... अन्यथा ‘स्वच्छ भारत’ अशक्य - आनंद तेलतुंबडे

स्वच्छ भारत अभियानाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. विविध क्षेत्रांतील सेलेब्रिटीज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (आदेशवजा) आवाहनाला प्रतिसाद देत हातात झाडू घेतलेले फोटो उत्साहात सोशल मिडीयावर शेअर करत आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि नागरी हक्क चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्या मते ही सर्व नौटंकी असून देशातून जातीव्यवस्थेचे निर्मूलन झाल्याशिवाय भारत स्वच्छ होणार नाही.
अस्वच्छता आणि जातिव्यवस्थेचा छुपा संबंध स्पष्ट करत 'स्वच्छ भारत अभियाना'च्या हेतूंची झाडाझडती घेणारा परखड लेख.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांची नाटकं थांबता थांबायला तयार नाहीत; पण गेल्या सहा महिन्यांत अशी अनेक नाटकं करूनही निवडणुकीपूर्वी आश्वासन दिल्यानुसार ‘अच्छे दिन’ आणण्यात मात्र त्यांना फारसं यश मिळालेलं नाही. शिक्षकदिनाची सुटी रद्द करून त्यांनी मुलांना स्वतःचं भाषण ऐकवण्यासाठी शाळेत यायला भाग पाडलं. आता पुन्हा गांधी जयंतीलाही राष्ट्रीय सुटी रद्द करून त्यांनी लोकांना हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाला जुंपलं आहे.
खरं तर नरेंद्र मोदी यांच्या आतापर्यंतच्या जवळपास साऱ्या उपक्रमांनी कमी-जास्त प्रमाणात वाद ओढवून घेतले होते, पण सर्वाधिक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह असणारं ‘स्वच्छ भारत अभियान’ मात्र कोणत्याही वादविवादांशिवाय सुरळीत सुरू असलेलं दिसत आहे. कदाचित मोदींनी गांधींची कास धरल्यामुळे असं झालं असावं. कदाचित या अभियानावर होणार्या टीकेचा अंदाज घेऊन तो आवाज दाबून टाकण्याचा मोदींचा प्रयत्न यशस्वी झाला असावा. कदाचित ‘महान राष्ट्र’ म्हणून भारताची प्रतिमा घडवण्यासाठी त्यांनी आरंभलेल्या या अभियानाबद्दल कुणाचंही दुमत नसावं.
पण माझ्या मते स्वच्छ भारत अभियानाबद्दल सर्वसामान्य लोकांमधून काहीही टीका झाली नाही याचं खरं कारण समाज म्हणून असणाऱ्या आपल्या सामूहिक अज्ञानात आहे. अस्वच्छतेच्या प्रश्नाचं मूळ हे आपल्या जातिव्यवस्थेत असून या जातिव्यवस्थेचं निर्मूलन झाल्याशिवाय आपल्या देशातला स्वच्छतेचा प्रश्न निकाली निघणं शक्य नाही, याचं यत्किंचितही भान आपल्याला नाही.

अस्वच्छतेची कारणमीमांसा

भारत हा जगातला अतिशय अस्वच्छ, घाणेरडा देश म्हणून कुप्रसिद्ध आहे यात वाद नाही. अस्वच्छता मोजण्याचे आणि त्या दृष्टीने देशांची क्रमवारी लावण्याचे काटेकोर निकष उपलब्ध नसले, तरी कचऱ्याचं सर्वव्यापी अस्तित्व हे भारताचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणावं लागेल. अस्वच्छतेचा संबंध दारिद्य्राशी असतो हेही उघड आहे. दारिद्य्रामुळे स्वच्छता ठेवण्यासाठीच्या पायाभूत सुविधांचा आणि त्यासाठी लागणाऱ्या पैशांचा अभाव असतो. भारतात दारिद्य्राचं प्रमाण मोठं असल्यामुळे इथल्या अस्वच्छतेचा त्याच्याशी संबंध असणंही स्वाभाविक आहे; पण हा युक्तिवाद तितकासा खरा नाही. भारतापेक्षाही गरीब असलेल्या देशांमध्ये अस्वच्छतेचं प्रमाण इथल्यापेक्षा कमी आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहं असूनही उघड्यावरच शौचाला बसणारी माणसं हे भारतातलं सर्वसामान्य दृश्य आहे. म्हणजे खरं तर स्वच्छतेचा प्रश्न गरिबीपेक्षा सांस्कृतिकतेशी जास्त निगडित आहे.
अनेकदा गरिबांना अतिशय अस्वच्छ परिस्थितीत काम करावं लागतं. शेतमजूर चिखलात काम करतात, तर बांधकाम मजूर किंवा इतर कामगारांना त्याहीपेक्षा अधिक प्रदूषित आणि घाणेरड्या वातावरणात काम करणं भाग असतं. पण तरीही हे कामगार शक्य तितके स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतात. अर्थात, त्यांच्या स्वच्छतेची तुलना श्रीमंतांच्या स्वच्छतेच्या व्याख्येशी करता येणार नाही. पण तरीही या गटातल्या गरीब कामगारांनाही स्वच्छतेचं महत्त्व पुरेपूर माहिती असतं. कोणत्याही खेड्यातल्या किंवा आदिवासी पाड्यातल्या अगदी दरिद्री झोपड्यांमध्ये डोकावलात तरी तुम्हाला तिथे स्वच्छता आणि टापटीप दिसेल. अगदी शहरी झोपडपट्ट्यांमध्येही तिथल्या रहिवाशांनी नाना अडचणींमधून मार्ग काढत किमान स्वच्छता राखलेली आढळून येते. याचं एक मुख्य कारण म्हणजे स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून आजार ओढवून घेणं त्यांना परवडण्याजोगं नसतं. असं असेल तर मग कचरा-घाण-अस्वच्छता तयार कशी होते? ती तयार होते प्रामुख्याने शहरी भागात आणि हा कचरा निर्माण करण्यात श्रीमंत वर्गच आघाडीवर असतो. ज्याप्रमाणे श्रीमंत देश जागतिक पर्यावरणाचं नुकसान करण्यात आघाडीवर आहेत, तसंच काहीसं इथेही घडतं.
हे समजून घेतलं की भारतातल्या अस्वच्छतेमागची खरी कारणं समजून घेता येऊ शकतात. भारतातल्या अस्वच्छतेच्या प्रश्नाचं मूळ आहे ते आपल्या जातिवादाच्या संस्कृतीत. म्हणजे काय, तर आपल्या जातिव्यवस्थेने स्वच्छतेची जबाबदारी काही विशिष्ट जातींवरच सोपवली आहे. स्वच्छतेचं काम म्हणजे घाणेरडं काम आणि ते काम करणारी माणसं म्हणजे अस्पृश्य, अशी आपली पूर्वापार धारणा आहे. आज पूर्वीप्रमाणे थेट आणि क्रूर स्वरूपाची अस्पृश्यता शिल्लक राहिलेली नसली, तरी अजूनही भारतात अस्पृश्यतेचं प्रमाण बरंच आहे, असं अॅक्शन एड सर्व्हे या संस्थेने २००० साली केलेल्या सर्वेक्षणात आणि अहमदाबाद इथल्या ‘नवसर्जन ट्रस्ट’ने ‘रॉबर्ट एफ. केनेडी सेंटर फॉर जस्टिस अँड ह्युमन राइट्स’ या संस्थेसोबत २००९ साली केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलेलं आहे. २००९ सालचं सर्वेक्षण तर मोदींच्या गुजरातमध्येच केलेलं होतं.
अस्पृश्यता पाळणं हा एक भाग झाला; पण भारतीयांच्या एकूण वागण्या-बोलण्याला जातीचा संदर्भ व्यापून असतो. आज शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे, जागतिकीकरण झालं आहे, शहरीकरण वाढतं आहे, तरीही जातिव्यवस्था अजूनही आपल्या समाजात घट्ट पाळंमुळं रोवून आहे. आणि विशिष्ट कामं ही विशिष्ट जातींनी किंवा बायकांनीच केली पाहिजेत, हे जातिव्यवस्थेने लादलेले निर्बंधही अजूनही आपल्या समाजात कायम आहेत. दुसरीकडे, जगभरातल्या लोकांनी आज ‘सिव्हिक सेन्स’ अंगी बाणवला आहे आणि स्वतः तयार केलेला कचरा प्रामुख्याने स्वतः स्वच्छ करण्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. जगभरात सफाई कामगारांची मदत पुढच्या टप्प्यात एक पर्याय म्हणूनच घेतली जाते; पण भारतात मात्र चित्र वेगळं आहे. रस्त्यावर कचरा फेकणं हा आपला जन्मसिद्ध हक्क असून तो कचरा स्वच्छ करण्याचं काम तथाकथित खालच्या जातीचे ‘कचरावाले’ लोक करतील, हे गृहीत धरण्यातच आपल्याकडची उच्चभ्रू मंडळी धन्यता मानतात. १२५ कोटी लोकांनी केलेली घाण, ही त्या घाणीइतकीही किंमत नसलेल्या आणि वर्षानुवर्षं शोषण झालेल्या मूठभर सफाई कामगारांनीच स्वच्छ करावी अशी अपेक्षा असेल, तर देश म्हणजे घाणीचं आगर बनणार नाही तर काय? या अशा मानसिकतेमुळेच आजवर रक्षणाची जबाबदारी मूठभर क्षत्रियांकडे सोपवली गेली आणि देशात गुलामगिरीची प्रथा तयार झाली. ज्ञानार्जनाची मक्तेदारी फक्त ब्राह्मणांकडे मर्यादित राहिल्यामुळे बाकी सगळा समाज अज्ञानी आणि मागास राहिला.

संपूर्ण लेख वाचा 'अनुभव'च्या जानेवारी अंकामध्ये

अनुभवचे वर्गणीदार होण्यासाठी संपर्क:
०२०-२४२७०८९६ / ०२०-६५६०५१६८ किंवा subscribe.anubhav@gmail.com

(सदर लेख हा 'इकॉनॉमिक अॅंड पॉलिटिकल विकली' मधील आनंद तेलतुंबडे यांच्या लेखाचा मराठी अनुवाद आहे).

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा