दक्षिण गंगा बनतेय गटारगंगा! - मुक्ता चैतन्य

दर बारा वर्षांनी येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याला नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठी 2015 साली जुलै महिन्यात सुरुवात होईल. या काळात गोदावरीच्या पाण्यात डुबकी मारून पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी आणि सिंहस्थाची पर्वणी अनुभवण्यासाठी सुमारे 80 ते 90 लाख लोक नाशिक व त्र्यंबकेश्वर इथे येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. सिंहस्थासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाईल असं म्हटलं जात आहे. धार्मिक उत्सवासाठी इतका प्रचंड पैसा खर्च होत असताना गोदावरीला प्रदूषणातून मुक्त करण्याच्या हेतूने यातला किती पैसा खर्च केला जाणार आहे याबाबत मात्र प्रशासकीय पातळीवर अजूनही स्पष्टता नाही. सांडपाणी, घनकचरा, औद्योगिक कचरा, मेडिकल वेस्ट अशा विविध माध्यमांतून गोदावरी नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. गोदावरीच्या प्रवाहात अनेक ठिकाणी प्राणवायूचं प्रमाण शून्य झाल्याचं निदर्शनास आलं आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या प्रदूषणामुळे गोदावरी नदीचा प्रवास गटारगंगेकडे होतोय.
गोदावरीचं प्रदूषण समजून घ्यायचं तर आपल्याला जावं लागतं ते थेट तिच्या उगमापाशी- नाशिक शहरापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर इथे. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. त्र्यंबकला पोचलं की आधी छोटंसं गाव लागतं आणि नंतर दिसतात आभाळ कापणारे सह्याद्रीचे पर्वत. त्र्यंबक हे ब्रह्मगिरी पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं निसर्गरम्य गाव आहे. चहुबाजूंच्या पर्वतरांगांमधून वाहत येणारे अगणित झरे, लहानसहान ओहोळ यांनी हा परिसर सतत हिरवागार असतो. याच ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत दक्षिण वाहिनी गोदावरी नदी उगम पावते. ब्रह्मगिरीपासून सुमारे दीड हजार कि.मी.चा प्रवास करून आंध्रमधल्या राजमहेंद्री इथे बंगालच्या उपसागराला जाऊन ती मिळते. पौराणिक दाखल्यानुसार गोदावरी ही भारतवर्षात अवतरणारी पहिली नदी आहे. गोदावरीला गंगेची थोरली बहीण मानलं जातं. तिला इकडच्या परिसरात ‘बूढी गंगा’ असंही नाव आहे. पण, ब्रह्मगिरी ते नाशिकमधल्या पंचवटीतल्या तपोवनपर्यंत तिच्या सोबतीने प्रवास केला, की प्रदूषणाच्या विद्रूप खुणा अंगाखांद्यावर वागवत वाहणारी हीच का ती गंगेची थोरली बहीण, असं वाटून जातं.
गोदावरीचा ब्रह्मगिरी ते तपोवन असा प्रवास समजून घेताना गोदावरीची काही वैशिष्ट्यं आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावली आणि त्यानंतर ती भरभरुन वाहू लागली, असं गोदेच्या बाबतीत होत नाही. ब्रह्मगिरीत उगम पावून ती अनेक ठिकाणी लुप्त होते, खुद्द त्र्यंबकमध्ये ती बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे तिचा प्रवाह बारीक आहे. त्र्यंबकेश्वरापासून गंगापूर धरणापर्यंत पोचेस्तोवर आणि त्याही पुढे तिला नीलगंगा, अहिल्या, माणगंगा, कपिला, नंदिनी किंवा नासर्डी, वालदेवी, कादवा, दारणा अशा किती तरी लहान नद्या येऊन मिळतात. अनेक ओहोळ, नैसर्गिक झरे आणि भूमिअंतर्गत असलेल्या पाण्याचे झरे येऊन मिळतात आणि ते तिचा प्रवाह मोठा करतात, तिला नदीचा आकार देऊ करतात. त्यामुळे ब्रह्मगिरीपासून गोदावरी सलग अशी दिसतच नाही. नदी म्हणून वाहणारी तिची सलगता खरी दिसते ती गंगापूर धरणातून बाहेर पडल्यानंतरच.
ब्रह्मगिरी पर्वतावर गोदा उगम पावते तशी तिथेच ती लुप्तही होते. याच पर्वतरांगांमध्ये उगमापासून थोड्या खालच्या डोंगरांमध्ये ती पुन्हा प्रगटते. त्या ठिकाणाला ‘गंगाद्वार’ असं म्हटलं जातं. गंगाद्वारापाशी गोदेची बारीक धार बारा महिने चोवीस तास अखंड निथळत असते. ब्रह्मगिरीतून खाली जमिनीवर येण्याआधीचा गोदेचा तो पहिला पडाव आहे. त्यामुळे अर्थातच तिथे मंदिर आहे. गोदावरीची पूजाअर्चा तिथे चालू असते. गंगाद्वारपासून ती पुन्हा लुप्त होते ती थेट खाली त्र्यंबकेश्वर गावात कुशावर्त कुंडात प्रकटते. याच कुशावर्त कुंडात सिंहस्थाच्या वेळी नागा साधू शाही स्नान करतात. कुशावर्तात अनेक झरे अखंड वाहत असतात. त्यामुळे या कुंडात पुष्कळ पाणी असतं. अर्थात गेल्या दहा-बारा वर्षांत ब्रह्मगिरी पर्वतावर प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळे त्या भागातल्या नैसर्गिक झर्‍यांवर आणि पाझरांवर विपरीत परिणाम झाला आहे.
कुशावर्तापासून गोदा पुन्हा लुप्त होते; पण तिचं हे लुप्त होणं नैसर्गिक नाही. केवळ माणूसच त्यास जबाबदार आहे. विविध पूजाविधी करणारे ब्राह्मण-पुजारी, हजारोंच्या संख्येने येणारे भाविक आणि व्यापार्‍यांच्या दुकानांनी गजबजलेल्या कुशावर्ताच्या परिसरात आता गोदावरी अक्षरश: शोधावी लागते. कारण या परिसरात गोदेच्या प्रवाहाला माणसांनी एका जलवाहिनीत बंदिस्त करून टाकलेलं आहे.
नदीला तिच्या उगमस्थितीतच जलवाहिनीत बंद करण्याची किमया माणसाने कशासाठी केलीय, माहितेय? बारा वर्षांतून एकदा येणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये होणार्‍या तीन शाही स्नानांसाठी जगभरातून लाखो लोक त्र्यंबकला येतात. एवढ्या भाविकांना सामावून घेण्याची त्र्यंबकची अजिबातच क्षमता नाही. त्यातच त्र्यंबकमधल्या गोदेच्या प्रवाहाच्या मार्गालगतच सिंहस्थातल्या शाही मिरवणुकीचा मार्ग आहे. त्यामुळे शाही मिरवणुकीत अडथळे येऊ नयेत यासाठी गोदावरीचा कुशावर्तातून पुढे वाहणारा प्रवाह एका जलवाहिनीमध्ये (पाइपलाइनमध्ये) बंदिस्त केला गेला आहे. नदीला पाइपात टाकण्यामागे आणखी एक कारण आहे. नारायण नागबळी आणि तत्सम विधींचं महत्त्व जसं वाढलं तसं त्र्यंबकचं अर्थकारणही झपाट्याने बदललं. त्र्यंबकची लोकसंख्या जेमतेम दहा हजार असेल, पण तिथे येणारी रोजची ‘फ्लोटिंग पॉप्युलेशन’ आहे पन्नास हजार. त्यामुळे धार्मिक वस्तू विकणार्‍या दुकानांची, बाजाराची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून जलवाहिनीमधून वाहणार्‍या नदीच्या पात्रावरून सिमेंट काँक्रीटचा स्लॅब टाकून त्यावर गोदेला पुजणार्‍यांचाच बाजार भरायला सुरुवात झाली. गोदेची महती सांगणारी पुस्तकं, गाण्यांच्या सीडीज, पूजेचं सामान यांची दुकानं या स्लॅबवर थाटलेली दिसतात. स्लॅबखालून एका जलवाहिनीतून गोदा केविलवाणी वाहत असते... पावसाळ्यात किंवा इतरही वेळी जेव्हा कुशावर्त कुंडातलं पाणी ओव्हर-फ्लो होतं, तेव्हा गोदा या जलवाहिनीतून वाहायला लागते. इतर वेळी तिची धार बारीक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर ती धारही अधिकच घटते. हा सगळा उद्योग करताना नदीचा श्‍वास त्यात कोंडला जाईल, तिच्या पात्राची जैवविविधता धोक्यात येईल या कशाचाही विचार प्रशासनाने केलेला नाही.
प्रशासनाच्या या सगळ्या अविचारी कारभाराचे भयानक पडसाद अहिल्या घाटावर बघायला मिळतात. गोदेच्या काठी, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला एक सुरेख घाट आहे. कालपरवापर्यंत गोदा इथे झुळझुळत होती. त्या झुळझुळणार्‍या गोदेचा आता इथे फक्त उकिरडा झालेला आहे. गोदा-अहिल्या संगमावरील घाटावर नारायण नागबळी, कालसर्प, त्रिपिंडी अशा सगळ्या पूजा आणि त्यांचे विधी होतात. एक विधी साधारण तीन दिवस चालतो. एक पुजारी एकाच दिवशी अनेक पूजाविधी करतो. पूर्वी हे विधी विशिष्ट तिथींनाच होत असत. पण हल्ली पूर्वापार चालत आलेल्या तिथींच्या व्यतिरिक्तही अनेक नव्या तिथी काढून विधिकार्य उरकलं जातं. अगदी पारंपरिक तिथींचा हिशोब करायचा झाला तरी पितृपक्षातले 15 दिवस आणि वर्षभरातले इतर 60 अशा एकूण 75 तिथी परंपरेने या विधींसाठी निश्‍चित केलेल्या आहेत. या आणि नव्याने काढल्या गेलेल्या तिथींना विधिकार्य उरकण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून हजारो लोक त्र्यंबकेश्वरात येतात. एका पाहणीनुसार या पूजांच्या माध्यमातून निर्माण होणारा जवळपास 27 हजार किलो घनकचरा गोदावरीच्या पात्रात टाकला जातो. याशिवाय भाविक किंवा पर्यटक म्हणून आलेल्या लोकांनी टाकलेल्या कचर्‍याची यात भरच पडत असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्र्यंबकेश्वरात पर्यटक, भाविक येत असूनही सांडपाण्याची व्यवस्था मात्र अगदीच कुचकामी आहे. या व्यवस्थेसंदर्भात इथल्या नगर परिषदेकडे चौकशी केली असता 60 टक्के सांडपाणी गोदेत सोडलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गायत्री मंदिराजवळ गेलं आणि त्र्यंबकेश्वर मंदिराकडे पाठ करून उभं राहिलं की उजव्या हाताला काँक्रीटच्या स्लॅबखालून जलवाहिनीतून येणारी गोदावरीची मंद धार दिसते, तर डावीकडे अहिल्या नदीकडे जाणार्‍या पात्रात फक्त उकिरडा दिसतो. त्यात भर म्हणजे बारा वर्षांपूर्वी इथे पार पडलेल्या सिंहस्थाची कामं करण्यासाठी म्हणून गोदावरी आणि अहिल्या या दोन्ही नद्यांचे तळ सिमेंट-काँक्रीटने भरून बंदिस्त करण्यात आले. त्यामुळे एखाद्या मानवनिर्मित कॅनॉलसारखं गोदावरी आणि अहिल्येचं पात्र दिसतं. नदीपात्राचं काँक्रीटीकरण करण्याचा जो काही उद्योग केला गेला त्यामुळे या परिसरात प्रदूषणाच्या भीषण समस्या निर्माण झाल्या आहेत. संगम घाटावर ज्या पूजा चालतात त्यातून जे निर्माल्य तयार होतं ते नदीला अर्पण केलं जातं. ते सारं निर्माल्य या काँक्रीटीकरणामुळे तिथेच पडून राहतं. पूर्वी नदीच्या नैसर्गिक पात्रात या घनकचर्‍यातल्या भाताच्या पिंडी, फुलं किंवा इतर विघटनशील पदार्थांचं नियमित विघटन होत असे, निचरा होत असे. विघटन झालेल्या गोष्टी नदीपात्राच्या तळाशी जमिनीत मुरून जात असत. काँक्रीटीकरणानंतर ही संपूर्ण प्रक्रियाच बंद पडली आहे. इथे घनकचर्‍याचा चिखल सर्वत्र बघायला मिळतो. भाताचे पिंड किंवा पूजेचं नदीत अर्पण केलेलं इतर साहित्य तसंच पडून कुजून, सडून गेल्यामुळे या संपूर्ण परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. सलग दहा-पंधरा मिनिटं या परिसरात उभं राहिलं तर भोवळ येईल अशी परिस्थिती इथे आहे. मध्यंतरी पर्यावरणप्रेमींनी या संदर्भात केलेल्या तक्रारींनंतर ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने हा घनकचरा आणि निर्माल्य उचलून नाशिक मनपाच्या खत प्रकल्पात टाकलं जावं आणि त्याचा खर्च इथल्या पुजार्‍यांनी उचलावा, असा प्रस्ताव ठेवला होता. त्र्यंबकच्या पुजार्‍यांनी हा खर्च उचलण्याची तयारीही दाखवली, मात्र नाशिक मनपाच्या खत प्रकल्प विभागाने हे निर्माल्य स्वीकारण्यास नकार दिला. आज त्र्यंबकेश्वरातला घनकचरा स्वीकारला तर उद्या आजूबाजूच्या सगळ्याच गावांच्या घनकचर्‍याचा ताण नाशिकच्या खत प्रकल्पावर येऊन पडेल, असा युक्तिवाद त्यांच्याकडून केला गेला. त्यामुळे आहे ही भीषण परिस्थिती तशीच राहणार! खरं तर हे सारं निर्माल्य एका ठिकाणी गोळा करावं, असे स्पष्ट निर्देश आहेत. पण गोदा-अहिल्या घाटावर जाऊन बघितलं तर तशी कुठलीही ठोस व्यवस्था दिसत नाही.
या संगमावरून गोदा जरा पुढे गेली की संपूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचं सांडपाणी मोठाल्या गटारींतून धोधो वाहत गोदेत येऊन मिसळतं. इतकंच नाही, तर त्र्यंबकेश्वर मंदिरात असलेल्या अमृतकुंडातही गोदावरी-अहिल्या संगमावरचं प्रदूषित पाणी नैसर्गिक झर्‍यांच्या माध्यमातून येऊन मिसळतंय. याचा अर्थ असा, की संगमावरच्या प्रदूषणाने मंदिरातल्या प्राचीन अमृतकुंडात असलेल्या अगणित नैसर्गिक झर्‍यांनाही या प्रदूषणाची बाधा झालेली आहे. याच अमृतकुंडातल्या पाण्याने त्र्यंबकेश्वराच्या त्रिकाल पूजा केल्या जातात. त्यामुळे निदान देवाचं पाणी तरी स्वच्छ असू द्यावं, या हेतूने अमृतकुंड सफाई मोहीम राबवली जाते आहे. अमृतकुंडाच्या स्वच्छतेचं काम सुरू असताना कुंडातून प्रचंड घाण आणि तवंगयुक्त काळपट पाणी बाहेर पडत असल्याचं पाहायला मिळतं.
त्र्यंबकेश्वरातून बाहेर पडून तळवडे, बेजे करत दक्षिणवाहिनी होत गोदावरी पुढच्या प्रवासाला सुरुवात करते. त्र्यंबकपासून पुढे 14 कि.मी. अंतरावर तिला किकवी ही उपनदी येऊन मिळते. पुढे गोदावरी नदी तसंच गौतमी आणि काश्यपी या नद्यांवरच्या धरणांचा जिथे संगम होतो त्यावरच गंगापूर धरण बांधलेलं आहे. धरणातून गोदेचा प्रवाह बाहेर पडला की पहिल्यांदा ती गंगापूर गावापर्यंत येते. गंगापूर गावात पुन्हा एकदा सांडपाणी वाहून आणणार्‍या गटारी गोदावरीत सोडल्या गेल्या आहेत. पुढे ही नदी नवशा गणपती मंदिर, सोमेश्वर धबधबा या परिसरात येते. पावसाळ्यात जेव्हा धरणातून पाणी सोडलं जातं तेव्हा येथील धबधब्याला चांगलं पाणी असतं. पण धबधब्याच्या वरच्या बाजूला असलेल्या वस्त्यांमधून गोदावरीत जनावरं, गाड्या आणि कपडे धुण्याचे प्रकार सर्रास चालू असतात. त्यामुळे धबधब्यापर्यंतचं आणि पुढे सोमेश्वराकडे जाणारं पाणी दूषित झालेलं असतं. इथल्या पाण्याच्या चाचण्यांनुसार 100 मि.ली. पाण्याचा बीओडी 10 आहे. (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे ऑक्सिजनचं पाण्यातलं विघटन होण्याचं प्रमाण. पिण्याजोग्या पाण्यात हे प्रमाण 2 असावं लागतं.) बीओडी वाढलं की पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. इथल्या पाण्यात बीओडीचं प्रमाण वाढल्यामुळे इथे मासेही जिवंत राहू शकत नाहीत.
सोमेश्वर धबधब्यानंतर येतो सोमेश्वर मंदिराचा परिसर. इथे गोदावरीच्या काठी वृद्ध वृक्षांच्या सावलीत शंकराचं प्राचीन मंदिर आहे. अतिशय नयनरम्य असा हा परिसर. त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते. साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सोमेश्वर हा नाशिक शहराबाहेरचा भाग होता. पावसाळी सहली किंवा शनिवार-रविवार फिरायला जाण्यासाठी नाशिककर इथे यायचे. पण आता नाशिक ज्या वेगाने फोफावतंय, त्यात सोमेश्वर आता शहरात सामावून गेलं आहे. त्यामुळे मंदिराच्या आसपास मोठमोठाली बांधकामं उभी राहिली आहेत. इथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे मंदिर परिसरातच बाग, मुलांसाठी खेळ आणि जलपर्यटन अशा व्यवस्था उभ्या राहिल्या आहेत. इथे नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांची बरीच गर्दी असते. पाण्यात चालणार्‍या नौका बहुतेक करून डिझेलवर चालणार्‍या आहेत. त्यामुळे या नौकांमधून गळणारं डिझेल किंवा इतर रसायनंही थेट गोदेच्या पाण्यात जाऊन मिसळतात. त्यामुळे पाण्यावर त्याचा तवंग तयार होतो. इथे येणारे पर्यटकही प्लॅस्टिकसहित इतर कचरा नदीपात्रातच टाकतात. त्यामुळे गोदेच्या प्रदूषणात भरच पडते. अर्थात इथे गेल्या वर्षभरापासून प्रशासनाने नदीपात्रातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. प्रशासनाने नदीपात्रात तरंगणारा कचरा काढून टाकण्याची जबाबदारी इथल्या जलपर्यटन संघटनेकडे दिलेली आहे. तरीही येणार्‍या पर्यटकांना प्रदूषणाविषयी जागरूक करण्याची मोहीम अद्यापही हाती घेण्यात आलेली नाही.
सोमेश्वरपासून गोदावरी पुढे आनंदवल्ली परिसरात येते. आनंदवल्लीला लागूनच नवशा गणपती मंदिराचा परिसर आहे. हे मंदिर आनंदीबाई आणि राघोबादादा पेशवे यांनी बांधलं. श्रीमंत माधवराव पेशवे यांचं हे आजोळ. राघोबादादांनी आनंदवल्लीला मोठा राजवाडाही बांधला होता असं सांगितलं जातं. आनंदीबाईची गढी म्हणून एक पडका वाडा या भागात अनेक वर्षं होता. पण अलीकडच्या काळात झपाट्याने वाढणार्‍या नाशिकच्या गजबजाटात आता ही गढीदेखील जमीनदोस्त झाली आहे. या परिसरात आता एक मोठी झोपडपट्टी वसलेली आहे, तर गढीच्या भागात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. आनंदवल्लीच्या भागातलं सगळं सांडपाणी गोदावरीत सोडलेलं आहे. सांडपाणी नदीत जाऊ नये म्हणून मनपाने उपाय म्हणून बांध घातलेले आहेत खरे, पण तरीही त्या बांधांच्या पलीकडून झाडा-झुडपातून सारं सांडपाणी नदीला येऊन मिळतं आहे. आनंदवल्लीला असलेल्या घाटावरून चालताना खाली बघतच चालावं लागतं. कारण इथल्या झोपडपट्टीवासीयांसाठी घाट हे नैसर्गिक विधीचं ठिकाण बनलं आहे. त्यामुळे हा घाट दुर्गंधीने व्यापलेला तर आहेच, शिवाय नदीच्या प्रदूषणाचं आणखी एक कारण बनलेला आहे. सातपूर एमआयडीसीकडून येणारे नालेही केमिकल वेस्ट घेऊन नदीला इथेच मिळतात. या नाल्यांचं पाणी ज्या खडकांवरून वाहत गोदावरीला जाऊन मिळतं, त्या खडकांचं निरीक्षण केल्यानंतर पाण्यातल्या रसायनांची क्रिया झाल्यामुळे हे खडक काळपट तपकिरी न राहता सोनेरी झाल्याचं दिसून येतं. इथल्या पाण्याचा बीओडी तब्बल 43 इतका आहे!
सोमेश्‍वर, नवशा गणपती, आनंदवल्ली असा प्रवास करत गोदावरी नाशिक शहरात प्रवेश करते. आनंदवल्लीपासून नदी जसजशी रामकुंडाकडे झेपावते तसतसं नाशिक शहरातल्या गटारींचं पाणी तिच्यात येऊन मिसळायला सुरुवात होते. दर एक-दोन कि.मी. अंतरावर नदीपात्रात शहराचं सांडपाणी सोडणार्‍या गटारी दिसायला लागतात. चोपडा लॉन्स, एस. टी. कॉलनी, मल्लारखाण झोपडपट्टी अशा सगळ्याच ठिकाणी गटारी नदीला येऊन मिळतात. अनेक ठिकाणी चेंबर्स फुटल्यामुळेही सांडपाणी वाहून नदीला जाऊन मिळतं. पंचवटीतील रामकुंड परिसरात गोदावरी पोहोचेपर्यंत तिचं पावित्र्य जवळपास संपूनच गेलेलं असतं. या भागामध्येही नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक व इतर घनकचरा टाकला जातो, कपडे धुतले जातात, गाड्या धुतल्या जातात, जनावरांच्या अंघोळी होतात. भिकारी आणि या नदीच्या काठाचा आश्रय घेणारे अनेक लोकही इथे अंघोळी करताना दिसतात. या भागात नदीच्या पात्रात अस्थिविसर्जनाचा धार्मिक विधीही मोठ्या प्रमाणात पार पडतो. इथे नदीतल्या पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण शून्यावर गेलेलं आहे. त्यामुळेच रामकुंड परिसरातलं नदीचं पाणी मानवी वापरास अयोग्य आहे, यासंबंधी सूचना देणार्‍या पाट्या लावण्याची वेळ महानगरपालिका प्रशासनावर आलेली आहे. इतकंच नाही, तर ‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंचा’च्या तक्रारीमुळे गोदावरीला आता पोलिस संरक्षणही द्यावं लागलं आहे. नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी चार पोलिस उपनिरीक्षक आणि 40 पोलिस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. अर्थात, नदीला पोलिसांचं संरक्षण मिळाल्यानंतर प्रदूषणाचं प्रमाण कमी झालंय असं नाही. ‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंचा’च्या तक्रारीवरूनच उच्च न्यायालयाने आदेश दिल्यामुळे नाशिक मनपाला रामकुंड भागात अस्थिविसर्जन कुंभ बसवावा लागला आहे. पण तरीही प्रदूषण करणार्‍या इतर घटकांवर मनपा प्रशासनाचा काहीच वचक नसल्याचं पदोपदी दिसून येतं.
रामकुंड परिसरातून नदी पुढे जाते, तसा नदीच्या दोन्ही तीरांवर बाजार भरलेला दिसतो. या बाजारातला कचरा सर्रास नदीत फेकला जातो. त्यानंतर टाळकुटेश्वर परिसर येतो. तिथेही नदीपात्रात पंचवटी परिसरातलं सांडपाणी आणि गटारं आणून सोडलेली आहेत. वाघाडी नालाही इथेच नदीला येऊन मिळतो. त्यामुळे टाळकुटेश्‍वरापाशी पाण्यातला बीओडी 121 वर जाऊन पोहोचलेला दिसतो. या ठिकाणी पाण्यातल्या ‘कॉली फॉर्मस’चं प्रमाणही सरासरीपेक्षा बरंच जास्त आहे. त्यामुळे या पाण्यापासून विविध रोग होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
टाळकुटेश्वरावरून पुढे गेलं की अमरधाम आणि तपोवनाचा परिसर येतो. राम-लक्ष्मण आणि सीता वनवासाच्या काळात तपोवनात राहिले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याला येणार्‍या साधूंसाठी तपोवनातच साधुग्राम उभारला जातो. भाविकांच्या दृष्टीने रामकुंडापाठोपाठ तपोवनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तपोवनाला लागूनच मनपाचं मलजल शुद्धीकरण केंद्र आहे. बाहेरून बघताना सगळं आलबेल आहे असं आपल्याला दिसतं; पण या केंद्रातल्या शुद्धीकरण टाक्या मागे टाकत नदीच्या दिशेने पुढे गेलं की या शुद्धीकरण केंद्राचं उघडं-वाघडं भीषण वास्तव समोर उभं राहतं. या परिसरात नदी अक्षरश: पांढरी शुभ्र दिसायला लागते. नदीच्या पात्रावर सर्वत्र पांढर्‍या रंगाचा घनरूप फेस आलेला दिसतो. जलमल शुद्धीकरण केंद्रातून जे पाणी शुद्ध करून नदीत सोडलं जातं त्या पाण्यावरचा हा फेस असतो. प्रत्यक्ष नदीत पाणी सोडण्याआधी अलीकडे घेतलेल्या एका खड्ड्यात ते सोडलं जातं व मग तिथून हे पाणी पाइपवाटे नदीत जातं. हा संपूर्ण खड्डा किंवा जमिनीचा भाग या पांढर्‍या घनरूप फेसाने भरलेला असतो. हा घनरूप फेस डिटर्जंट पावडर, शाम्पू, साबण अशा घटकांमुळे तयार झालेला असतो. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत या घटकांवर प्रक्रिया होत नाही. त्यामुळे मलजल शुद्धीकरणानंतर निर्माण होणार्‍या या फेसाचं करायचं काय, तो निर्माण होऊ नये म्हणून काय करता येईल, याचा उलगडा मलजल शुद्धीकरण प्रकल्पावर काम करणार्‍या महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना अजूनही झालेला नाही. त्यामुळे प्रक्रिया केलेलं पाणी घनरूप फेसासहितच नदीत सोडलं जातंय. या फेसाच्या आजूबाजूला असलेल्या वनस्पतींचं निरीक्षण केल्यावर त्यांची पानं करपून गेल्यासारखी काळपट पडलेली दिसतात. त्यांच्यावर चिकटा आलेला दिसतो. इतकंच नाही, तर जमिनीवर ज्या ठिकाणी हा फेस सर्वाधिक साचलेला आहे तिथली जमीनही काळी पडलेली दिसते. शिवाय हा फेस घनरूप असला तरी हलका असतो. त्यामुळे हवेच्या झोताबरोबर उडून तो आजूबाजूच्या शेतांवर जाऊन पसरतो. हा फेस शेतीला हानीकारक नाही असं इथले अधिकारी सांगत असले, तरी त्यावर अजून पुरेसं संशोधन झालेलं नाही. (सध्या ‘नेरी’मध्ये या फेसावर संशोधन चालू आहे.) जोवर या फेसाच्या विल्हेवाटीचा उलगडा होत नाही, तोवर हे फेसयुक्त पाणी नदीत शिरत राहणार आणि गोदावरीच्या प्रदूषणात वाढ होत जाणार हे नक्की.
नाशिकमध्ये सहा मलजल प्रक्रिया केंद्रं आहेत. शहराचा रोजचा पाणीपुरवठा 305 दशलक्ष लिटर आहे. त्यातून दररोज 243 दशलक्ष लिटरच्या आसपास मलजल तयार होतं. त्यापैकी 200 दशलक्ष लिटर मलजलावर प्रक्रिया करण्याची सोय महानगरपालिकेकडे आहे. त्यामुळे उरलेलं जवळपास 42 दशलक्ष लिटर मलजल कुठलीही प्रक्रिया न होता तसंच नदीत सोडलं जातं. त्याचप्रमाणे ज्या मलजलावर प्रक्रिया होते ते पाणीही मानवी वापरास किती योग्य आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
आता येऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात होणार्‍या तीन शाही स्नानांसाठी मनपाने तपोवन परिसरात टाळकुटेश्‍वर ते तपोवन या गोदावरीच्या दक्षिण घाटावर सव्वा किलोमीटर लांब आणि 66 फूट रुंदीचा, तर टाकळी संगम इथे 400 मीटर लांब आणि 66 मीटर रुंद घाट बांधण्याचा ‘घाट’ घातला आहे. या घाटाला पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे. घाट बांधू नये यासाठी पर्यावरणप्रेमींनी नुकतंच या परिसरात मानवी साखळी उभारत आंदोलन केलं होतं. संकल्पित काँक्रीटच्या घाटामुळे नदीकाठच्या जैवविविधतेला धोका निर्माण होईल, नदीचा होणारा नैसर्गिक विस्तार खुंटेल, नदीकाठचे सूक्ष्म जीव नष्ट होतील, त्यामुळे जलशुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया बंद पडेल; अशुद्ध जलधारेत मासे जगणार नाहीत. माशांसाठी येणारे शराटी, खंड्या, बगळे, करकोचे असे पक्षी येईनासे होतील; नदीकाठच्या गावरानात खंड्यासारखे पक्षी आपलं घरटं बांधतात, ते येणं बंद होईल, आणि या सर्वांतून नदीकाठची एकूण जैविक साखळीच धोक्यात येईल, असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे टाळकुटेश्वराच्या अलीकडे ज्याप्रमाणे गोदाकाठच्या घाटांचा उपयोग बाजार, झोपडपट्टीसदृश वस्त्या आणि नैसर्गिक विधींसाठी होतो, तोच प्रकार याही नव्या घाटावर कालांतराने सुरू होईल आणि त्यामुळे नदीची आणि परिसराची शोभा जाईल, असंही पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. नदीकाठी घाट बांधण्यापेक्षा काठाची नैसर्गिक विविधता जपण्यासाठी इथे चरकवन, नक्षत्रवन, राशीवन किंवा बोटॅनिकल गार्डन यापैकी काही तरी विकसित केलं जावं, जेणेकरून दुर्मिळ स्थानिक वृक्ष जपले जातील आणि त्यांची माहिती येणार्‍या पर्यटकांना मिळू शकेल, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. मात्र, पर्यावरणप्रेमींचा विरोध लक्षात न घेता मनपाची घाट बांधण्याची मोहीम जोरात सुरू आहे.

26 एप्रिल 1758 रोजी पेशव्यांनी गोदावरीच्या शुद्धीकरणासाठी आणि पावित्र्यासाठी आदेश काढले होते. त्यात ते म्हणतात, ‘कुशावर्तापासून हनुमानापर्यंत गंगेत कोणी केर, पत्रावळी, उकिरडा टाकू नये. गंगा स्वच्छ असावी. ज्या घराजवळ गंगेत केर निघेल त्याचे पारिपत्य करावे.’
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आज अडीचशे वर्षांनंतरही गोदावरीला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद आणि मुंबई उच्च न्यायालयाला आदेश काढावे लागत आहेत! माणसाने स्वत:च्या स्वार्थापोटी गोदावरीची रध्रंच बंद करून टाकली आहेत. त्यामुळे गोदावरी अक्षरश: मृतावस्थेला पोहोचलेली आहे. शहरातले पर्यावरणप्रेमी तिला पुनर्जीवित करण्यासाठी धडपडत आहेत; पण त्यांच्या प्रयत्नांना सत्ताधार्‍यांकडून, प्रशासनाकडून व जनतेकडून तितकासा प्रतिसाद मिळत नाहीय. मॅगसेसे पुरस्कारविजेते पाणीतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी मध्यंतरी गोदावरी परिक्रमा केली. गोदावरीची दुरवस्था बघितल्यानंतर ‘गोदावरी पुन्हा श्‍वासोच्छ्वास करू लागत नाही तोवर सिंहस्थ कुंभमेळ्याला स्थगिती द्या’, असं आवाहन त्यांनी केलं. पण त्यांच्या या आवाहनाकडे राज्यकर्ते-प्रशासन कितपत गांभीर्याने लक्ष देतील याबाबत शंकाच आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असल्यामुळे सिंहस्थासाठी खर्च करायचं अंदाजपत्रक दोन हजार कोटींचं आहे, पण यातील गोदावरीच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर किती पैसा खर्च होणार, हा प्रश्न प्रशासनाने अनुत्तरितच ठेवलाय. ‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंचा’ने दाखल केलेल्या जनहित याचिकांमुळे न्यायालयात या प्रश्नावर सध्या केसेस सुरू आहेत. सिंहस्थाच्या काळात नाशिकमध्ये पन्नास लाखांहून अधिक लोक येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. लोकांच्या नैसर्गिक विधींसाठी कुठलीही ठोस योजना प्रशासनाकडे अजून दिसत नाही. प्रशासनाने ‘हरित कुंभ’ ही संकल्पना मांडली आहे व पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांशी त्याबाबत विचारविनिमयही सुरू आहे. पण हे सारं येऊ घातलेला सिंहस्थ डोळ्यांसमोर ठेवूनच चालू आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरीच्या भीषण प्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी कशी तडीस नेता येईल याचा प्रशासन गांभीर्याने विचार करत नसल्याचंच चित्र आहे.
अर्थात, भीषण प्रदूषणाने कोंडलेला गोदावरीचा श्‍वास मोकळा करणं हा एकट्या नाशिक महापालिकेचा घास नाही. महानगरपालिका, राज्य सरकार आणि दिल्लीत उमा भारती यांचं नदीसुधार मंत्रालय या सर्वांनी एकत्र येऊन गंभीर प्रयत्न केले तरच काही मार्ग निघू शकतो. आजमितीला हे तिन्ही घटक गोदावरीबाबत उदासीन आहेत, ही गोष्ट दुर्दैवीच म्हणावी लागेल.
-मुक्ता चैतन्य
मोबाइल : 9823388828

(या लेखासाठी खालील व्यक्तिंनी दिलेली माहिती-चर्चा उपयुक्त ठरली. त्यांचे आभार - राजेश पंडित, ललिता शिंदे- गोदावरी गटारीकरण विरोधी मंच; प्राचार्य डॉ. दत्ता फरताळे- गोदावरी प्रदूषणाचे अभ्यासक, शेखर गायकवाड- पर्यावरणप्रेमी)

गोदावरीचं प्रदूषण
कोणाचं काय म्हणणं?

चौकट 1
गोदावरी नदीचं महत्त्व युगानुयुगांपासून आहे. जगभरातून माणसं गोदावरीकाठी येतात ती पवित्र जलासाठी. मग तेे जलच अपवित्र करून कसं चालेल? गेली पंचवीस वर्षं ‘नाशिक पुरोहित संघ’ गोदावरी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करतोय; पण त्याचा काहीही उपयोग होत नाहीये. औद्योगिक क्षेत्रातलं सांडपाणी, शहरभरातली गटारं असं सारं या नदीत सर्रास सोडलं जातंय. नाशिक मनपा प्रशासनाकडे तक्रारी नोंदवल्या की चर्चा होते, पण प्रदूषणमुक्तीसाठी प्रशासन ठोस पावलं उचलताना दिसत नाही. भारतभरातून मोठ्या संख्येने येणार्‍या साधुसंतांची सोय तपोवनात साधुग्राममध्ये केली जाते, पण त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी प्रशासनाचं काहीच नियोजन नाही. तपोवन भागात झाडांऐवजी सगळीकडे सिमेंट काँक्रीटची जंगलं दिसायला लागली आहेत. रामकुंडाच्या पात्राचं सिमेंटीकरण करू नका, या मागणीसाठी प्रशासनाकडे मागच्या दोन्ही सिंहस्थांच्या वेळी पुरोहित संघाने बरेच प्रयत्न केले होते, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. रामकुंडात जिवंत झरे होते, ते सारे आज बुजून गेले आहेत. गोदावरीच्या पाण्याचं पावित्र्य, या जागेचं महत्त्व लक्षात घेतलं गेलं पाहिजे. जगभरातले वैज्ञानिक इथे संशोधन करायला येतात. धार्मिकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या या जागेचं महत्त्व प्रचंड आहे. त्याचं पावित्र्य टिकवणं ही शासनाबरोबरच जनतेचीही जबाबदारी आहे; पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. खरं तर नाशिकला येणारे यात्रेकरू आणि प्रशासन यांच्यातला दुवा पुरोहित संघ आहे. पण गोदावरी प्रदूषणापासून ते येऊ घातलेल्या सिंहस्थ नियोजनापर्यंत कुठल्याही बाबतीत सत्ताधारी-प्रशासन पुरोहित संघाशी विचारविनिमय करत नाही.
-सतीश शुक्ल, अध्यक्ष, नाशिक पुरोहित संघ

चौकट 2
‘गोदावरी गटारीकरणविरोधी मंच’ या संस्थेच्या वतीने आम्ही नाशिकमधील गोदावरीचं प्रदूषण, त्र्यंबकेश्वरातील गोदापात्राचं प्रदूषण, तसंच काँक्रीटीकरण्याच्या विरोधात उच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्यात तत्कालीन मनपा आयुक्तांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठीही जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्याचप्रमाणे नाशिक मनपा, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार, केंद्र सरकार, एमआयडीसी यांच्या विरोधातही जनहित याचिका दाखल केली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या जनहित याचिकेला प्रतिसाद देताना नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीने प्रदूषण नियमनाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन योग्य पद्धतीने होते आहे किंवा नाही याचा अहवाल दर दोन महिन्यांनी न्यायालयाला सादर करावा, अशी सूचना दिली आहे. तसंच, पुण्याच्या हरित लवादामध्ये त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ नाशिक विभाग, महाराष्ट्र शासन पाटबंधारे विभाग, केंद्रीय पर्यावरण खाते यांच्या विरोधात खटला चालू आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यात तज्ज्ञ म्हणून ‘निरी’ या संस्थेची नेमणूक केलेली आहे.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहिल्या-गोदावरी संगम, नीलगंगा नदी, कुशावर्त कुंड, त्र्यंबकेश्वर मलनिस्सारण केंद्राच्या आधीचा भाग, अहिल्या-गोदावरी संगमाजवळ उघड्यावर वाहणारी आणि जलवाहिनीतून वाहणारी गोदावरी अशा दहा ठिकाणच्या गोदावरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. त्यांनी ‘राष्ट्रीय हरित लवादा’ला सादर केलेल्या अहवालात त्र्यंबकेश्वर परिसरात गोदावरी मृतावस्थेत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. तसंच हे पाणी मानवी वापरासाठीच नव्हे तर शेतीसाठीही योग्य नसल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.
गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात गुन्हा दाखल करायचा झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं याबाबत नेमकं काय म्हणणं आहे याची दखल न्यायालयाला घेणं आवश्यक होतं. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अंकुश फुलसे यांचा काही दिवसांपूर्वीच जाबजबाब नोंदवला गेला. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यास नाशिक मनपा अकार्यक्षम ठरल्यामुळे गोदा प्रदूषणासंदर्भात महापालिकेने अनामत म्हणून ठेवलेली सव्वा लाख रुपये रक्कम प्रदूषण नियंत्रक महामंडळाने जप्त केलेली असल्याची माहिती फुलसे यांनी न्यायालयात दिली आहे. त्यातून मनपाची गोदावरी प्रदूषणाबाबतची दिरंगाई आणि निष्काळजीपणा समोर आला आहे, तर दुसरीकडे नाशिकचे जिल्हाधिकारी आणि त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने गोदावरी प्रदूषण निर्मूलनासाठी सादर केलेला कृती आराखडा ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने फेटाळून लावला आहे. यातून जिल्हा व शहर प्रशासन गोदावरी प्रदूषणाबाबत फारसे गंभीर नसल्याचंच सिद्ध झालं आहे.
-राजेश पंडित
गोदावरी गटारीकरणविरोधी मंच

चौकट 3
गोदावरी नदीच्या उगमापासून बंगालच्या उपसागराला ती मिळेपर्यंतच्या एकूण प्रवासातलं 19 किलोमीटर अंतर नदी प्रत्यक्ष नाशिक मनपा सीमेतून वाहते. आज नाशिकची लोकसंख्या 18 लक्ष आहे. नाशिक शहरात दररोज सुमारे 250 दशलक्ष लिटर सांडपाणी निर्माण होतं. आजही आपल्याकडे सेप्टिक टँक आणि सोपपीटसारख्या पारंपरिक पद्धतींचा वापर मलनिस्सारणासाठी होतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन 2021, 2026 आणि 2041 अशा तीन टप्प्यांचं शहराच्या लोकसंख्येचं आणि पाणीवापराचं अंदाजपत्रक आम्ही तयार केलं आहे. 2021 साली अनुमानित लोकसंख्येच्या आराखड्यात नाशिकची लोकसंख्या किती असेल, त्या लोकसंख्येला किती पाणीपुरवठा करावा लागेल आणि त्यातून किती सांडपाणी तयार होईल याचं अंदाजपत्रक आम्ही नुकतंच बनवलं आहे. त्यानुसार नाशिक मनपा सीमेत 2021 मध्ये दररोज सुमारे 392.5 दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होईल. याचाच अर्थ तेवढं सांडपाणी शुद्धीकरणासाठी मलजल शुद्धीकरण केंद्रात येणार आहे. नाशिक शहर झपाट्याने वाढतं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही सहा सेव्हरेज झोन तयार केले आहेत. यापैकी तपोवन, पंचक, चेहडी आणि अगर टाकळी हे चार झोन्स कार्यान्वित आहेत, तर गंगापूर आणि पिंपळगाव खांब या उर्वरित दोन प्रकल्पांसाठी उपाययोजना आखलेल्या आहेत, पण त्यासाठी जमिनींचा ताबा अजून मिळलेला नाही.
सध्या मलजल शुद्धीकरण केंद्रातून शुद्ध झालेलं पाणी फक्त औद्योगिक वापरासाठी किंवा शेतीसाठी उपयुक्त आहे. ते पाणी मानवी वापरासाठी योग्य नाही ही बाब खरी आहे. त्यामुळे अंघोळीसाठी हे पाणी उपलब्ध करून द्यायचं असेल तर आताचं मलजल शुद्धीकरण केंद्रातलं तंत्रज्ञान बदलावं लागेल. ते अधिक प्रगत करावं लागेल. दुसरं असं, की शुद्धीकरण केलेलं पाणी इतरत्र वळवण्याची सुविधा सध्या तरी आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे हे पाणी नदीपात्रातून एकलहरा औष्णिक वीजप्रकल्पासाठी सोडलं जातं. एकलहर्‍याला ‘बॅरेज’ आहेत. तिथून पाणी थर्मल पॉवर सेंटरसाठी उचललं जातं. इतकंच नाही, तर भविष्यात सिन्नर इथे होणार्‍या ‘इंडिया बुल्स’च्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी लागणारं पाणी पाटबंधारे विभागाने आताच आरक्षित करून ठेवलेलं आहे. पण सध्या तरी हे पाणी निराळ्या जलवाहिन्यांमधून पाठवण्याची सोय उपलब्ध नसल्याने ते नदीत सोडावं लागतं.
गोदावरीचं प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून आम्ही अभिनव उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. रोज नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी आम्ही यंत्रणा विकसित केली आहे. दोन बोटी आनंदवल्ली ते होळकर पुलापर्यंत नदीपात्रातून फेर्‍या मारतात. एका बोटीत दहा-पंधरा कामगार असतात. नदीपात्रात जो काही तरंगणारा कचरा असेल, पाणवेली असतील त्या, हे कर्मचारी काढून घेतात. महिन्यातून दोन वेळा रामकुंड तळापासून स्वच्छ करण्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. रामकुंड परिसरातील नदीचं पाणी मानवी वापरासाठी अयोग्य असल्यामुळे तिथे आम्ही निराळं गोमुख बसवलेलं आहे, ज्यातून अखंड पिण्याजोगतं पाणी सोडलं जातं, जेणेकरुन भाविकांना, यात्रेकरूंना ते पाणी बाटलीत भरून आपल्या घरी नेता येईल.
-यू. बी. पवार
अधीक्षक अभियंता
पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभाग,
नाशिक महानगरपालिका

चौकट 4
गोदावरी-अहिल्या संगमाच्या काँक्रीटीकरणावरून सध्या बराच गदारोळ माजलेला आहे, पण त्यात त्र्यंबक नगर परिषदेची भूमिका स्पष्ट आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून गोदावरी जलवाहिनीतून वाहते आहे. तसंच 2003 साली झालेल्या सिंहस्थात केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या मंजुरीने पाटबंधारे खात्याने पात्रांचं काँक्रीटीकरण केलेलं आहे. त्र्यंबकेश्वरातल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी कोजुली इथे कचरा डेपो प्रस्तावित आहे. तिथली जागा मिळाली, प्रकल्प उभा राहिला की निर्माल्याचा प्रश्‍न आपोआप सुटेल. 2003 साली 20 लाख लोक त्र्यंबकमध्ये फक्त सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आले होते. या वेळी हा आकडा दुप्पट होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वेळी होणारी गर्दी विभागली जावी यासाठी गोदावरी-अहिल्या संगमावर घाट बांधण्यात आले आहेत. त्यांचा उपयोगही मागच्या सिंहस्थात झाला. प्रदूषण कमी व्हावं म्हणून नगर परिषदेकडून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणली गेली आहे. त्यावर उपाय म्हणून कागदी पिशव्या पुरवण्यासाठी नगर परिषद प्रयत्नरत आहे.
- एन. एम. नागरे, मुख्याधिकारी,
त्र्यंबकेश्वर, नगरपरिषद

युनिक फीचर्स

  • व्यापक सामाजिक हित, प्रयोगशील वृत्ती, सांघिक पत्रकारिता आणि व्यावसायिक शिस्त हे सूत्र घेऊन २० वर्षांची वाटचाल. १९९०-९१ साली काही पत्रकारांनी एकत्र...

घुसळण कट्टा