घाणीसोबतचं जिणं - संपत मोरे

महेंद्र. उत्तर भारतातून पुण्यात आलेला एक उमदा तरुण. दहावी शिकलेल्या महेंद्रला कारकून व्हायचं होतं, पण काही केल्या नोकरी मिळेना. त्याचे नातेवाईक पुण्यात सफाई कामगार म्हणून काम करत होते. रोजगाराचे सगळे मार्ग बंद झाल्यावर महेंद्र नाइलाजाने नातेवाइकांसोबत सफाई कामगार म्हणून काम करू लागला.
तुंबलेलं ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी आत उतरणं हे त्याच्यासाठी नरकयातना भोगण्यासारखं होतं. तो पहिल्यांदा ड्रेनेजमध्ये उतरला तेव्हा यातून आपण पुन्हा वर येऊन जगू शकू असं त्याला वाटलंच नव्हतं, इतका तो अनुभव भयानक होता.
सुरुवातीला काम करून आल्यावर चार-चार वेळा अंघोळ केली तरी अंगाचा वास जायचा नाही. जेवण समोर आलं की उलट्या व्हायच्या. महिनाभर रोज असंच सुरू होतं. स्वप्नंसुद्धा गटारीची-घाणीची पडायची. आयुष्यात कधीही न घेतलेले वास घेऊन मळमळ व्हायची. पोट ढवळायचं. पण नातेवाईक त्याला समजवत राहायचे, “पहिल्यांदा आमचंही असंच झालं होतं. होईल सवय हळूहळू.”
तशी महेंद्रलाही सवय झालीच. चांगल्या आयुष्याच्या स्वप्नांची होळी झालेली बघत तो ड्रेनेज कामगार बनला; पण तो सल मात्र अजूनही त्याच्या मनातून गेलेला नाही. उलट, असे काही प्रसंग येतात की ती सल आणखी तीव्र बनत जाते.
महेंद्र ज्या परिसरात राहतो तिथल्या एका कॉलेजमध्ये एकदा घूस मेली. तिचा सडका वास कॉलेजभर भरून राहिला. कॉलेजच्या शिपायाने हात वर केले. ‘असलं घाण काम मी करणार नाही’, असं त्याचं म्हणणं. मग प्राचार्यांनी डोकं चालवलं. कॉलेजच्या शेजारी राहणाऱ्या महेंद्रला बोलवायला माणूस पाठवला. काही तरी काम असेल म्हणून तो गेला, तर प्राचार्यांनी त्याच्यावर घूस उचलण्याची कामगिरी सोपवली. तेव्हा महेंद्रला मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्याने स्वाभिमानाने नकार दिला. तो म्हणाला, “मी का काढू ती घाण?”
“अरे, तू नाही काढणार तर कोण काढणार? शिपायाने नाही म्हटलं म्हणून तुला बोलावलं.”
जे घाण काम करण्यास शिपायाने नकार दिला होता ते काम ‘घाणीतलं काम’ करणाऱ्या महेंद्रला सांगितलं गेलं. व्यवस्थेला महेंद्रची ‘योग्य’ वेळी आठवण झाली होती. समाजाने ती सडलेली घूस आणि महेंद्र यांचा परस्पर संबंध लावला होता. या घटनेबद्दल सांगताना महेंद्रचा आवाज आजही गहिवरतो.
“आजही ड्रेनेजमध्ये आत उतरल्यावर पुन्हा घरी जाईन की नाही असं वाटतं. पूर्वी गावाकडे असताना मलमूत्र, सांडपाणी नुसतं बघितलं तरी नाकावर हात ठेवायचो. आता त्याच घाणीत तोंड घालण्याची वेळ आली आहे. पण काय करणार? कुणाला सांगणार?”
***
महेंद्रसारखी असंख्य माणसं आज भारताच्या कानाकोपऱ्यात आपण साऱ्यांनी करून ठेवलेली घाण उचलताहेत. भारत जो काही अस्वच्छ आहे तो आपल्यामुळे आणि जेवढा केवढा स्वच्छ आहे तो या सफाई कामगारांमुळे; पण याचं भान आपल्याला आहे का?
कचरा काढणाऱ्या, शहरं स्वच्छ ठेवणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं. खरं तर कचरा आणि घाण तयार होते ती आपल्याच घरात. एखाद्या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या श्रीमंत माणसापासून चहा टपरीवाल्यापर्यंत सगळे लोक कचरा उत्पादक आहेत. आपण आपल्या घरातून घाण बाहेर टाकतो आणि घर स्वच्छ झाल्याचा आनंद मानतो. अगदी आपणच केलेला कचरा कचऱ्याच्या गाडीपर्यंत नेणंही आपल्याला अवघड वाटतं. मग दुसऱ्याचा कचरा अंगावर घेणाऱ्या या कामगारांचं काय होत असेल?
घरातून बाहेर पडलेल्या या कचऱ्याचा पुढचा प्रवास कसा होतो? कचरा एका जागेवरून आपोआप हलत नाही. त्यासाठी शेकडो लोक आत्मसन्मान विसरून काबाडकष्ट करत असतात. ते कचऱ्यातच काम करतात दिवसभर. त्यांच्या आयुष्यात डोकावून बघण्याची सवड आहे आपल्याला?
त्यासाठी पुणं हे एक प्रातिनिधक शहर. 50 लाख लोकांचं हे शहर साफ करण्यासाठी किती कामगार राबतात, तर 14 हजार! इथल्या सफाई कामगारांच्या सोबत झालेल्या संवादातून असं लक्षात येतं, की एकेक कामगाराच्या तीन-तीन पिढ्या याच कामात आहेत. या कामगारांपैकी जवळपास 90 टक्के लोक आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सर्वांत मागासलेल्या समाजातले आहेत. गावाकडे हे घाणीतलं काम करावं लागत होतं म्हणून अनेकांनी गावं सोडली आणि शहराचा रस्ता धरला होता, पण हे काम सुटलं नाही. शहराने त्यांना सामावून घेतलं, पण त्यांच्या हाती झाडू देऊनच. जात, दारिद्य्र आणि दुष्काळ या दुष्टचक्रामुळे सफाई कामगार या कामात अडकून पडले आहेत. जसा राजकारणात, संगीतात वारसा असतो तसाच इथेही वारसा आहे. फक्त तो अभिमानाने सांगता येणारा नाही.
सतत कचऱ्यातच काम केल्यामुळे या कामगारांना अनेक आजार चिकटतात. अनेक कामगार आज टीबीची शिकार झालेले दिसतात. दम्याची देणगीही सार्वत्रिक आहे. निवृत्त झालेले कामगार जास्त दिवस जगत नाहीत. शिवाय पाठीचे-मानेचे आजार, त्वचारोग, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने येणारी सततची आजारपणं, घाण सहन करण्यासाठी व्यसनांशी झालेली अगतिक जवळीक, अशी प्रचंड गुंतागुंत घेऊन हे कामगार जगताहेत.
पण या सगळ्याहूनही त्रासदायक असते ती समाजाची तुच्छ व उपेक्षित नजर.
***

पुण्यातला कोथरूडमधला एक रस्ता. सकाळी दहाची वेळ. काही बाया रस्त्यावरचा कचरा गोळा करत होत्या. पाठीमागून साहेबाची आरोळी आली तसे बायांचे हात आणखी वेगाने चालू लागले. असेल तो कचरा गोळा करून हाताने गाडीत टाकायचं काम सुरू होतं. मी त्या बायकांशी बोलण्याचा प्रयत्न केला.
“कसला कसला कचरा असतो?”
“आवंऽ, कसला बी आसतुया. कसं सांगू तुम्हास्नी? काय कळत न्हाय माणसास्नी. कचरापेटीपतुरसुद्धा जायची तसदी घेत न्हायती. देत्याती फेकून. आव ज्येला हात लावायला न्हाय पायजे तेसुद्धा उचलावं लागतं. लय घाण!”
तेवढ्यात आणखी एक बाई येऊन बोलण्यात सामील झाल्या. या बाई बार्शीकडच्या होत्या. गावात करावं लागणारं घाणीचं काम सुटावं म्हणून त्यांचे आजोबा पुण्याला आले; पण जात बघून पुण्याने त्यांना तेच काम स्वीकारायला भाग पाडलं. बाईंचा बापही झाडूखात्यातच होता. लग्न झालं, तर तिथेही हेच काम होतं. त्यामुळे आला हातात झाडू.
“आम्ही घाण काढतुया म्हणून हे घाण करत्यात. जरा कळाय पायजे. शिकली-सवरलेली माणसं हायती. आमी अडाणी हाय. आम्हास्नी कळतंय ते ह्यांना कळू नये? पण आमचं कोण ऐकतंय? बोललं तर म्हणतात, एवढा त्रास होतो तर करू नका हे काम. पण पोटासाठी करावं लागतंया. काय करणार?”
बाईंच्या तोंडातलं ‘एवढा त्रास होतो तर करू नका हे काम’ हे वाक्य ऐकलं आणि लोकांच्या दारिद्य्रावर मीठ चोळत ‘ब्रेड नसेल तर केक खा’ म्हणणाऱ्या फ्रान्सच्या का कुठल्या राणीची आठवण झाली.
***

पुण्यातलाच आणखी एक रस्ता. सफाईकाम करणाऱ्या बायकांची मुकादमासोबत वादावादी सुरू होती.
“आमचा पगार कवा काढणार?” छायाताई विचारत होत्या. या उपलाई माठा गावच्या. कामाच्या शोधात त्यांचे वडील पुण्यात आले होते. त्या कंत्राटी कामगार आहेत. रोज 258 रुपये पगार, पण महिन्यातले 20 दिवसच काम मिळतं. इतर दिवशी नाही. पगारसुद्धा वेळेत मिळत नाही. कंत्राटी असल्यामुळे महापालिकेकडून मिळणाऱ्या इतर सोयी मिळत नाहीत. त्यांच्याशी बोलू लागल्यावर बऱ्याच बायकांचे आवाज कानावर पडू लागले.
“आम्हाला पगार लय कमी. फंड सर्व्हिस नाही. दवाखाना सवलत नाही. सफाई करताना लागणारी साधनं नाहीत. रोजंदारीवर काम केल्यागत हाय हे.”
“गाडीखर्चालाच महिन्याला 1500 रुपये जातात.”
“परवडत नाही पण पोटासाठी करायचं काय तरी.”
“पोरगं शिकतंय. त्येचं नको वाटुळं व्हायला. आमचं झालं.”
“पगार वाढायसाठी काय तरी करा.”
“आमीबी माणसं हाय म्हणावं त्यास्नी!”
“नवरा दारूडा आहे. पोरं हायती दोन. कसं जगवू? आले झाडूखात्यात.”
“कंत्राटी कामगाराकडं ध्यान न्हाय कुणाचं.”
सगळ्यांच्या व्यथा सारख्याच होत्या. त्या बाया सकाळी साडेसहाला आल्या होत्या. घामेजल्या होत्या. कोणी तरी ऐकतंय म्हणून सांगत होत्या. सांगण्यात ‘काही तरी करा’ अशी विनवणी होती. मी काय करू शकणार होतो? निघालो.
***

वैजनाथ हे दलित समाजातले पदवीधर तरुण. 20 वर्षांपूर्वी दुष्काळाला कंटाळून नोकरीच्या शोधात पुण्याला आले. शिकलोय म्हटल्यावर नोकरी मिळेल अशी आशा होती. प्राध्यापक व्हायचं स्वप्नं होतं त्यांचं. पुण्यात आले. वणवण फिरले. पदवीचे कागद घेऊन ऑफिसांमध्ये गेले; पण व्यवस्थेने त्यांना सामावून घेतलं नाही. अखेर सासूच्या कृपेने त्यांना नोकरी मिळाली ती सफाई कामगाराची. पदवीचं भेंडोळं खुंटीला अडकवून त्यांनी हातात झाडू घेतला. ‘शिक्षण फुकट गेलं आपलं’ म्हणत ते रस्त्यावरची घाण उचलू लागले. दुष्काळ आणि कडवट जातीय जाच याला कंटाळून गावं सोडून कचऱ्यात कामाला आलेले त्यांच्यासारखे असंख्य समदुःखी त्यांना भेटले. आता वैजनाथभाऊ मुकादम बनले आहेत, पण कामगाराचं जगणं ते विसरलेले नाहीत. त्यांचं मन अजूनही बंडखोरच आहे.
“झाडूखात्यात आमचीच माणसं का?” त्यांचा थेट सवाल.
“झाडूवाल्याचा पोरगा झाडूवालाच झाला पाहिजे अशी व्यवस्था केली आहे. पण माझा मुलगा नाही होणार झाडूवाला. त्याला शिकवतोय मी.”
तो धागा पकडत मी विचारलं “सफाई कामगारांचं शिक्षण किती असतं?” मी विचारलं.
“अहो, दुसरीपासून एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलेले सफाई कामगार आहेत आपल्याकडे.”
“बाप सफाई कामगार असेल तर घाणभत्ता म्हणून त्यांच्या मुलाला नोकरीवर घेतलं जातं. उलट, सफाई कामगाराचा मुलगा शिकलेला असेल तरीही त्याला चांगली नोकरी मिळत नाही. त्याला बापासारखं सफाई कामगारच व्हावं लागतं. वारसाहक्काने मिळणाऱ्या नोकरीच्या आमिषाने शिकलेली मुलंही शिक्षण विसरून सफाई कामगार होतात आणि घाणीत जातात.” वैजनाथभाऊ पोटतिडकीने सांगत होते.
ज्या हातांना खडू घेऊन शिक्षक बनण्याची आस होती त्या हातांना मानवी विष्ठा आणि सडकी कुत्री उचलावी लागली, लोकांची घाण काढावी लागली. त्याचा विषाद त्यांच्या बोलण्यात जाणवत होता.
त्यांच्या बोलण्यातून आणखीही दोन मुद्दे लक्षात आले. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळतो, पण काम असतं ते दुसऱ्याची घाण उचलण्याचंच. ते अपमानास्पद तर आहेच, पण माणसातला सगळा जीवनरस शोषून घेणारं आहे. हे काम फक्त काहीच जातींतल्या लोकांनी का करावं? पांढरपेशा मध्यमवर्गीय समाजाला कधीही न पडणारा हा प्रश्न आज वैजनाथभाऊंसारख्या अनेकांचं आयुष्य व्यापून आहे.
दुसरा प्रकार आहे कंत्राटी कामगारांचा. यांची परिस्थिती आणखी वाईट आहे. काम भरपूर, पैसे कमी आणि नोकरीची शाश्वती काहीच नाही. अनेकदा पालिकेचे कामगार आपलं काम करण्यासाठी दुसरे मजूर नेमतात. त्यामुळे सगळ्यात घाण काम करावं लागतं ते या मजुरांना.
***

सकाळपासून वैजनाथभाऊंबरोबर फिरत होतो. कंत्राटी सफाई कामगारांशी बोलल्यावर त्यांनी मनपाच्या सफाई कामगारांकडे आणलं. वैजनाथ यांच्याभोवती सफाई कामगार गोळा झाले. कसली माहिती विचारतायत याची सर्वांना उत्सुकता होती.
विषय सांगितल्यावर दत्ताभाऊ सांगू लागले, “आम्हाला हे काम करावंसं वाटत नाही. पण एकदा पदरी पडल्यावर मात्र आम्ही ते मनापासून करतुया. पण हे काम करण्याचं ढोंगबी काहीजण करायला लागल्याती, पेपरमधी फोटू यावा म्हणून. आन् एका मिनिटासाठी हे झाडूवालं हुत्याती. ह्यांचं लय कौतुक! आन् आम्ही रात-दिवस झाडतुया, पण आमचं कुणालाच न्हाय कौतुक.” दत्ता बोलत असताना वरून एक हेलिकॉप्टर घिरट्या घालत गेलं. दत्ताभाऊ वर बघत म्हणाले, “थांब थांब, आलोच एवढी मुलाकत दिऊन!” त्यांच्या या वाक्याने हशा उसळला. दत्ताभाऊ विनोदबुद्धीसाठी प्रसिद्ध आहेत. या घाणीत जगायचं असेल तर विनोदबुद्धी ऑक्सिजनइतकीच आवश्यक असणार.
दत्ताभाऊ पुढं सांगत होते, “आवं, आमची हालत लय बेकार हाय. दोन-दोन म्हैनं तोंडाला बांधायला मास्क मिळत न्हायती. चपला मिळत न्हायत्या. मिळाल्या तरी त्या चांगल्या नसत्यात. लगेच खराब होत्यात. मग आलंच पुन्ना उघड्या हातांनी घाणीत हात घालणं. माझी बायकोबी सफाई कामगार हाय. आजी आणि आई दोघीबी झाडूखात्यात होत्या. त्यांच्या जाग्यावर मी लागलो- वारसाहक्काने. पण पोरांनी मात्र धंदा बदलला आहे. ती रिक्षा चालवतात. आमचं आयुष्य धुरळ्यातच गेलं. त्यांचं जाता कामा न्हाई.”
***

पळदेव टाकळी गाव उजनी धरणात गेलं. माणसं विस्थापित झाली. जगण्यासाठी दाही दिशेला गेली. काही पुण्याला आली. कमलाबाई त्यातल्याच. त्या गेली तेरा वर्षं सफाईकाम करतात. नवरा पिठाच्या चक्कीत कामाला. आधी त्या कंत्राटी कामगार होत्या, मग नोकरी कायम झाली. त्यांनी मुलाला शिकवलं. मुलगा या धंद्यात आला नाही. तो समारंभात फेटे बांधण्याचं काम करतो. कायमस्वरूपी नोकरी असली तरी कित्येक वर्षांच्या सफाईकामामुळे कमलबाईंचं शरीर आजारांनी पोखरून गेलेलं आहे. त्या सांगतात, “गेल्या पाच वर्षांपासून श्वास घ्यायलाही त्रास होतो. जीव कोंडल्यागत होतो. सारखी धाप लागते. पायांत गोळे येतात. ताप तर जनू काही कायमचाच अंगात बसलेला असतो.” औषधं घेत नाही का, असं विचारल्यावर त्या म्हणतात. “मोप पैसा खर्च केला औषधांवर, पण कायमचा उतार पडत नाही. डॉक्टर म्हणतात, हे काम सोडा. ते सोडलं तर खाणार काय? त्यापेक्षा आजार सहन केलेले बरे.”
कमलबाईंची कथा प्रातिनिधिक आहे. कायमस्वरूपी नोकरी असली तरी या कामामुळे होणाऱ्या शारीरिक आजारामुळे कामगारांचे खर्चही वाढतात.
मंगलबाई कोकणातल्या. नवरा पालिकेत होता. तो अकाली गेला. मग त्याच्या जागेवर यांना नोकरी मिळाली. झाडू खात्यातच. “घाण साफ करण्याचं काम कुणाला आवडणार? त्याचा त्रासही खूप होतो. पण कायम आहे म्हणून करायचं. स्वप्नातही वाटलं नव्हतं हे काम करावं लागेल. पण अकाली वैधव्य आलं. संसार कसा चालवणार? मुलांच्या भविष्यासाठीच कचरा उचलते आहे.”
***

छोटे-मोठे अपघात सफाई कामगारांच्या पाचवीला पुजलेले असतात.
गुलटेकडीच्या आसपास राहणाऱ्या एका सफाई कामगाराला काम करताना पायाला काच लागली, पण खाडा व्हायला नको म्हणून तो तसाच काम करत राहिला. ना औषधं घेतली गेली ना विश्रांती. जखम झालेला पाय सतत कचऱ्यात राहिल्याने पायाला सेप्टिक झालं. पाय सुजला. चालवेना तेव्हा तो डॉक्टरांकडे गेला. तोपर्यंत वेळ गेलेली होती. पाय कापावा लागला. एक कुटुंब आयुष्यातून उठलं.
लीलावतीबाईंना झाडू मारत असताना मागून आलेल्या गाडीने धडक दिली. चार महिने त्या अंथरुणावर होत्या. उपचारांवर 70 हजार रुपये खर्च झाले, पण पालिकेकडून काही मदत मिळाली नाही. अजून तब्येत पुरती बरी नसतानाही त्यांना नाइलाजाने कामावर यावं लागलं आहे. अशी किती तरी उदाहरणं.
***

बारामतीजवळच्या वडगावमधला एक तरुण, माणिक. वडिलांचा केरसुणीचा धंदा. परंपरागत व्यवसाय जवळजवळ बंद पडलेले. गावात संधी नाही म्हणून पुण्यात आला. ड्रायव्हिंग शिकला. पीएमपीत नोकरी मिळाली; पण त्याला कचरागाडी चालवायला पाठवलं. कचऱ्याचा वास काही केल्या सहन होत नाही, पण दुसरा उपाय नसल्यामुळे तो हे काम करतो आहे.
“कचरागाडीवरबी पूर्ण म्हैना काम देत न्हायती. 15-20 दिवस काम मिळतं. काय करायचं आम्ही? बायको-पोरं कशी जगवायची? गावाकडे सांगतो बस चालवतो म्हणून. कचरा तर कचरा, पण ते तर काम पुरं दिलं पायजेल ना. 10 दिवस बसून काढाय लागल्याती. द्या बातमी म्हणावं. कचरागाडीच्या ड्रायव्हरची अवस्था लय बेकार हाय. मनाइरुध काम करतुया ते तरी पोट भरायएवढं द्याला पायजे.”
बस चालवण्याचं स्वप्न घेऊन पुण्याला आलेल्या या तरुणाला कचऱ्याची गाडी चालवण्यात कमीपणा वाटत असेल तर वर्षानुवर्षं कचऱ्यात हात घालणाऱ्या सफाई कामगारांची मन:स्थिती कशी असेल? आपण गाडीवरून जात असतो तेव्हा समोर कचऱ्याची गाडी आली की आपण तिला ओव्हरटेक करतो किंवा आपला वेग कमी करून तिला पुढे जाऊ देतो. त्या वेळी जी माणसं कचऱ्यावर बसलेली असतात त्यांचा विचार तरी आपल्या मनात येतो का?
***

हिंगणे होम कॉलनी. या वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर सफाई कामगारही राहतात. त्यांना भेटण्यासाठी वस्तीत जाऊन पोहोचलो. तिथल्या कामगारांनी खूप तक्रारी ऐकवल्या. या कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून मास्क, हँडग्लोव्ह्ज, गणवेश, गमबूट, चपला, थंडीत घालण्यासाठी जर्सी, घरी गेल्यावर हात धुण्यासाठी साबण असं सगळं मिळणं अपेक्षित असतं; पण यातली कोणतीच गोष्ट वेळेत मिळत नाही. सतत मागणी करत राहावं लागतं. ज्या वस्तू मिळतात त्याही निकृष्ट असतात. लगेचच खराब होऊन जातात. या साधनाविना काम करणाऱ्या कामगारांना रोगाची शिकार व्हावं लागतं.
***

उमरग्याजवळच्या एका खेड्यातून आलेले परशुराम कचरागाडीवर काम करतात. कचऱ्याचं वर्गीकरण करणं आणि गाडीबरोबर कचऱ्यावर बसूनच डेपोत जाणं हे त्यांचं काम. दोन वर्षांपासून त्यांच्या हातापायाला लालसर पुटकुळ्या आल्या आहेत. हे कशामुळे झालं ते त्यांनाही माहिती नाही.
“कचऱ्यात नाना प्रकारची सडलेली घाण असते. कशाला तरी हात लागला असेल. पहिल्यांदा अंगाची आग आग झाली. नंतर अशा पुटकुळ्या उठल्या. औषधं घेतली की तेवढ्यापुरतं बरं वाटतं. पुन्हा कचऱ्यात हात घातला की तोच त्रास सुरू होतो. लोकांना माझे हात बघूनही घाण वाटते ही गोष्ट मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून समजते.” हे सांगताना त्यांचा चेहरा पिळवटून निघतो.
***

पुन्हा एकदा ड्रेनेजमध्ये उतरलेल्या एका कामगाराला भेटायला गेलो. ड्रेनेजमधून बाहेर आलेली ती माणसं नुसती पाहिली तरी अंगावर काटा आला. उलट्या होतील की काय, असं वाटू लागलं. सगळी घाण नाका-तोंडात-कानात जाईल याची पर्वा न करता हे कामगार सांडपाण्यात कसे काय उतरत असतील?
“तीन तीन वेळा अंघोळ केली तरी अंगाचा वास जात नाही आमच्या. नाकात एक वेगळाच वास तयार होतो. तो बारा महिने अठरा काळ सोबत असतो. वास जाण्यासाठी सेंट नव्हे सेंटचा बाप लावा, वास जाणार नाही. मरेपर्यंत नाकात बसलेला वास जात नाही.”
एका कामगाराला विचारलं,
“कचऱ्यात काय असतं?”
“आवं, काय नसतं असं इचारा! जे घाण ते सगळं असतंय. घाण उचलायला आमी हाय म्हटल्यावर घाण करणार की माणसं. ते तर सोडाच. पण कवा तरी तान्ही मुलंसुद्धा बघितल्यात कचऱ्यात.”
कचरा निर्माण करणाऱ्या लोकांनी आपण कोणता कचरा करतो याचा विचार केला तर त्यांना कचरावेचकाचं जगणं समजेल. त्यांना कोणतं काम करावं लागतं हे लक्षात येईल.
सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवतात. मग ते राहतात कुठं? कसे? खातात काय? असे प्रश्नश्न मला पडले. म्हणून मी जिकडे-तिकडे फिरलो. पुण्यातील सफाई कामगारांच्या वस्त्या पाहिल्या. पांडवनगर, वाकडेवाडी, गंजपेठ, शास्त्रीनगर, बिबवेवाडी, ओटा वसाहत, आंबील ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठेचा काही भाग, मंगळवार पेठ या भागांत सफाई कामगारांच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांतून फिरताना बकालता जाणवते. शहर स्वच्छ ठेवण्याची कामगिरी चोख ठेवणाऱ्या या माणसांच्या वस्त्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे. नागरी सुविधांचा अभाव आहे. उघडी गटारं, घरालगत माशांचे थवे, कुबट वास, छोटी पत्र्याची घरं... एका खोलीत सात-आठ माणसं दाटीवाटीने राहतात. घरात ठळक दिसणारं दारिद्य्र, पण तरीही घरात मात्र स्वच्छता ठेवलेली.
वस्तीमधून फिरताना सफाईकाम करणाऱ्या माणसांच्या दरिद्री जीवनाची कल्पना येते. शहरं स्वच्छ ठेवणारी ही मंडळी उपेक्षेच्या अंधारात चाचपडताना दिसतात. प्रकाशाचा कवडसा नाही पोहोचत त्यांच्या आयुष्यात. गरिबी, रोगराई, अवहेलना, काबाडकष्ट यांचीच सोबत असते त्यांना. न संपणारा प्रवास. जसा कचऱ्याचा प्रवास सुरू असतो तसाच.
-संपत मोरे
9011296901
sampatmore83@yahoo.in

चौकट
या लेखासाठी वापरलेले फोटो ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी मुंबईत काढलेले आहेत. ते या लेखातील कामगारांचे नाहीत. सफाई कर्मचाऱ्यांचं जिणं समाजासमोर आणण्यासाठी ओलवे यांनी काढलेल्या या फोटोंचं ‘इन सर्च ऑफ डिग्निटी अँड जस्टिस- न्यायाच्या व सन्मानाच्या शोधात’ हे पुस्तक लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालं आहे. सफाई कामगारांचं विदारक वास्तव केवळ फोटोंमधून बाहेर आणणारं हे पुस्तक मुळातून पाहण्यासारखं आहे. या पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे.
सुधारक ओलवे यांचा ई-मेल आयडी - sudharak@gmail.com

(संपत मोरे हे ‘युनिक फीचर्स’चे फिरते वार्ताहर आहेत. तळागाळातले विषय शोधून काढण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरत असतात.)

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा