच्या, बदलाच्या, परिवर्तनाच्या आणि पुरोगामी वारशाच्या? शिक्षणामुळे, काळाप्रमाणे, आधुनिकतेने माणसं बदलल्याच्या?... एक बरंय, लोक आता तरी पुढे येताहेत, अन्यायाविरोधात बोलताहेत. पोलिसांना कारवाई करावी लागतेय... सॉरी प्रमिला... यासाठी तुला जीव गमवावा लागला. माझ्या डोळ्यांपुढचा स्ट्रेचरवरचा नव्या साडीतला प्रमिलाचा मृतदेह जात नाहीय...
14 जुलै 2013
आज आरोपी पंचांची पोलिस कोठडी संपली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
मनातली शंका खरी ठरली. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. पण त्याच वेळी तिथे औरंगाबादचे पोलिस आलेले. याच पंचांविरोधात औरंगाबादमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत त्यांना पोलिस कस्टडी देण्याची विनंती पोलिसांनी कोर्टाला केली. संध्याकाळी कोर्टाने ती दिली. आज अख्खा दिवस कोर्टातच गेला.
15 जुलै 2013
आज औरंगाबादच्या केसबद्दल माहिती घेतली. औरंगाबादच्या आरतीनगरमध्ये राहणारे दगडू गरड 2008 सालापासून पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारत होते. त्यांच्या मुलीने- दीपालीने पोटजातीत लग्न केलं तेव्हापासून जात पंचायतीकडून त्यांचा छळ सुरू आहे. पंचांनी पहिल्यांदा त्यांना एक्कावन्न हजार रुपये दंड केला. हातावर पोट असणाऱ्या गरडांनी तीन टप्प्यांत कसाबसा 42 हजार रुपये दंड भरला. तरी त्यांच्या कुटुंबावरील बहिष्कार कायम आहे. जात पंचायतीने त्यांच्या तिसऱ्या मुलीचं लग्न ठरू दिलं नाही. कहर म्हणजे पहिल्या मुलीच्या नवऱ्याला तिला सोडचिठ्ठी देण्यास भाग पाडलं. इतकंच नाही, तर नाशिकला मेव्हणीच्या लग्नाला ते गेले, तर त्यांना लग्नाच्या मंडपातून अपमानित करून धक्के देऊन हाकलून देण्यात आलं. पुतण्याच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत भावाने त्यांचं नाव छापलं, तर पंचांनी त्या पत्रिका त्याला बदलायला लावल्या. मेव्हण्याच्या दशक्रिया विधीसाठी गेले, तर तिथूनही त्यांना शिवीगाळ करून हाकलून देण्यात आलं. या सगळ्या जाचाला कंटाळून ते शेवटी घर सोडून लातूरला जाऊन राहिलेत... त्यांनी आत्महत्या केली नाही हे नशीब समजायचं त्यांच्या कुटुंबाचं.
कसला हा अमानुषपणा! गुन्हा काय, तर आंतरजातीय विवाह करणं? आणि हा गुन्हा ठरवण्याचा, शिक्षा देण्याचा अधिकार पंचांना दिला कोणी? कायद्याचं राज्य, मानवी हक्क... सारं धाब्यावर बसवलेलं... सुन्न करणारं.
17 जुलै 2013
आज एक चांगली बातमी मिळाली, धुळ्याच्या प्रतिनिधीने पाठवलेली. तिथल्या भगवान गवळींनी चक्क वाजतगाजत गावात जाऊन आपल्या आई-वडिलांची भेट घेतली. तब्बल वीस वर्षांनी. आंतरजातीय लग्न केलं म्हणून गवळी समाजाच्या जात पंचायतीने त्यांना जातीबाहेर काढलं होतं. गवळी पुण्याला राहतात, पण त्यांना गावी धुळ्यात जाण्यापासून जात पंचायतीने बंदी केली होती. त्यामुळे स्वत:च्या आई-वडिलांनाही ते भेटू शकत नव्हते की आई-वडील त्यांना. असा तब्बल वीस वर्षांचा वनवास.
जात पंचायतीविरोधात लोक पुढे येऊ लागल्यावर गवळींनीही पुढाकार घेतला. पण पंचांची दहशत होतीच. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांच्या मदतीने चक्क वाजतगाजत गावात प्रवेश केला, वेशीवरच्या खंडेराव मंदिरात दर्शन घेतलं आणि घरी जाऊन वृद्ध आई-वडिलांची गळाभेट घेतली...
20 जुलै 2013
जात पंचायतीची बरीच प्रकरणं पुढे येताहेत. आज कोल्हापूरची बातमी वाचली. वाशिमच्या बाळू पुजाऱ्यांचा फोटो होता. डोळे अश्रूंनी भरलेले. त्यांच्यावर धनगर समाजाच्या जात पंचायतीने बहिष्कार घातलाय. जमिनीचा तोंडी व्यवहार पूर्ण केला, असा पंचांनी त्यांच्यावर ठपका ठेवलाय. 2010 पासून ते करवीर पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात दाद मागताहेत.
5 ऑगस्ट 2013
आज मिरजेची एक घटना पुढे आली. सासरच्या भाषेएवजी सून मराठीतून बोलते म्हणून तिच्या वडलांना-शिवाजी जाधव यांना गोसावी समाजाने वाळीत टाकलंय. बेडगची घटना आहे. पंचांनी त्यांना ऐंशी हजार रुपये दंड ठोठावलाय. इतकंच नाही, तर मुलीला माहेरी आणून सोडलंय. गेल्या दोन वर्षांपासून ते न्यायालयात दाद मागताहेत.
7 ऑगस्ट 2013
‘अंनिस’चे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे खूप अस्वस्थ आहेत या सर्व प्रकारांनी. सांगत होते, दिवसातून किमान दोन वेळा दाभोलकरांशी बोलतो. ‘अंनिस’ने हा कार्यक्रम हाती घेण्याचं ठरवलंय. 9 ऑगस्टला क्रांतिदिनी राज्यस्तरीय ‘जात पंचायत मूठमाती परिषदे’ने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी त्यांना म्हटलं, येऊ कव्हर करण्यासाठी.
9 ऑगस्ट 2013
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली ‘जात पंचायत मूठमाती परिषद’ झाली, नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. शिवाय पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, नाशिकमधल्या विविध सामाजिक संस्था- संघटनांचे प्रमुख व्यासपीठावर होते. प्रमिलाची हत्या झाली त्या ठिकाणची माती आणून जात पंचायतींना मूठमाती देण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेच्या साक्षीने समतेचं रोप लावून परिषदेचं उद्घाटन झालं.
जात पंचायतींच्या दबावामुळे पिचलेले पण आता बाहेर येऊ लागलेले बरेचजण या परिषदेला राज्यभरातून आले होते. या अन्याय्य व्यवस्थेविरोधात पहिल्यांदा जिद्दीने आवाज उठवणाऱ्या अण्णा हिंगमिऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
राज्यभरातले बहिष्कृत आज नाशिकमध्ये एकत्र आले. पुण्याचे भगवान गवळी, नाशिकचे उत्तम शिंदे, औरंगाबादचे दगडू गरड, अकोल्याचे रमेश जाजू, पुण्याचे काका धर्मावत... आतापर्यंत मानहानीचं एकाकी जीवन जगणारे... सगळ्यांचं दु:ख एकच- जात पंचायतींचा जाच. एकापेक्षा एक भयाण कहाण्या.
गंगापूर रोड पोलिस स्टेशनमध्ये यातले काही तक्रारदार भेटले होते, पण या वेळी त्यांच्या नजरेतले भाव वेगळे जाणवत होते. त्या वेळी त्यांच्या मनात उतरलेल्या भीतीची जागा आता आशेने घेतली होती.
दाभोलकरांचं भाषण नेहमीप्रमाणेच प्रभावी झालं. शांत, ठाम आणि विचारप्रवर्तक... म्हणाले, जात ही अंधश्रद्धाच आहे... त्याविरुद्ध केलेला हा बहिष्कृतांचा एल्गार आहे...
15 ऑगस्ट 2013
रायगड जिल्ह्यातल्या महाडची बातमी.
आज साऱ्या देशाने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला. लष्कराने मानवंदना दिली. जनतेने अभिमानाने छाती फुगवत सुटी साजरी केली. नेत्यांनी भाषणं केली. मीडियाने बातम्या दिल्या. पण त्यात एक बातमी कुठेच नव्हती.
ती बातमी होती, लष्करातल्या जवानाला चोवीस वर्षं वाळीत टाकल्याची.
बबन गायकवाड असं या जवानाचं नाव. आसनपाई बौद्ध जात पंचायतीने त्यांना वाळीत टाकलंय. त्यांचा गुन्हा काय, तर 1989 मध्ये सुटीवर आले असताना त्यांनी बौद्ध विहाराच्या खर्चाचा अहवाल मागितल्याचा. पंचांनी त्याबद्दल त्यांना दहा हजार रुपये दंड ठोठावला, शिवाय त्यांच्याकडे माफीनाम्याचीही मागणी केली. त्यांनी माफी लिहून दिली तरी त्यांच्यावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात आलाय.
स्वातंत्र्यदिन चिरायू होवो!
20 ऑगस्ट 2013
धक्कादायक! दुसरा शब्दच नाही.
आज सकाळी पुण्यात दाभोलकरांची हत्या झाली.
गेले काही दिवस जात पंचायतीच्या निमित्ताने दाभोलकरांभोवती जमलेले सगळे सकाळीच हुतात्मा स्मारकात जमले. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांचा बांध फुटलेला. इतर संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, पत्रकार, नागरिक, युवक आणि बरेचजण आलेले... कुणी काही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हतं. उत्स्फूर्तपणे एक मूक मोर्चा निघाला शहरातून.
सगळेच हादरलेत मुळापासून. मी पण.
22 ऑगस्ट 2013
दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिस म्हणे जात पंचायतींच्या सहभागाची चाचपणी करणारेत. आमच्या पुण्याच्या वार्ताहराने बातमी सांगितली.
23 ऑगस्ट 2013
नेटवर रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातली बातमी होती....वाळीत टाकल्याची तक्रार केली म्हणून गाडीखाली चिरडले..
पूर्ण बातमी डाऊनलोड केली. वाळीत टाकल्याची तक्रार पोलिसात स्टेशनमध्ये देऊन येताना जितेंद्र आणि वृषान्त या तक्रारदारांना मागून येणाऱ्या चारचाकीने ठोकलं. त्यात वृषान्त हा एकोणीस वर्षांचा तक्रारदार युवक जागीच ठार झाला. जितेंद्र भोईर जखमी झाले. त्यांच्यावर मुंबईच्या केईएममध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय.
24 ऑगस्ट 2013
मुंबईची बातमी आहे. पोलादपूरच्या महेंद्र उंबारकरांना चांदेल गावातल्या पंचायतीने वाळीत टाकलंय. ते सध्या मुलुंडमध्ये राहताहेत. त्यांनी चर्मकार समाजातल्या मुलीशी लग्न केलं म्हणून ही शिक्षा. पंचांनी 25 हजारांचा दंड केला. तो देईपर्यंत ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्यास आणि धार्मिक विधी करण्यास मज्जाव करण्यात आलाय.
8 सप्टेंबर 2013
जळगावमध्ये ‘जात पंचायत मूठमाती परिषद’ झाली.
दाभोलकरांच्या हत्येनंतरची पहिली परिषद.
कार्यकर्त्यांनी त्यांचा निर्धार सुरू ठेवलाय.
18 सप्टेंबर 2014
आज सगळ्या पेपरमध्ये पहिल्या पानावर बातमी आहे...
न्यायालयाने सरकारला फटकारलं, ‘जात पंचायतींना आवरा, गुन्हे दाखल करा, कडक कायदा करा.’
त्यामागची सविस्तर बातमी अशी-
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातल्या हरिहरेश्वर येथील कुणबी समाजातील तिघांनी जात पंचायतीविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतलीय. याचिकाकर्ते संतोष जाधव यांना जात पंचायतीने वाळीत टाकलंय. कारण काय, तर ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी जात पंचायतीची परवानगी घेतली नाही.
न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर या केसची सुनावणी झाली.
ज्या सोशल डिसॅबिलिटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता ते विधेयकच मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल डी. जे. खंबाटा यांनी न्यायालयाला दिलीय.
थोडक्यात, ज्या गोष्टीसाठी गेले काही दिवस हा अट्टहास सुरू आहे त्यासाठीचा सक्षम कायदाच आपल्याकडे नाहीय तर.
20 सप्टेंबर 2013
गृहखात्याच्या कार्यालयात शोधाशोध सुरू होती.
1985च्या सामाजिक अपात्रता प्रतिबंधक कायद्याची प्रतच सरकारला सापडत नाहीय.
कमाल आहे! कायदा करायचा सरकारने आणि हरवायचाही सरकारनेच?
या कायद्याची प्रत गेल्या सात वर्षांपासून गायब असल्याचं अॅड. असीम सरोदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय.
21 सप्टेंबर 2013
आज अलिबागची बातमी कळली.
तालुक्यातल्या सुडकोली गावात एक दवंडी पिटण्यात आलीय गावकीची...
‘...या दत्ताच्या गण्याच्या कोणी भेटीगाठी घ्यायच्या नाहीत, त्याची चालढाल करायची नाही... करताना गावंल तो पाचशे रुपयाचा गुन्हेगार होईल रे!’
दत्ताच्या गण्याला म्हणजे गणेश पाटील यांच्या कुटुंबाला गावकीने वाळीत टाकलंय. कारण काय, तर गावातल्या गावठी दारूच्या अवैध धंद्यांची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्याचा गावकीचा संशय आहे. गावकीत परत घेण्यासाठी त्यांना दोन लाख रुपयांचा दंड लावलाय. दंड भरला नाही म्हणून बहिष्कार कायम करण्यात आलाय.
गणेश पाटील यांनी कृष्णा चांदगुडे यांच्याशी संपर्क केलाय. त्यांनी पोलिसात तक्रार करण्यास सांगितलंय.
जात पंचायतीविरोधात आता लोक पुढे येऊ लागले आहेत. तक्रारीही देताहेत. पण सक्षम कायदा नसेल तर या साऱ्याचा काय उपयोग? त्यासाठी ‘अंनिस’चा गृहमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
30 सप्टेंबर 2013
राज्य शासनाच्या गृह विभागाने शेवटी एक परिपत्रक प्रसिद्ध केलंय-
बेकायदा जात पंचायती भरवणं, त्यांचे सामाजिक बहिष्कार, मानहानी, दंडवसुलीसारख्या जुलमी प्रथांविरोधी तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करण्यात यावी
1 ऑक्टोबर 2013
मुंबईतल्या वैदू समाजाच्या जात पंचायतीचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या विलास बढे या वार्ताहरावर हल्ला. विलास हॉस्पिटलमध्ये असल्याचं कळलं. फोन करून त्याच्या तब्बेतीची चौकशी केली. मुका मार आहे खूप. आमच्या जातीला माध्यमं बदनाम करताहेत, हा पंचांचा रोष होता. तो विलासवर निघाला.
3 ऑक्टोबर 2013
जात पंचायतीच्या या हिंसाचारास आळा घालण्याचं निवेदन ‘अंनिस’ने जिल्हाधिकाऱ्यांना दिलं.
12 नोव्हेंबर 2013
कृष्णा चांदगुडे बऱ्याच दिवसांनी भेटले.
त्यांचं घर जवळ असूनही चहा पिण्यासाठी ते मला लांबच्या हॉटेलात घेऊन गेले. सांगत होते, अनेक जात पंचायतींसोबत संवाद सुरू आहे. विशेषत: अनेक ठिकाणी तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. जात पंचायतीतल्या या जुन्या आणि जाचक रूढी बंद करण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी ते पंचांसोबत चर्चा करताहेत..
म्हटलं, चांगलंय.
चांदगुडे म्हणाले, घर जवळ असताना बाहेर चहा घेऊ असं मी का म्हणालो याचं तुम्हाला आश्चर्य वाटलेलं दिसलं. खरं सांगायचं, तर दाभोलकरांच्या खुनानंतर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी थोडं टेन्शनचं वातावरण आहे. मी जात पंचायतींविरोधात काम करतो म्हणून मलाही धमक्या येत आहेत. पोलिस म्हणाले, संरक्षण घ्या; पण मी नाकारलं. पण घरी हे काही माहीत नाही.
30 डिसेंबर 2013
महिन्याभरानंतर चांदगुड्यांचा आज फोन आला. एकदम आनंदात होते.
अहमदनगरमधल्या संगमनेरच्या खांडेश्वर मंदिरात वैदू समाजाच्या महत्त्वाच्या नेत्यांची काल मीटिंग झाली. मुंबई, नाशिक, पुणे, नगर, अहमदनगर, औरंगाबादची प्रमुख मंडळी तिथे जमली होती. जात पंचायत बरखास्त करण्याचा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला. चांदगुडे म्हणाले, महाराष्ट्राच्या सुधारणावादी परंपरेत हा ऐतिहासिक निर्णय ठरेल.
खरंच आहे. ‘अंनिस’ने सातत्याने पंचांसोबत, जातीतल्या तरुणांसोबत संवादाची, सहकार्याची भूमिका घेतली त्याचंच हे फलित म्हणायचं. चांदगुडे बाइटमध्ये म्हणाले, “डॉक्टर दाभोलकर आम्हाला नेहमी सांगायचे, आपला लढा पंचांविरुद्ध नाही, त्यांच्यातल्या शोषक प्रवृत्तींविरोधात आहे...”
1 जानेवारी 2014
सोनई हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झालं.
आज त्याच्या फॉलोअपची बातमी केली.
गेल्या वर्षी नगर जिल्ह्यातल्या नेवाशाजवळ सोनई गावात मेहेतर समाजातल्या तीन तरुणांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. आजही आठवलं तरी अंगावर शहारा येतो. राहुल, सचिन आणि संदीप. गवत चिरायच्या विळ्याने त्यांच्या शरीराची खांडोळी करण्यात आली होती. कारण काय, तर त्यांच्यातल्या एकाचे- राहुलचे गावातल्या मराठा समाजातील मुलीशी प्रेमसंबंध होते. मुलीचे वडील, भाऊ, चुलते सगळ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या तिघांना घरी बोलवून घेऊन त्यांचा खून केला. त्यांच्या शरीराचे तुकडे करून विहिरीत, संडासच्या टाकीत आणि बोअरच्या खड्ड्यात गाडले होते. आरोपी दरंदरे मराठा समाजाचे. गावातलं प्रतिष्ठित कुटुंब ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ पक्षाला जवळचे.
हद्द म्हणजे तब्बल वीस दिवस हा प्रकार नेवासे तालुक्याच्या बाहेर आला नव्हता. आम्हालाही तो उशिराच कळला होता. त्यानंतर लावून धरलं प्रकरण.
मुलीच्या वडलांनी पोलिसात जबानी दिली होती, ‘हो, मी हे कृत्य केलं, आणि ज्यासाठी केलं त्यासाठी मला खंत नाही. मी शिक्षा भोगायला तयार आहे.’
3 जानेवारी 2014
आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने ‘राष्ट्र सेवा दला’ने पुण्यात कार्यक्रम ठेवला होता- सावित्रीच्या लेकी. साने गुरुजी स्मारकात. त्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यभरातील महिलांचे विशेष सत्कार करण्यात आले. त्यांच्या मुलाखतींचं सूत्रसंचालन करण्याचं काम मला देण्यात आलं होतं. कार्यक्रम चांगलाच झाला... एकेकीची काय काय कहाणी ऐकायला मिळाली! मस्तच वाटलं मला.
पण सर्वांत लक्षात राहिली ती दुर्गा गुडिलू...
शिडशिडीत बांधा, काळासावळा वर्ण... अंगात जीन्स आणि लाल कुर्ता.
वय वर्षे 22. चेहऱ्यावर कमालीचा विश्वास आणि आवाजात जबरदस्त दम.
जात पंचायतींची दहशत आणि जाती व्यवस्थेच्या पुढे येणाऱ्या उग्र रूपाला दुर्गेप्रमाणेच ही दुर्गा सामोरी गेली. जोगेश्वरीत राहणाऱ्या दुर्गाने स्वत:चं शिक्षण अर्धवट ठेवून बहिणीला, गोविंदीला शिकवलं, सॉफ्टवेअर इंजिनियर केलं.
वैदू समाजाच्या प्रथेनुसार जात पंचायतीने गोविंदीचं लहानपणीच लग्न लावून दिलं होतं. ज्याच्याशी ते लग्न लावून दिलं तो अवघा सातवीपर्यंत शिकलेला. ते लग्न गोविंदीला मान्य नव्हतं. पण पंचांच्या विरोधात कोण जाणार?
दुर्गा तिच्या पाठीशी उभी राहिली. जात पंचायतीत जाऊन तिने त्यांना सांगितलं, हे लग्न आम्हाला मान्य नाही.... झालं! धमक्या, विरोध... पोलिसांची मदत... ‘अंनिस’ची साथ... दुर्गाने खंबीरपणे संघर्ष केला.
शेवटी पंचांनी पन्नास हजार रुपये दंड केला आणि गोविंदीचं लग्न रद्द केलं.
दुर्गा एवढ्यावरच थांबली नाही. जातीतल्या तरुणांशी तिने संवाद सुरू केलाय.
दुर्गा गुडिलू, स्वामी वैदू हे वैदू समाजातले युवक आता जातीतल्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी झटताहेत...
14 फेब्रुवारी 2014
आज व्हॅलेंटाइन डे. ऑफिसला व्हॅलेंटाइन डे स्पेशल काही तरी बातमी हवी होती.
माझ्या डोक्यातून ‘जात’ काही जात नव्हती. या बातम्यांच्या निमित्ताने राणाची ओळख झाली होती. राणा नाशिक कोर्टात वकिली करतो; पण वकिलापेक्षा तो जास्त कार्यकर्ता आहे. प्रमिलाची केस त्यानेच लढवली, जात पंचायतीच्या विरोधात. बोलता बोलता म्हणाला, जातिअंताच्या लढाईसाठी आंतरजातीय विवाह हा महत्त्वाचा उपक्रम आहे. आज लग्नं होताहेत, पण उपक्रम मागे पडलाय. आम्ही तेच काम करतो... माझी उत्सुकता चाळवली. म्हटलं, म्हणजे काय करता? त्यावर राणाने जे उत्तर दिलं त्यात ‘मला व्हॅलेंटाइन डे’ची बातमी मिळाली.
राणा आणि त्याची पत्नी चित्रा, दोघंही सामाजिक कार्यकर्ते. दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह. दोघांच्याही घरून तीव्र विरोध. तो पार करत त्यांनी लग्न केलं, संसार उभारला.
... आणि ते गुण्यागोविंदानं नांदू लागले ... इथे खरं तर ही साठा उत्तराची कहाणी संपायला हवी; पण राणा आणि चित्राची कहाणी इथून सुरू झाली.
आपल्याला आंतरजातीय प्रेमविवाह करताना ज्या अडचणी आल्या त्या इतर दांपत्यांना येऊ नयेत म्हणून त्यांनी काम सुरू केलं. आतापर्यंत त्यांनी तब्बल वीसेक जोडप्यांची लग्नं लावून दिली. आंतरजातीय पण जातीच्या मुद्द्यावरून घरून विरोध असलेली. त्यांना कायदेशीर मदत करण्यापासून स्वत:च्या घरात काही काळ आसरा देण्यापर्यंत.
त्यातूनच नाशिकमध्ये आता आंतरजातीय विवाह मंडळ सुरू झालंय. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मदत करण्यापासून त्यांना भावनिक आधार देण्यापर्यंत.
राजू देसले वगैरे कार्यकर्ते त्यात उत्साहाने पुढाकार घेतात.
या कारणास्तव माहेर तुटलेल्या मुलींचं माहेरपण करणं, दिवाळीसारखे सणवार त्यांच्यासोबत एकत्र साजरे करणं... अगदी या मुलींची डोहाळजेवणं करणं, बाळंतपण करणं हेसुद्धा!
4 मार्च 2014
चाळीसगावहून आज एक बातमी आली. माजी नगरसेविका अलका गवळी यांनी वीरशैव लिंगायत गवळी समाजाविरोधात पोलिसात धाव घेतलीय. त्यांना जात पंचायतीने बहिष्कृत केलंय. कारण अर्थातच वीस वर्षांपूर्वी केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे वाळीत टाकलेल्या भावाला त्यांनी मुलीच्या लग्नाला बोलावलं म्हणून.
13 मार्च 2014
मढीची यंदाची यात्रा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे.
भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या या मढी यात्रेत देशभरातले भटके-विमुक्त जमतात. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या कानिफनाथाच्या मंदिराची ही यात्रा.
बरेच दिवस ही यात्रा चालते.
सर्व समाजांच्या जात पंचायती इथे भरतात. लग्नं ठरतात, लग्नं मोडतात. जातीचे पंचच साऱ्याचा न्यायनिवाडा करतात.
प्रमिला कुंभारकर हत्येप्रकरणी नाशकातल्या जोशी समाजाच्या पंचांना अटक झाल्यानंतर मढीतल्या पंचायतीबद्दल साशंकता होती. आमच्या जातींना माध्यमं नाहक बदनाम करताहेत, असा पंचांचा माध्यमांवर आक्षेप आहे. मधल्या काळात ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांचा समाजातील प्रतिष्ठितांच्या माध्यमातून पंचांसोबत संवाद सुरू आहे. त्यातून नक्कीच काही तरी वेगळं घडेल अशी आशा लागलीय.
21 मार्च 2014
आज रंगपंचमी. सालबादाप्रमाणे मढीला कानिफनाथाची यात्रा भरली, पण या वेळी ती ऐतिहासिक ठरली.
भटक्या जोशी समाजाने आपली जात पंचायत बरखास्त केली. समाजसुधारणांसाठी काम करणार असल्याचं निवेदन सरकारला दिलं.
गोपाळ, कैकाडी समाजाने यंदा त्यांची पंचायत भरवलीच नाही.
बेचाळीस भटक्या-विमुक्तांच्या जात पंचायतींनी सुधारणांचे ठराव केले.
आज एकीकडे खूप बरं वाटतंय आणि अस्वस्थही...
प्रमिला, आम्हाला माफ कर... आज तुला खरी श्रद्धांजली मिळाली. पण एवढ्याशा बदलासाठी तुझ्या जिवाची आहुती द्यावी लागली...
25 मार्च 2014
आज नवीन प्रकरण पुढे आलं. नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरच्या सुनीताचं.
वैदू समाजाच्या जात पंचायतीने बालपणी लावलेला विवाह सुनीताला मान्य नाहीय.
सुनीताच्या लग्नाच्या कहाणीने तर चक्रावूनच टाकलं.
सुनीता चार वर्षांची असताना पंचांनी तिचं लग्न तिच्यापेक्षा तब्बल चाळीस वर्षांनी मोठ्या असलेल्या तायाशी लावून दिलं होते. हा ताया कोण, तर पंधरा वर्षांपूर्वी गाजलेल्या एका नरबळीच्या केसमधे जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी. तो तरुणपणी तुरुंगात गेल्यावर त्याच्या बायकोचं पंचांनी लग्न लावून दिलं होतं. सुट्टीवर आलेल्या तायाने पंचांकडे बायको मागितली. पंचांची पंचाईत झाली. मग त्यांनी थेट बायकोच्या नात्यातल्या सुनीताचं त्याच्याशी लग्न लावून दिलं.
अर्थात, सुनीताला हे लग्न मान्य नव्हतंच. पण, आई-वडिलांशिवाय पोरक्या सुनीताच्या बाजूने कोण उभं राहणार हा प्रश्न होता. पण अलीकडच्या जात पंचायतीच्या विरोधातल्या बातम्यांमुळे तिला दिलासा मिळाला. मग तिने धाडस करून हे लग्न मान्य नसल्याचं पंचांना कळवलं. मरेन पण तायासोबत राहणार नाही, हा तिचा निश्चय. बायको पाहिजेच, हा तायाचा हट्ट. पंच पेचात. स्वयंघोषित न्यायाधीश पंच चंदरबापू दासरजोगींनी निकाल दिला : किमान एका रात्रीसाठी सुनीताने तायाच्या घरी राहायला जावं, म्हणजे ते तिला फारकतीचा निर्णय देतील.
हे आणखी भलतं. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना हे कळलं. त्यांनी श्रीरामपूरला धाव घेतली. सोबत पोलिस आणि पत्रकार होतेच. आजी-आजोबांसोबत एका खोपटात राहणारी सुनीता जळणाची लाकडं फोडत होती. घरात जाऊन तिने एका कापडी पिशवीतून एक जुनं कात्रण काढलं... 1996च्या ‘पोलिस टाइम्स’च्या अंकाचं ते कात्रण होतं. नरबळी प्रकरणात तायाला जन्मठेप झाल्याची ती बातमी होती आणि शेजारी हातकड्या घातलेला ताया लोखंडेचा फोटो.
सुनीताने पोलिसात तक्रार नोंदवणं हा आतापर्यंतच्या हस्तक्षेपाचा मार्ग होता; पण सुनीता तक्रार नोंदवेना. पोलिस उपाअधीक्षिका सुनीता ठाकरे यांचंही हेच म्हणणं होतं, मुलगी तक्रार देत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकणार नाही.
सुनीताचं गणित वेगळंच होतं. पोलिसात तक्रार दिली तर तिचं लग्न मोडेल, पण जात पंचायतीशी पंगा घेतल्यावर नंतर तिच्याशी कोण लग्न करणार? तिची बदनामी होणार...त्यामुळे जात पंचायतीने आपला निर्णय मागे घ्यावा, ही तिची मागणी होती.
तिच्या दृष्टिकोनातून विचार करता तिची मागणी रास्तच आहे... निकाल पंचांनी दिलाय, तो त्यांनीच बदलून द्यावा.
29 तारखेला वैदू समाजाच्या पंचायतीत सुनीताबाबत निर्णय आहे.
26 मार्च 2014
आज सुनीताची बातमी हेडलाइन झाली.
बालविवाहाविरोधात तरुणीचा लढा, जात पंचायतींच्या निर्णयाला दिलं आव्हान.
27 मार्च 2014
‘अंनिस’चे कार्यकर्ते मढीत तळ टोकून बसलेत.
प्रसारमाध्यमं खरंच माध्यमं बनलीत.
पोलिस, जिल्हाधिकारी- सगळेच यात ओढले गेलेत.
सुनीताने माध्यमांमधून पंचांना आवाहन केलंय... निर्णय मागे घेण्याची विनंती केलीय.
29 मार्च 2014
शेवटी सुनीता जिंकली.
पंचांनी निर्णय मागे घेतला.
सुनीताची सुटका झाली.
30 मार्च 2014
वैदू जात पंचायतीने बालविवाहाला बंदी आणि मुलांना शिक्षणाची सक्ती हे ठराव एकमुखाने मंजूर केले.
31 मार्च 2014
आज गुढीपाडवा.
कृष्णा चांदगुडे भेटले. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान लपत नव्हतं...म्हणाले, या वेळी मढीची यात्रा ऐतिहासिक ठरली..
4 एप्रिल 2014
आचारसंहिता जाहीर झाल्यापासून डायरी लिहिण्यासाठीही वेळ मिळत नाहीय. प्रचाराचा जोर सुरू आहे. बऱ्याच दिवसांनी मागे पडलेली ‘जात’ मला आज पुन्हा आठवली. ऑफिसला एक प्रसिद्धिपत्रक आलं आहे- अमक्या जातीच्या तमक्या उमेदवाराला पाठिंबा आणि जातिसमाजाच्या अमक्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मेळावा...
7 एप्रिल 2014
प्रत्येक रिपोर्टर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या मतदारसंघांची स्थिती लाइव्ह सांगत होता.
मी पण नाशिकचं रिपोर्टिंग करत होते...
नाशिक लोकसभा मतदारसंघात दोन अपवाद वगळता कायम मराठा खासदार राहिला आहे... नाशिक मतदारसंघात सहा लाख मराठा मतं आहेत, दोन लाख माळी, एक लाख दलित, दीड लाख मुस्लिम आणि एक लाख आदिवासी...
रिपोर्टिंग संपल्यावर माझीच मला लाज वाटली... कुठल्या काळात जगतोय आपण? मारे लोकशाही म्हणतो, पण बातम्यांमध्ये जातीच्या गणितांचीच समीकरणं मांडतोय... मग त्या निवडणुकीच्या असोत की आणिक कसल्या...
8 एप्रिल 2014
आज आचारसंहितेचा शेवटचा दिवस होता.
एक मराठा नेता नाशिकमध्ये ठाण मांडून बसलाय.
त्याने भाषण केलं- मराठ्यांनो, एक व्हा!
भुजबळ अस्वस्थ...
14 एप्रिल 2014
काल पुण्यात भटके-विमुक्त जमाती संघटनेची महाजात पंचायत झाली.
बेचाळीस भटक्या विमुक्त जातिजमातींचे प्रमुख त्यात सहभागी झाले होते. कडबू, चितोडिया, गोंधळी, शिकलगार वगैरे...
जातींमधल्या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा सुधारणावादी निर्णय त्यात घेण्यात आला.
रात्री बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही महापंचायत विसर्जित करण्यात आली.
17 एप्रिल 2014
आज शिर्डी मतदारसंघात मतदान झालं.
गेल्या वेळेस या मतदारसंघातून रामदास आठवल्यांना पाडलं होतं... अर्थातच जातीय समीकरणं..
27 एप्रिल 2014
निवडणुकीच्या फडात धामधूम सुरू आहे, पण मुंबईला मात्र एक महत्त्वाचा कार्यक्रम झाला.
वैदू समाजातल्या स्वामीसारख्या तरुणांनी जात पंचायत बरखास्त करून ‘वैदू समाज विकास समिती’ची स्थापना केली. दुर्गाला तिचं अध्यक्ष केलंय.
समाजाच्या विकासासाठी भारतीय संविधानाला अनुरूप कामकाज करणं हे समितीचं ध्येय.
या समितीच्या पहिल्या कार्यक्रमाचे ठरावही करण्यात आले-
1. महिला, तरुणींसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे.
2. मुंबईतल्या वैदूंच्या वस्त्यांच्या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन करणे.
3. गावाकडच्या जमिनी, सातबारा उतारे मिळवून देणे.
जात पंचायतीच्या न्यायनिवाड्यात स्थान नसलेल्या महिलांना यात सहभागी करून घेतलंय. विशेषत: जातीने वाळीत टाकलेल्या महिलांना...
या कार्यक्रमासाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी करंदीकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पत्रकार युवराज मोहिते, ‘अंनिस’च्या मुक्ता दाभोलकर यांची विशेष उपस्थिती होती.
28 एप्रिल 2014
जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपोटी अहमदनगर जिल्ह्यात चौथा बळी गेला.
खर्डा गावातल्या नितीन आगेची हत्या करण्यात आली. दहावीत शिकणारा नितीन दलित आणि वर्गातल्या सवर्ण मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याचा तिच्या नातलगांना राग.
शाळेतून मारत नेऊन नितीनचा गळा आवळून खून करण्यात आल्याची त्याच्या पालकांची तक्रार आहे.. त्याच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलीय. तीनजण फरार आहेत...
1 मे 2014
आज सकाळपासून सगळीकडे महाराष्ट्रदिनाचा उत्सव सुरू होता.
मी खर्ड्याला आलेय. आज नितीनचं प्रगतिपुस्तक आलं घरी. त्याच्या बहिणीने दाखवलं... पण दुर्दैवाने ते पाहण्यासाठी नितीन नाहीय...
लाइव्ह करताना नितीनच्या आईच्या डोळ्यांना धारा लागलेल्या. त्याच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्याची नोंद पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नसल्याचं त्याचे वडील कळकळीने ओरडून सांगत होते.
महाराष्ट्रदिनानिमित्ताने ध्वजारोहणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या पालकमंत्र्यांना नितीनच्या कुटुंबीयांना भेट देण्यास उसंत मिळाली नाही...
जय महाराष्ट्र!
4 मे 2014
पालकमंत्री आज खर्ड्याला आले.
पत्रकारांनी पोस्ट मॉर्टेम रिपोर्टचा प्रश्न विचारला.
पालकमंत्री म्हणाले, त्यांना काय कळतं त्यातलं? अजून रिपोर्ट मिळालेला नाहीय...
8 मे 2014
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज एक मोर्चा आला होता ...
आमच्या समाजाची बदनामी करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि पत्रकारांना अटक करा!
मोर्च्याचे आयोजक होते संभाजी ब्रिगेड, छावा संघटना!
16 मे 2014
शेवटी भुजबळ पडले...
आज मतमोजणी झाली.
भुजबळांचा दारूण पराभव. हीच हेडलाइन.
हेमंत गोडसे आणि प्रदीप पवार या दोघांमध्ये मराठा समाजाच्या मतांची विभागणी होईल हा अंदाज चुकला. भुजबळांना पाडण्यासाठी मराठा तितुका एक झाला आणि मोदीलाटेवर स्वार होत जातीच्या राजकारणाची नाव पार झाली.
15 जून 2014
सोलापूरची बातमी वाचली. भूषणनगरमधील लिमयेवाडीतील मंगलसिंग रजपूत आणि मनीषा माचारेचा साखरपुडा होऊन तोष्णीवाल फार्म हाऊसमध्ये हिंदू पद्धतीने लग्न पंचांच्या साक्षीने झालेलं. नंतर त्याच पंचांनी मंगलसिंग राजपुतांना वाळीत टाकलंय.. का, तर हिंदू पद्धतीने सात फेरे का घातले म्हणून!
यावर काय बोलणार? संताप नुसता...
17 जून 2014
सोलापूरच्या नेट एडिशनमध्ये एका बातमीचा फॉलोअप आहे-
डोंबारी समाजाच्या पाच पंचांविरोधात गुन्हा दाखल.
जात पंचायतीविरुद्ध मेळावा घेतला म्हणून दीपक जावळे, विजय जावळे यांना टाकलं होतं वाळीत.
हे बरंय. आतापर्यंत वाळीत टाकण्यासाठी पंचांना कारण होतं, जातीबाहेर लग्न केलं. आता आणखी एक कारण मिळालंय... पंचांविरोधात बोलताहेत...
20 जून 2014
जळगावच्या प्रतिनिधीचा फोन आला. वाकोद गावातली घटना आहे. बळकावलेलं घर परत मागितलं म्हणून जात पंचायतीने मन्साराम जोशींना बहिष्कृत केलंय. जोशींची जागा रस्त्यालगतच आहे. अशोक भिसे यांनी ती बळकावलीय. जोशींनी भिसे यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उचलला. पहूर पोलिसात धाव घेतली. पोलिस तक्रार घेत नाहीयत. त्यांनी थेट जातीच्या पंचांशीच संगनमत केलंय. मन्सारामला वाळीत टाकलंय. पोलिसांवर दबाव आहे, तुम्ही मध्ये पडू नका. हा जात पंचायतीचा विषय आहे.
भयंकर म्हणजे मन्साराम यांच्या पत्नीला मारहाण झाली. त्यात तिचा गर्भपात झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत...
अजून किती रक्त सांडणार आहे कोण जाणे!
22 जून 2014
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची बैठक झाली.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या एका एकोणीस वर्षीय युवतीने महिला आयोगापुढे आपली कैफियत मांडलीय. जात पंचायतींमध्ये सुरू असलेल्या इमानपाणी या अघोरी प्रथेबद्दल ज्या महिलांच्या चारित्र्यावर संशय असेल त्यांनी उकळत्या तेलातून नाणी काढायची.. अशी ही इमानपाणी परीक्षा...
महिला आयोगाच्या सदस्याही पहिल्यांदा गारच झाल्या हे सारं ऐकून. असलं काही खपवून घेतलं जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी तिला दिलंय
27 जून 2014
नगरमधले प्राध्यापक विठ्ठल बुलबुले आजच्या बातमीचे हीरो होते.
सेवादलाचे कार्यकर्ते असलेल्या बुलबुले यांना गेलं वर्षभर एकाच ध्यासाने पछाडलं होतं, त्यांच्या पद्मशाली समाजातील जात पंचायतीच्या असंविधानिक कामकाजाबद्दल. पंचांनी आकारलेला दंड भरला की या समाजात बाँडपेपरवर लिहून घटस्फोट होत होते. प्रा. बुलबुले यांनी या प्रथांच्या बेकायदेशीरपणाबद्दल पंचांशी चर्चा सुरू केलीय. पंचकमिटीच्या काही निर्णयांना आणि निर्णय घेण्याच्या पद्धतींना त्यांनी आव्हान दिलंय. पद्मशाली समाज जात पंचायत बरखास्त करून सलोखा समितीत तिचं रूपांतर करण्याची मागणी त्यांनी पंच समितीपुढे केलीय. ते पंचांना भेटताहेत, समजावून सांगताहेत... काहींचा विरोध होतोय, तर काही ज्येष्ठ पंचांना त्यांचं म्हणणं पटतंही आहे...
त्यांना आशा आहे, लवकरच त्यांच्या प्रयत्नांना यश येईल...
29 जून 2014
प्रमिलाच्या हत्येला आज एक वर्ष झालं. वर्षभरानंतरच्या पाठपुराव्याची बातमी केली आज. वर्षभरात केवढा टप्पा पार केला! बोलताना कृष्णा चांदगुडे यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या...
बातम्यांच्या गडबडीत वाचायची राहून गेलेली साप्ताहिकं चाळत होते. शेवटच्या पानावरच्या एका जाहिरातीवर नजर खिळून राहिलीय.
वधूवर सूचक मंडळाच्या जाहिरातीमध्ये एक छापील वाक्य आहे-
‘... उच्च आंतरजातीय चालेल... एसटी/एससी क्षमस्व...’
-दीप्ती राऊत
मोबाइल : 97634443998

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा